- 167
- 2 minutes read
ओशो एक यशस्वी व्यापारी
ओशो अर्थात चंद्र मोहन जैन जे नंतर रजनीश झाले नंतर (स्वयंघोषित) आचार्य आणि नंतर भगवान रजनीश झाले, या माणसाने अध्यात्माचा बहुराष्ट्रीय उद्योग कसा सुरू करता येईल याचा वस्तुपाठ घालून दिला. याच्या पायावर पाय ठेऊन आज अनेक भारतीय बहुराष्ट्रीय अध्यात्मिक व्यापारी जबर मोठे झाले आहे.
या ओशो विषयी थोडक्यात:
मुळात अध्यात्माचं व्यावसायिकरण करणाऱ्या प्रत्येक तथाकथित गुरूचा विरोध समाजाने करावा. या मताचा मी आहे.
जेव्हा विपश्यना आणि SN Goenka यांच्या विषयी भरभरून बोलतो तेव्हा मला ओशो विषयी तुझे काय मत आहे असा एक प्रश्न काय विचारला जातो. मी शक्यतो उत्तर द्यायचे टाळतो. तरी आज मी माझ्या पद्धतीने माझे मत मांडत आहे.
फार वर्षांपूर्वी जेव्हा मी मेडिटेशन शिकण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा गुगल आणि फेसबुकच्या अल्गोरिथम ने ते ओळखले आणि मला ओशोच्या दुकानांच्या (कथित आश्रमाच्या) जाहिराती दिसू लागल्या. साहजिक मी कोरेगाव पार्कच्या आश्रमात पोहोचलो. त्यांची फीस ऐकून माझे डोळे फाटले. एचआयव्ही टेस्ट चा रिपोर्ट लागतो हे कळले.
माझा पुढचा शोध मला विपश्यना कडे घेऊन गेला. आणि विपश्यना मला आत बाहेरून बदलून गेली.
ओशो विषयी सुप्त आकर्षण कायम होते. पण अध्यात्मिक तत्वज्ञानाची जी थोडीफार समज निर्माण होऊ लागली त्यातून ओशो फार छोटा वाटू लागला.
ओशो मला कधीच पटला नाही. वारकरी संप्रदायात आज कीर्तनाच्या नावाखाली बरेच स्टॅंड अप कॉमेडियन आपला कॉमेडी शो विकत असतात. ओशो मला त्यांच्यापेक्षा वेगळा वाटत नाही.
तो एक भारी कॉमेडियन, स्टोरी टेलर, परफॉर्मर होता यात शंका नाही. पण तो तत्त्वज्ञानी नक्कीच नव्हता.
त्याने जगाला तत्त्वज्ञान विकले, पण ते तत्वज्ञान त्याला स्वतःला कळले की नाही माहित नाही.
तो मोह-माये विषयी बोलला, पण त्याला संपत्तीचा आणि शान शौकतचा मोह सुटलाच नाही. तेही मान्य केले तरी त्या प्राप्तीसाठी त्याने शॉर्टकट निवडले.
त्याने राजकारणावर सडकून टीका केली, आणि मग त्यानेच गलिच्छ राजकारण करायला सुरुवात केली.
तो युद्धा विषयी बोलला, आणि त्याने त्याच्या आश्रमात शस्त्र साठा केला.
आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम मानवी मनावर काय होतात याविषयी तो भरभरून बोलला, आणि आपल्या आश्रमात रासायनिक शस्त्रांची लॅब बनवली.
भीती विषयी त्याने मोठे उदात्त विचार मांडले त्यांचे पुस्तकं बनले, आणि स्वतःची अटक अटळ झाल्यानंतर तोच अमेरिकेतून पळू लागला. एखाद्या पळकुट्या गुन्हेगारासारखे त्याला पकडण्यात आले.
तो शब्दांचा व्यापारी होता, कुठले शब्द कसे विकायचे त्याला कळले होते.
त्याचे दुकान (कथित आश्रम) फक्त धनवंतांसाठी उघडे होते, गरिबांसाठी आश्रमाचे दरवाजे सक्त रीतीने बंद होते.
मला तो ड्रग डीलर सारखा वाटतो. ड्रग विकणारा पण स्वतः त्याचे सेवन कधीच न करणारा.
त्याच्या कथनी आणि करणी मध्ये सरळ सरळ फरक होता. ओशो च्या आयुष्याचे अनेक भाग आहेत. बालपणी RSS च्या शाखेत जाणारा ओशो. स्वतःला स्वतःच Enlightened म्हणून घोषित करणारा ओशो. मग स्वतःच स्वतःला आचार्य म्हणवून घेणारा आणि मग स्वतःला भगवान म्हणवून घेणारा ओशो. ह्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या personalities होत्या.
संपत्तीनिर्मितीविषयी आकस नाही. पण संपत्तीनिर्मितीचा ओशो चा मार्ग विवादास्पद होता. Enlightenment सारखे मृगजळ विकून आपल्या Gullible भक्तांना करोडो रुपये द्यायला लावायचे. त्या पैशांच्या जोरावर अमर्याद ताकत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. एक lawless समाज व्यवस्था उभी करायची त्यासाठी वेळोवेळी गुंड, गुन्हेगार, homeless लोकांचे हत्यार बनवायचे. राजकारणात उतरून कपटी मार्ग अवलंबायचे. आणि भांडे फुटायला लागल्यावर सगळे खापर आपणच ताकत दिलेल्या एका शिष्येवर फोडून नामानिराळे व्हायचे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
ओशोंच्या अटकेचे कारणं, त्याला झालेली शिक्षा, मग बळजबरी भारतात झालेले deportation हा घटनाक्रम दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे.
ओशोने जे विकले ते स्वतः वापरले का?
ओशो चे किती शिष्य नंतर enlightened झाले असावेत? Enlightenment असं खरंच काही आहे का?
त्याने जगाला तत्त्वज्ञान/अध्यात्म विकले, पण स्वतःच्या वागणुकीत त्या शिकवणी तो अंगिकारू शकला का?
तो मोह-माये विषयी बोलला, पण त्याला संपत्तीचा आणि शान शौकतचा मोह सुटलाच नाही. तेही मान्य केले तरी त्या प्राप्तीसाठी त्याने शॉर्टकट निवडले. ८० च्या दशकात २.५ मिलियन डॉलर किमतीच्या घड्याळासाठी हट्ट करणारा माणूस Enlightened असू शकतो?
आपण जो पर्यंत ओशो वाचतो तो पर्यंत ओशो फार भारी वाटतो. पण आपण ज्यावेळी ओशो च्या पलीकडे जाऊन अध्यत्माची ओळख करून घेतो तेव्हा ओशो हळूहळू खुजा व्हायला लागतो. ओशो च्या बाळबोध अति सुलभीकरण केलेल्या लिखाणापलीकडे जाऊन कृष्णमूर्ती, गोएंका, निसर्गदत्त महाराज, Sam Harris या विवेकवादी अध्यात्मिक गुरूंची जेव्हा ओळख झाली तेव्हा ओशो अक्षरशः भुरटा वाटायला लागला.
मला तो ड्रग डीलर सारखा वाटतो. ड्रग विकणारा पण स्वतः त्याचे सेवन कधीच न करणारा.
ओशो ने कायम गांधीजी वर सडकून टीका केली. ओशो ने बालपणी RSS च्या शाखांमध्ये घालवलेले दिवस त्यासाठी कारणीभूत असतील असे वाटते.
गांधीजी यांनी कस्तुरबा यांना शौचालय साफ करायला लावले, आपले शिक्षणाविष्यीचे विचार आपल्या मुलावर लादले आणि त्याला शाळेत घातले नाही इत्यादी कारणे देऊन ओशो सांगतो की गांधींच्या या कृती हिंसक होत्या आणि गांधी डेंजर माणूस होता.
गांधी विषयी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत होते. नेहरू सुद्धा वेळोवेळी गांधीजींच्या अवास्तव कल्पनांवर बोट ठेवीत. ओशो चे गांधींविषयी चे विचार चुकीचे होते असे मी म्हणणार नाही.
खरा प्रोब्लेम पुढे आहे.
मग हिटलर वर ओशो ची माया ओसंडून वाहू लागते. ओशो ला हिटलर च्या कृती अहिंसक आणि सहिष्णू वाटू लागतात. हिटलर ने लाखो ज्यु ना गॅस चेंबर मध्ये डायरेक्ट मोक्ष दिला, शरीराची सेकंदात वाफ करून वेदनारहित मृत्यू दिला म्हणून ज्यू नी हिटलर शी कृतज्ञ असावे असे त्याला वाटते.
ओशो चे हिटलर विषयी विचार … मी मराठीत स्वैर भाषांतर केले आहे.
ओशो ने 1985 मध्ये केलेले वक्तव्य,
“ज्यूंसोबत अॅडॉल्फ हिटलरची हिंसा खूपच शांततापूर्ण होती, कारण त्याने सर्वात अद्ययावत गॅस चेंबरमध्ये लोकांना मारले, जिथे तुम्हाला जास्त वेळ लागत नाही.” – “हजारो लोकांना गॅस चेंबरमध्ये ठेवता येते, आणि फक्त एक स्विच दाबला जातो. तुम्ही केव्हा जिवंत होता आणि कधी मेला हे एका सेकंदात तुम्हाला कळणार नाही. एका सेकंदात तुमचे बाष्पीभवन होते.” – “कारखान्याच्या चिमण्या तुम्हाला धुराच्या मार्गाने घेऊन जातात. – तुम्ही त्याला पवित्र धूर म्हणू शकता – आणि हा थेट देवाकडे जाणारा मार्ग आहे असे दिसते. धूर फक्त वरच्या दिशेने जातो.”
ज्यूंबद्दल रजनीशचा सर्वात प्रसिद्ध विनोद तो होता, “तुम्हाला एका फोक्सवॅगनमध्ये 4 जर्मन आणि 500 ज्यू कसे घालता येतील?
साधे; समोर दोन जर्मन, मागे दोन जर्मन आणि ash ट्रेमध्ये 500 ज्यू.”
पुण्यात, ओशोने एक कुप्रसिद्ध व्याख्यान दिले ज्यात त्यांनी असे म्हटले की ज्यूंनी हिटलरला त्यांचा नाश करण्याशिवाय “कोणताही पर्याय” दिला नव्हता. त्याच्या शेवटच्या वर्षांत ओशोने जाहीर केले की “मी या माणसाच्या (अॅडॉल्फ हिटलर) प्रेमात पडलो आहे. तो वेडा होता, पण मी अजून वेडा आहे.” रजनीश म्हणाले की त्यांच्या संन्यासींनी “जगाचा ताबा घ्यावा” अशी त्यांची इच्छा होती आणि हे कार्य कसे पूर्ण करावे याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी त्यांनी हिटलरचा अभ्यास केला होता. रजनीश यांनी हिटलरची अनेक तंत्रे प्रत्यक्षात आणली. ओशोने हिटलरची मनावर नियंत्रण ठेवण्याची Big Lie म्हणजेच “मोठे खोटे” नावाची पद्धत अतिशय प्रभावीपणे वापरली आणि त्याने आपल्या सैन्याकडून (त्याचे शिष्य संन्यासी) संपूर्ण आत्मसमर्पण करण्याची मागणी केली.
जसे मोदीजींनी साध्वी प्रज्ञा ला दिल से माफ नाही केले तसेच ओशो जींनी माँ आनंद शीला ला दिल से माफ नाही केले. थोडक्यात तिला बळीची बकरी केली गेली आणि सगळं काही तिने केलं मी मौनात होतो असं म्हणून ओशो मोकळे झाले.
त्यांच्यावर झालेल्या आरोपांपैकी त्यांनी २ आरोप मान्य केले. बाकीचे आरोप आश्रमातील इतर पदाधिकाऱ्यांवर मारले गेले. आश्रमाला पूर्णपणे dismantle करण्यात आले. लॅब्स नष्ट करण्यात आल्या. शस्त्र साठा जप्त झाला.
ओशोंला साखळदंडामध्ये बांधून विविध जेलची सफर घडवण्यात आली. नंतर त्यांना दहा वर्षांचा कारावास suspended sentence झाले. तेव्हाचे चार लाख डॉलर दंड झाला. शेवटी त्याला जेल मध्ये ठेवण्या ऐवजी भारतात परत पाठवा असे ठरले. ओशो भारतात काही दिवस राहिले तिथे त्यांच्याविषयी कोरेगाव पार्क मधल्या नागरिकांनी सरकार दरबारी तक्रारी केल्या. अमेरिकेत जे घडले ते पुण्यात होऊ नये म्हणून नागरिक साशंक झाले. काही दिवसातच ओशोने भारत सोडला आणि तेरा वेगवेगळ्या देशात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. सगळ्या देशांनी त्यांना प्रवेश नाकारला.मग भारतात परत आले. ५८ व्या वर्षी इतके अध्यात्मिक ज्ञान (?) असून सुद्धा शेवटी झुरुन झुरुन वारले.
आनंद शीलाला २० वर्षांचा कारावास झाला. काही वर्षांनी चांगल्या वागणुकीच्या बेसवर तिला सोडण्यात आले. तिने अमेरिका सोडली आणि स्वित्झर्लंड मध्ये वृद्धाश्रम चालवते आहे.
ओशोला लाफिंग गॅस म्हणजे नायट्रस ऑक्साईड चे न सुटू शकणारे व्यसन होते. त्या व्यसनामुळे इतके विलासी जीवन जगुनही तो फक्त ५८ व्या वर्षी वारला.
टीप: इथे लिहिलेले स्पष्टीकरण माझे वैयक्तिक मत आहे, त्यामधील त्रुटी दाखवल्यास माझ्या ज्ञानात भर पडू शकेल आणि मला आनंदच होईल.
– Amol Sale