विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

आजचा मनुष्य बाह्य जग जिंकण्यात गुंतला आहे; पण स्वतःला जिंकण्याचे सामर्थ्य हरवत चालला आहे. विज्ञानाने जग जवळ आणले, पण मन दूर गेले. माहिती वाढली, पण शांती कमी झाली. प्रगती झाली, पण समाधान हरवले. अशा काळात मनुष्याला सर्वात जास्त गरज आहे ती मनाची साधना आणि या साधनेचा सर्वात शुद्ध, वैज्ञानिक आणि प्रभावी मार्ग म्हणजे विपश्यना. विपश्यना म्हणजे ध्यान नव्हे, धर्म नव्हे, कर्मकांड नव्हे तर ती आहे मनुष्याच्या अंतर्मनावर केलेली वैज्ञानिक शस्त्रक्रिया. मिथ्या, आडंबर आणि अंधश्रद्धेपासून मुक्त असलेली ही साधना अनुभवावर आधारित आहे. श्रद्धेवर नव्हे, तर सत्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीवर उभी असलेली ही विद्या मनुष्याला दुःखाच्या मुळांपर्यंत घेऊन जाते आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते.

                    विपश्यना ही साधना तथागत गौतम बुद्धांनी मानवतेला दिलेली अमूल्य देणगी आहे. बुद्धांनी जगाला सांगितले की, दुःख बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. लोभ, राग, द्वेष, भय, अहंकार, आसक्ती याच मनुष्याच्या दुःखाच्या मूळ कारणे आहेत. बुद्धांनी बाह्य पूजा-अर्चा नव्हे, तर अंतर्मनाची साधना शिकवली. त्यांनी सांगितले मनाला पाहा, मनाला ओळखा, मनाला शुद्ध करा. विपश्यना म्हणजे स्वतःकडे पाहण्याची कला. श्वासावर लक्ष केंद्रित करून सुरू होणारी ही साधना हळूहळू मनाच्या खोल स्तरावर पोहोचते. शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदनांचे निरीक्षण करताना साधकाला जाणवते की, सर्व काही क्षणभंगुर आहे. सुखही क्षणिक आहे, दुःखही क्षणिक आहे. याच अनुभूतीतून मनाला समत्व प्राप्त होते. प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करण्याची क्षमता निर्माण होते आणि याच क्षणी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वात क्रांती सुरू होते.

                    विपश्यना ही केवळ ध्यानपद्धती नाही; ती मनुष्याच्या स्वभावावर केलेली शुद्धी प्रक्रिया आहे. या साधनेमुळे लोभ कमी होतो, राग निवळतो, भय दूर होते, हिंसेची प्रवृत्ती कमी होते, व्यसनांची साखळी सैल होते. मनुष्य संयमी, विवेकी आणि करुणामय बनतो. विपश्यना म्हणजे मनुष्याला स्वतःच्या दोषांचे दर्शन घडविणारी आरसा आहे. जेव्हा मनुष्य स्वतःला ओळखतो, तेव्हाच तो स्वतःला बदलू शकतो. ही साधना श्रद्धेवर नव्हे, तर अनुभवावर आधारित आहे. म्हणूनच ती धर्मापलीकडे जाते. बुद्धांनी प्राप्त केलेली अवस्था म्हणजे सम्यक संबुद्धी. ही अवस्था ध्यानाने नव्हे, तर चित्तशुद्धीने प्राप्त होते. बुद्धाचे मन कठोर होते, पण करुणामय होते. तटस्थ होते, पण संवेदनशील होते. दृढ होते, पण कोमल होते. बुद्धत्व म्हणजे देवत्व नव्हे, तर मानवतेचा सर्वोच्च स्तर. आणि त्या स्तरापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना.

                    विडंबन म्हणजे, बुद्धभूमी असलेल्या भारतातच ही विद्या कालांतराने लुप्त झाली. बुद्धवाणीचा आवाज मंदावत गेला. म्यानमारमध्ये मात्र काही साधकांनी या विद्येचे शुद्ध स्वरूप जपले. सुमारे दोन हजार वर्षे ही परंपरा टिकून राहिली. 1969 मध्ये गुरुदेव सयाजी ऊ बा खिन यांच्या परंपरेतून सत्यनारायण गोयंकाजींनी विपश्यना पुन्हा भारतात आणली.    ही विद्या परकी नव्हती; ती भारताचीच होती.

पण काळाच्या प्रवाहात विस्मरणात गेलेली होती. आज भारतातच नव्हे, तर जगातील जवळपास 90 देशांत विपश्यनेचा प्रकाश पसरलेला आहे. आजचा मनुष्य भौतिकदृष्ट्या संपन्न झाला आहे, पण मानसिकदृष्ट्या दरिद्री झाला आहे. स्पर्धा वाढली, पण समज कमी झाली. संपत्ती वाढली, पण समाधान कमी झाले. सुविधा वाढल्या, पण शांती हरवली. अशा परिस्थितीत विपश्यना म्हणजे मनासाठी औषध आहे.

 

जिथे मनाला विश्रांती मिळते,

जिथे विचारांना दिशा मिळते,

जिथे आत्म्याला प्रकाश मिळतो.

 

                   आज जगभरात हजारो विपश्यना केंद्रे कार्यरत आहेत. शिबिरात कोणतेही शुल्क घेतले जात नाही. जेवण, निवास, शिक्षण सर्व नि:शुल्क. हीच विपश्यनेची महानता आहे, व्यवसाय नव्हे, सेवा. विपश्यना व्यक्तीला बदलते आणि बदललेली व्यक्ती समाज बदलते. जेव्हा मनुष्य आतून शांत होतो, तेव्हा समाजातही शांतता निर्माण होते. हिंसा कमी होते, द्वेष कमी होतो, संघर्ष कमी होतो. म्हणूनच विपश्यना ही केवळ आध्यात्मिक साधना नाही; ती सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. विपश्यना म्हणजे स्वतःला जाणण्याचा, स्वतःला बदलण्याचा आणि स्वतःपासून मुक्त होण्याचा मार्ग. आजच्या अस्थिर, असंतुलित आणि अस्वस्थ जगात मनुष्याला जर खरे समाधान हवे असेल, तर त्याला बाहेर नव्हे, आत पाहावे लागेल आणि आत पाहण्याची कला म्हणजेच विपश्यना होय.

 

भवतु सब्ब मंगलम् !

सर्वांचे मंगल होवो, हीच बुद्धाची आणि विपश्यनेची अंतिम प्रार्थना.

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *