• 48
  • 1 minute read

राजनारायण हे साधेसुधे नेते नव्हते.

राजनारायण हे साधेसुधे नेते नव्हते.

       तत्कालीन सर्वात सशक्त नेत्या इंदिरा गांधी यांना त्यांनी १९७७ साली रायबरेली मधून हरवले होते. त्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनाही त्यांनी १९७९ साली हरवले होते. त्यांनी जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर १९७७ साली दिल्लीत जाती तोडो संमेलन घेतले. त्या संमेलनात त्यांनी अनेकदा हरिजन असा शब्द वापरला. उपस्थितांमध्ये एक एलएलबीच्या प्रथम वर्षाला शिकणारी वीस वर्षांची मागासवर्गातून येणारी मुलगी बसली होती. तिने हरिजन या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवला आणि आम्ही हरिची तर तुम्ही काय सैतानाची मुले आहात का? हरिजन शब्द वापरला जाऊ नये. राजनारायण यांनी आपले शब्द मागे घेतले. त्या मुलीची आक्रमकता पाहून उपस्थितांमध्ये काही बामसेफचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी ही घटना कांशीराम यांना सांगितली. नंतर त्या मुलीचा पत्ता काढून कांशीराम तिला भेटले. तिला आंदोलनासाठी तयार केले. घरच्यांचा विरोध पत्करून त्या मुलीने चळवळीत उडी घेतली आणि पुढे इतिहास घडवला. ती मुलगी होती, बहेन कुमारी मायावतीजी.

आज आम्ही पँथर्सच्या कहाण्या वाचून शहारून जातो. मला खरच वाटतं की बहेनजीच्या प्राईम टाईम मध्ये त्यांची आक्रमकता समजून घेण्यायोग्य आम्ही आहोत का?

पुढे कांशीराम साहेबांच्या सोबत बहेनजीनी संपूर्ण देश पिंजून काढला. करोडो साथीदार होते पण साहेबांनी बहेनजीना आपला उत्तराधिकारी नेमले याचे कारण आपण समजून घेतो का? बहेनजी यांना उत्तराधिकारी नेमल्या नंतर त्यांच्याविरोधात गरळ सुरू झाली ती काही लपून राहिली नाही. पण ज्यांनी ज्यांनी या बदनामीत भाग घेतला त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेली चळवळ तरी प्रामाणिकपणे पुढे नेली का? की ठाण्या पुण्याला फ्लॅट आणि गावी घर बांधून आता नातवंडांना खेळवण्यात मश्गूल झाले याचे संशोधन कोण करणार?

१९८५ साली बहेनजी यांनी बिजनौर लोकसभेचे निवडणूक मीरा कुमार आणि रामविलास पासवान यांच्याविरोधात लढली तेव्हा विरोधकांकडे गाड्यांचा ताफा असे, बहेनजी यांनी एक एम्बेसिडर घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. तेव्हा पराभव झाला. पण १९८९ साली पुन्हा बिजनौर मधून लोकसभा लढवली तेव्हादेखील समोर जनता दलाचा अत्यंत सशक्त उमेदवार मंगल राम प्रेमी निवडणूक लढत होता. त्याचा तेव्हा १०० गाड्यांचा ताफा मतदारसंघात फिरत होता. बहेनजीनी उपलब्ध संसाधनांनी मोठी लढत दिली. ही तीच निवडणूक होती ज्यात कांशीराम साहेबांनी पहिल्यांदा बूथ सेक्टर बांधणी राबवली होती. ती फळाला आली आणि बहेनजी निवडून आल्या. सुमारे ९.५० लाख मतदार आणि ९४१ बूथ तिथे होते. बहेनजी यांनी योजनाबद्ध विजयश्री खेचून आणली होती. दोनच वर्षांत हाच मंगल राम भाजपकडून आणखी ताकदीनिशी लढला आणि बिजनौर सीट बसपाने गमावली. पण तोपर्यंत तेव्हा पस्तीशीही न ओलांडलेल्या मायावती या नावाने भारतीय राजकारणातील आपले उपद्रव मूल्य सिद्ध केले होते.

१९९३ च्या यूपी निवडणुकीत भाजप १७७, सपा १०९ आणि बसपा ६७ आमदार निवडून आले होते. बाबरी पतन आणि मुंबई बॉम्बस्फोट नंतर भाजपला डोळे झाकून सत्तेची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. सपा बसपा युती झाली. ही युती निवडणूक पश्चात सत्ता स्थापनेसाठी होती. मिले मुलायम कांशीराम ढेर हो गये जय श्रीराम ही घोषणा तेव्हा प्रसिद्ध झालेली. तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार ही घोषणा या काळात सपाच्या लोकांनी पसरवली. ही बसपाची घोषणा नव्हती. याबाबत खुद्द कांशीराम साहेबांनी खुलासा केलेला होता.

ही युती दीड वर्षे सत्तेत होती. असे म्हणतात या दीड वर्षांत बहेनजी एक दिवसही स्वस्थ बसल्या नाहीत. रोज त्या उत्तर प्रदेश सरकारच्या विविध प्रशासकीय खात्यांना भेट देत होत्या. कामकाज समजून घेत होत्या. सत्तेत असल्या कारणाने त्यांना कुणी अडवत नव्हते. ही बहेनजी यांची ट्रेनिंग होती. २ जून १९९५ ला गेस्ट हाऊस कांड नंतर बसपा सत्तेतून बाहेर पडली.

भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार असताना बसपाकडे मुख्यमंत्री पद ठेवून सत्तेत बसणे ही खेळी एखादं दोन जागेवर किंवा हल्ली तर एकही जागा न देता, सत्तेत कणभरही वाटा न देता युत्या आघाड्या करणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कधीही समजणार नाही का?

बाबरी पतनानंतर सत्तेसाठी आसुसलेल्या भाजपला बसपाने ६ महिन्यातच केलेल्या कामगिरी वरून बसपाची रणनीती लक्षात आली आणि ही युती तुटली.

लोकांना Performance दिसतो पण Preparation दिसत नाही. आणि काही लोकांना Performance ही मानायचा नसतो. बहेनजी बनणे सोपे नाही.

कालपर्यंत आपल्या सोबत खानावळीत जेवणारी मुलगी सत्तेत बसते म्हटल्यावर आमच्याही अनेक विद्वानांनी बहेनजी यांच्याबद्दल अपप्रचार सुरू केला. अनुसूचित जातीचे ११% मतदान महाराष्ट्रात असताना ११ जागाही न मिळवता पाठिंबा देण्याला राजकारण म्हणणारे लोकं बहेनजी यांनी युपीतील २४% ब्राम्हण मतदान फिरवून पूर्ण बहुमताची सत्ता कशी बनवली ही केवळ दंतकथाच वाटू शकते.

पण या पूर्ण ५ वर्षांच्या काळातील बहेनजी यांची कामगिरी ही आदर्श मुख्यमंत्र्याचा वस्तुपाठ आहे. म्हणजे २००९ साली जेव्हा लिबरहान आयोगाचा रिपोर्ट प्रसिद्ध होणार होता तेव्हा यूपी सोडून इतर काँग्रेस आणि भाजप प्रणित सत्ता असणाऱ्या राज्यात सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या पण यूपीमधली एकही शाळा बंद नव्हती. पहिल्याच सहा महिन्यात दीड लाख गुंडांना जेरबंद केले होते. एकेक भूमिहीन शेतकऱ्याला ३ एकर जमीन कसायला दिली होती. पदोन्नती मध्ये आरक्षण दिले होते. २०१२ ला अखिलेश सत्तेत आल्यावर त्यांनी हे सर्व निर्णय फिरवले होते. आज युपीसाठी भाजपला हरवायचे म्हणून आमची लोकं अगदी सपालाही बिनशर्त पाठिंबा द्यायचे कमी करत नाहीत.

आज बहेनजी सत्तरीत आहेत. मी बसपाच्या मुख्य प्रवाहात आहेत. बहेनजी रोज किती काम करतात हे मला माहिती आहे. महाराष्ट्रात बसपाची वाढ न व्हायला महाराष्ट्रातील पदाधिकारी जास्त जबाबदार आहेत हे माझे निरीक्षण आहे. प्रांतवाद आणि गटबाजी, आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे न संपणारे VIP Syndrome यांनी पक्ष खुंटला. आणि त्याला त्या त्या गटाला शरण गेलेले कार्यकर्तेही तितकेच कारणीभूत आहेत.

आज आमची लोकं बहेनजीना दूषणे देतात, पण या दूषणवीरांनी आपापले मतदारसंघ का बांधले नाहीत? बूथ सेक्टर का बांधले नाहीत? बहेनजीनी अडवले होते का? बहेनजी घरातून बाहेर पडत नाहीत म्हणणारे स्वतः तरी घरातून बाहेर पडले का? दोन कार्यक्रम आणि दोन निवडणूकात दोन दिवस फिरून खिन्न होणारे, माझा फोटो खाली त्याचा फोटो वर, माझे नाव खाली त्याचे नाव वर, माझा फोटो टाकला नाही, माझे नाव टाकले नाही, मला कुणी विचारले नाही अशी म ची बाराखडी चालवणारे बहेनजीवर टीका करतात आणि खोबरे तिकडे चांगभले म्हणत कुणाचीही तळी उचलतात हे किती दुःखदायक आहे.

भक्ती, अंधभक्ती म्हणत ही पोस्ट १००% निकालात काढली जाऊ शकते. पण या लढ्यात आपल्याला आपलेही नाणे एक ना एक दिवशी खणकावून दाखवावे लागणारच आहे. ते आत्मटीका आणि चळवळीचे तंत्र समजून घेतल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी आपण तयार आहोत की नाही?

डॉ. आशिष तांबे

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *