मराठी बाण्यांची “आत्मशाहीरी” तिचे “मी”पण तुमच्याही ओठी
शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. (जीवन काळ: ९ /११/१९२४ ते १०/११/२०१०) स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती संग्राम हे लोकलढे त्यांच्या प्रेरणादायी गाण्यांनी लढले गेले. राष्ट्र, महाराष्ट्र आणि मराठी भाषा त्यांच्या पोवाड्यांचा आणि शाहिरी गीतांचा विशेष होता. त्यांनी आपल्या शाहिरीतून राष्ट्र – महाराष्ट्राचा इतिहास – भूगोल सांगितला, तसे वर्तमान – भविष्यही सांगितले आहे. त्यांच्या ह्या ऐतिहासिक कार्याला मानवंदना देण्यासाठी ज्येष्ठ व युवा शाहीर “आत्मशाहिरी” हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम शनिवार, १मार्च रोजी संध्या. ७.३० वाजता छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केला आहे. संभाजीनगर येथील युवा शाहीर अजिंक्य लिंगायत आपल्या २० युवक – युवती गायक – वादक हे या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण असतील. शाहीर विवेक ताम्हणकर, लोक संगीतकार व गायक मनोहर गोलांबरे यांचा खडा आवाज कार्यक्रमात रंग भरेल. तसेच, आत्माराम पाटील यांच्या पत्नी शाहीर इंद्रायणी पाटील आणि ज्येष्ठ शाहीर मधू मोरे हे दोघे वयाच्या ८५व्या शाहिरांच्या आठवणींप्रमाणेच त्यांची गीतेही सादर करतील. विनोद सम्राट संतोष पवार हे ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत. “हा ऐतिहासिक ठेवा रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने अनुभवावा,” असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ———————–
त्रिकाळज्ञानी शाहीर पालघर – सफाळा ही जन्मभूमी आणि मुंबई – लोअर परळ ही कर्मभूमी असलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांनी १९४६ साली महात्मा गांधींच्या प्रेरणेने ‘खेड्यात चला’ हे दीर्घकाव्य लिहिले. नंतरच्या काळात त्यांनी पोवाडा लिहिण्यास सुरुवात केली. ‘पुरोगामी छत्रपती (शाहू महाराज)’, ‘भीमू कांबळेचा पवाडा’, ‘१९४२ क्रांतीचा रणतुरा’, ‘१९५६चा आंबेडकर धर्मपरिवर्तनाचा पवाडा’ इ. गाजलेले पोवाडे लिहिले. “गोवा मुक्ती- संग्रामात सेनापती बापट सत्याग्रही म्हणून गोव्याच्या हद्दीत प्रवेश करत असताना पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेने अस्वस्थ होऊन आत्माराम पाटील यांनी ‘जय गोमांतक’ हा पोवाडा रचला. अमरशेखांना तो खूप आवडला. ‘मी स्वत:च हा पोवाडा गाणार’ म्हणत अमरशेखांनी आत्माराम पाटलांना सत्याग्रहात सहभागी करून घेतले. गोवा मुक्तीसंग्रामावर ‘जय गोमांतक’, ‘श्री गोमांतक वर्णन’, ‘फिरंगी सैतानशाही’, ‘गोवा सत्याग्रह मोहीम’ व ‘गोविंदा आला’ हे पाच पोवाडे त्यांनी लिहिले. हे पंचक अमरशेख, अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवले. त्यानंतर हे पाच पोवाडे व अण्णा भाऊ व अमरशेखांची गीते असलेली ‘शाहिरी हाक’ ही पुस्तिका आत्माराम पाटील यांनी छापली.” अशी माहिती लोकशाहिरीचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांचा ‘संयुक्त महाराष्ट्राचा पवाडा’ व त्यांनी लिहिलेले ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा।’ हे गोंधळगीत विशेष गाजले. “मिसळ झाली मुंबई” या गाण्यातून त्यांनी ६० वर्षांपूर्वी आजचे वर्तमान सांगितले आहे. यामुळे त्यांची “शाहीरमहर्षी” अशी ओळख झाली.