जातिअंत हा संतांचा अजेंडा नव्हता. असूही शकत नव्हता. कारण, जातीचा उत्पादन संबंध मोडला नव्हता. वाळवंटी सर्व भेद मिटवून कीर्तन रंगी ‘नाचू’ एवढेच त्यांचे श्रेयस होते.
पण ही जात उतरंडीची व्यवस्था ईश्वर निर्मित आहे अशी गाढ श्रद्धा असताना ईश्वरासमोर सारे समान आहेत, असा पुकारा करणेही विद्रोहच होता.
भौतिक समता येण्याची कुठलीच शक्यता नसताना ही भौतिक समतेच्या दुधाची तहान, संतांनी अध्यात्मिक समतेच्या ताकावर भागवली.
आज भांडवली उत्पादन संबंध सार्वत्रिक झाल्यावर आणि भौतिक समता वास्तवात येण्याचा मार्ग खुला झाल्यावरही हभप मंडळी, जे अध्यात्मिक समतेचे ताक विकण्याचा धंदा करीत आहेत, ती लबाडी आहे.
अध्यात्मिक समतेचा पुकारा हे वारकरी संप्रदायाचे तत्कालीन संदर्भात पुरोगामीच पाऊल होते. पण आज भौतिक समता नजरेच्या टप्प्यात आल्यावर वारकरी संप्रदायाचे अध्यात्मिक समतेचे हे लटके पुरोगामीत्व संपुष्टात आले आहे.
आजचे पुरोगामी वारीत गेले तरीही त्यांचा पुरोगामी अजेंडा भाव भक्तीची ‘ब्रह्मानंदी’ टाळी लागलेला वारकरी स्वीकारणार नाही. त्याचा शेतीतील उत्पादन संबंध भांडवली उत्पादनसंबंधातही जातबंधूंच्या द्रव्याने उर्फ भावकीने जखडलेला आहे. ज्यांना शेती नाही त्या वारकऱ्यांचा आजही शेतीशी सामंत – सेवक संबंधच दृढ आहे.
शेतीच्या भांडवलीकरणाने आलेल्या नव्या परात्मिकरणावर वारीचा महिना पंधरवडा विरक्तीचा आणि कीर्तन रंगी नाचूचा उतारा म्हणजे प्रपंचातील विसावा आहे. हा विसावा परिवर्तनवादी नाही. स्थितीवादीच आहे. त्यामुळे त्याला भांडवली शोषक शासक व्यवस्थांचेही ‘छत्रीरेनकोटी’ पाठबळ आहे !