- 14
- 2 minutes read
“रमाई रडणारी नव्हे तर लढणारी होती.”

” रमाई रडणारी नव्हे तर लढणारी होती.”
त्यागाला ही वाटावी लाज ,
असा रमाई तुझा त्याग
तुझ्या त्यागातुनचं आम्हा,
लेकरांना आला अभिमान…!!
नऊ कोटीची माता त्यागमूर्ती रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील छोट्याशा वणंदगावात अत्यंत गरीब महार कुटुंबात झाला.आईवडिल वारल्याने छोट्या तीन भांवडणा सांभाळण्याची जबाबदारी रमाईवर आली. मामा त्या सर्वांना मुंबईला घेवून आले. परस्थितीने इतकं शहाणपण आल की ” आयुष्याशी रडण्याचा नव्हे तर लढण्याचा निर्धार केलेली रमा बालवयातच मोठ्या माणसा सारखे वागू लागली.हुशार,समजुदार प्रेमळ आणि धाडसी रमा सर्वांना आवडणारी होती.
सुभेदार रामजी बाबांनी तर रमाला पहिल्याच भेटीत पाहताच क्षणी आपली सून करण्याचे निश्चित केले. ” हिऱ्याची खरी पारख जव्हारीच करू शकतो. त्यांना माहीत होते की , माझा भिवा जगाला प्रकाशित करणारा तळपता प्रज्ञासूर्य आहे. त्याचा सहवास आणि त्यांच्या संसाराची दाहकता फक्त रमाच सहन करू शकते. अगोदर एका मुलीशी भिवाचे करण्याचे निश्चित झाले असताना त्यांनी लग्न मोडले.त्यासाठी
जातपंचायतला पाच आने दंड देखील भरला.१४ डिसेंबर १९०७ साली मुंबई भायखळा मंडईत विवाह झाला. त्यावेळी रमाई ९ वर्षाची तर भीमराव १४ वर्षाचे होते.ग्रहप्रवेश करून घरी आलेल्या सुनेला रामजीबाबा म्हणाले ” रमा मी तुझी एका धगधगत्या सूर्याशी संसार गाठ बांधली असून माझा भिवा हा जगाचा प्रज्ञासूर्य होण्यास त्याच्या शिक्षणात खंड पडू देऊ नकोस.त्यासाठी तुला तुझ्या सर्वस्वाचा त्याग करून त्याची सदैव सावली बनून राहिली पाहिजेस
९ वर्षाच्या रमाला एव्हढ्या मोठ्या शब्दाचा अर्थ कळला नसला तरी आपल्याला उच्च शिक्षण घेणारा पती मिळाल्याचा तिच्यासाठी अती उच्चतम आनंदाचा क्षण होता. वडील समान रामजी बाबाचे शब्द खरे करण्या साठी तन मन धनाच्या त्यागाची गाठ
आयुष्याशी बांधून रमा बोले …
आपला समाज साहेब आहे कोटी कोटी
त्यांना डांबून ठेवणारी आहे गुलामी मोठी
तुमचा जन्म आहे त्यांच्या उद्धारासाठी
साहेब तुम्ही खूप शिका तुमची ही पत्नी रमा
रात दिन सदैव आहे तुमच्या साठी !!!
डॉ .बाबासाहेब यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेऊन बी ए, एम ए,पी एच डी, एम एस सी, बार अट लॉ, डी एस सी , डी लीट,अश्या ३२ डिग्र्या आणि ९ भाषा अवगत केल्या.
अशा २७ वर्षांच्या काळात रमाईने केलेल्या
त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही.पतीच्या शिक्षणासाठी गवऱ्या वेचून पैसा साठविला. हौसमौज न करता मन मारून काटकसरीचा संसार करताना कोटी कोटी दलितांची माता असलेल्या रमाईला मात्र गरिबी ऊपासमारी आणि डॉक्टर इलाज औषदाविना गंगाधर, राजरत्न, रमेश व इंदू (मुलगी) ही स्वतःची चार मूळ गमवावी लागली. साहेबाच्या शिक्षणासाठी मन कठोर करून साहेबांना प्रत्येक वेळी मुलं मेल्याचे दुःख कळू दिले नाही.
नांदन-नांदन होत रमाचं नांदन
भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण
माणसाला सूर्याचे चटके बसतात.पण रमाईने आयुष्यभर टिपुर चांदन्याचे चटके सोसले आहेत.
आपला उध्दार होणारे मत आणि स्वाभिमान विकणाऱ्या आजच्या आंबेडकरी जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की ,त्यावेळी रमाईचे दुःख आणि हाल पाहून कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून मदतीची रक्कम देऊ करताच साहेबांना कमीपणा येऊ नये म्हणून स्वतःची चूल बंद असताना देखील रमाईनी मदत नाकारून आपल्या पेक्षा जास्त गरीब असलेल्या
परिवारास मदत करण्यास सांगितले.याची आजच्या फुकट्याना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. वाघाच काळीज असणारी आणि व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास असणारी रमाईचा हा कणखरपणा आणि धाडस जगा समोर आलाच पाहिजे.
वदे रमाई साजणे बाई , काय सांगू मी ती नवलाई
मन गहीवरल फूलून बहरल ,पतुर आलय आज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
हे गाणं एकायला फार मधुर वाटत असल तरी त्याचा
मागचा त्याग मोठा आहे.कारण बडोदा संस्थानकडून लंडनला वेळेवर स्कॉलाशिप मिळत नसल्याने “ज्ञान घेण्यासाठी वेळ नसलेले आणि जेवणासाठी पैसे नसलेल्या साहेबासाठी रमाईचा जीव कासावीस झाला.
अठरा विश्व दरिद्र्याशी सामना करीत पतीच्या शिक्षणासाठी साता समुद्रापार 14 रुपयांची
मनीऑर्डर पाठविनारी रमाई ही जगाच्या इतिहासातील पहिली पत्नी असावी ?बॅरिस्टर झालेले डॉ.आंबेडकर लंडन हून येत असताना जहाज समुंद्रात बुडाल्याची बातमी आली.संपूर्ण समाज शोकाकुल झाला. परंतू त्या जहाजात त्यांची पुस्तकं होती .बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब मागच्या जहाजाने येत असल्याची बातमी येताच रमाईच्या
आनंद गगनात मावेनासा झाला.त्याच्या स्वागतासाठी
मुंबई बदर कडे सगळा समाज लोटला.रमाई ही घाई घाईने निघाली .पण बॅरिस्टरची बायको गळ्यात सोन्याचा फुटका मनी नाही पण चांगली साडी देखील नाही. शोधा शोध करता कोल्हापूरात शाहू महाराजानी डॉ.बाबासाहेबांना जरीचा फेटा बांधून
सत्कार केला होता. तो फेटा साडी म्हणून परिधान करून रमाई साहेबाच्या स्वागताला निघाली.लोकांच्या गराड्यात असलेल्या बाबासाहेब यांची फक्त नजरा नजर झाली.मुंबईत देखील सतत सभा बैठका लोकांचा गराड्यात बाबासाहेब राहायचे.
समाजाला प्रकाशित करणारे बाबासाहेब प्रकाश होते
तर त्या प्रकाशाची पेटती वात रमाई होती.
परमपूज्य,बोधीसत्व, ,महामानव,मूकनायक, महानायक,भारतरत्न विश्वरत्न , युगपुरुष, नॉलेज ऑफ सिम्बॉल आणि प्रज्ञासूर्य अश्या विविध उपादीनी गौरविलेला ज्ञानाचा महामेरू हा उच्चतम कळस असला तरी त्या कळसाचा पाया नऊ कोटीची माता रमाई आहे.डॉ.बाबासाहेब 16 ऑगस्ट 1926 रोजी मित्र दत्तोबा पवार यांना संतान वियोगाचे दु: ख पत्रात लिहितात की, “आम्ही चार सुंदर रुपवान मुलं दफन केली त्यात तीन मुलगे आणि एक मुलगी होती .मुलांच्या मृत्यूमुळे जीवनातील आनंद निघून गेला आहे . जसे बायबलमध्ये लिहिले आहे: “तू पृथ्वीचा आनंद आहेस.” जर हे पृथ्वी त्याग असेल, तर पृथ्वी आनंदित कशी असेल? “माझ्या परिक्त जीवनात मला पुन्हा पुन्हा असेच वाटते. पुत्रांच्या मृत्यूमुळे माझे जीवन अगदी काटेरी झुडुपेने भरलेल्या बागांसारखे आहे. आता माझे मन इतके भरून आले की मी अधिक लिहू शकत नाही.
माता रमाइने साहेबाच्या शिक्षणात आणि समाज कार्यात अडथळा येऊ नये म्हणून परम कोटीची दुःख सहन करून साहेबाच्या कार्याला नेहमीच साथ दिली. साहेबाच्या सततच्या काळजीने
स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने रमाईचा चिंता कडून चिताकडचा प्रवास सुरू झाला . तब्बेत बिघडलेल्या रमाईला साहेबांनी हवा पाणी बदलासाठी धारवाडला पाठविले.परंतु तेथे ही दुःखाने त्याची पाठ सोडली नाही.अनुदान न आल्याने धारवाड वसतिगृहातील मुलं दोन दिवस उपवासी असल्याचे पाहताच रमाईने वैराळ गुरुजींकडे आपल्या हातातील सोन्याच्या पाटल्या देवून सोनारकडे मोडून मुलाच्या जेवणाची सोय केली.
आजारी रामुची साहेबाकडे अखेरची इच्छा होती की,मला एकदा तरी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मणीला डोळे भरून पाहायचे आहे. जे मूर्ख बौध्द आजही देवाला जातात .त्यांनी लक्षात घेतले पाहिजे . तुमच्या कल्याणासाठी डॉ.बाबसाहेबानी रमाईची अखेरची देखील इच्छा पूर्ण करू शकलेले नाहीत .कारण
भावनिक होऊन अखेरची इच्छा देखील पूर्ण करू शकत नाहीत.पण बाबासाहेब म्हणतात की, रामू अस्पृश्यांना हिंदू मंदिरात जाण्यास बंदी असेल तर अशा मंदिरात जाऊन मोक्ष मिळणार नाही . रामू त्या पंढरपूरला लाजवेल असे मी पंढरपूर निर्माण करीन.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोलल्या प्रमाणे त्यानी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच नव्हे तर जगाच्या पाठीवर जेथे जेथे पाऊल टाकले तेथे या पंढरपूरला लाजवेल अशी अनेक पंढरपूर निर्माण केली.त्या
पंढरपूरच्या चराचारत रखामाई सारखी रमाई आहे.
परंतु हे वैभव पाहण्या अगोदर माता रमाई यांनी २७ मे १९३५ रोजी जगाचा निरोप घेतला.
माझ्या शिक्षण आणि समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर फक्त दुःख आणि दुःख सहन करणारी सहचरणी सोडून गेल्याचे दुःख सहन न झालेल्या बाबासाहेब यांनी भगवी वस्त्रानिशी वैराग्याने स्वतःला
राजगृह मध्ये कोंडून घेतले.सर्वांनी समजूत काढली.पण दरवाजा काही उघडला नाही.
आपल्या रामुची साथ नसलेल्या साहेबांना अभास
झाला.रमाई म्हणाल्या साहेब तुम्हीच असे गर्भगळीत झाला तर समाजाचा कोण उद्धार करणार ? मरणा नंतर ही माझी रामू मला समाजाच्या कल्याणाचे
बळ देतेय.आणि मी दुःख करतोय .असे म्हणत
बाबासाहेबानी वैराग्य सोडून समाज कार्याला लागले.
१९४० साली ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान‘ च्या अर्पणपत्रिकेत बाबासाहेब लिहितात की , ‘हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिन तयारी दर्शाविली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे.’ डॉ.बाबासाहेबांच्या जीवनचरित्रात माता रमाईचे आयुष्य संघर्षमय असताना जीवनचित्रण मात्र सोशिक स्त्रीचं दाखविले जाते.रमाईच्या दुःखाची परिभाषा समजून आजच्या तरुण पिढी समोर काय आदर्श ठेवतोय ? यावर देखील विचारमंथन झाले पाहिजे.
जिजाऊनी शिवबाना घडविले, सावित्रीमाईनी
ज्योतिराव यांना साथ दिली.तशीच साथ माता रमाईने दिल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले. रमाई
फक्त त्यागमूर्ती नव्हे तर कणखर,धाडसी आणि लढाऊ बाणाच्या होत्या.त्याच्या त्यागातून पुणे करार झाला .हिंदू कोड बिल मिळाले. दारू बंदी साठी बावीस प्रतिज्ञा मध्ये मी दारू पिणार नाही.ही प्रतिज्ञा आली.रमाई गाठीला गाठ मारून पैसे साठवून ठेवत असे आणि संकटकाळी साहेबाना देत असे. डॉ.बाबसाहेब यांनी एक एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापन केली.त्यात संकट समयी करिता गंगाजळी साठवून ठेवण्याची ही कल्पना रमाई कडून
घेतलेली आहे.म्हणून रमाई वर एकांकिका या नाटक करणाऱ्याना विनंती आहे की रमाई रडणारी नव्हे तर लढणारी दाखवली पाहिजे.
रमाई ही आता नऊ कोटीची माता नसून संपूर्ण जगाची माता बनली आहे.तिने पती , कुठूब आणि समाजासाठी केलेला त्याग हा जगातील महिलांसाठी एक आदर्श आहे. आधुनिक जमान्यात घरा घरात कणखर , धाडसी आणि लढाऊ मुलगी जन्मास येण्यासाठी रमाईची जयंती देशव्यापी नव्हे तर विश्वव्यापी जयंती साजरी झाली पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची इच्छाशक्ती असलेल्या रमाईचा
आदर्श महीलात निर्माण होण्यासाठी रमाईची जयंती साजरी केली पाहिजे. नुसत्याच दागिने साडी माडी आणि गाडीत दंग असलेल्या महिला आणि पुरुषांना रमाईच्या समाजासाठी केलेल्या त्यागाची जाणिव होण्यासाठी जयंती साजरी केली पाहिजे.रमाई म्हणजे शोषीत पिढीत मागासलेला वंचित ,व्यक्ती कुथुंब ,आणि समाजाचे वैचारिक मंथन करण्याचे परिमार्जन आहे.म्हणून डॉ.बाबसाहेब यांची जगभर जयंती साजरी होते .तशीच रमाई याची देखील जगभर जयंती साजरी झाली पाहिजे. वरळीतील माता रमाई स्मारकाला अंतर राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला पाहिजे.रमाई रडणारी नव्हे तर लढणारी होती.तर आम्ही देखील तोच आदर्श घेवून अनेक कारणांनी रडणे सोडून सत्ता परिवर्तन केले पाहिजे.कारण
समता मूलक जगाची माता रमाईच्या त्यागाला
अभिवादन करताना तिच्या त्यागाला आणि अपेक्षांना
क्रांती मध्ये यशस्वी करणे ही खरी रमाईची जयंती आहे.
माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आनंद म्हस्के
आंबेडकरी विचारवंत