- 11
- 1 minute read
सम्राट अशोक : तलवारीतून धम्माकडे-मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय प्रवास
सम्राट अशोक : तलवारीतून धम्माकडे-मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय प्रवास
भारतीय इतिहासात अनेक राजे झाले. काहींनी साम्राज्ये उभी केली, काहींनी युद्धे जिंकली, तर काहींनी संपत्ती आणि वैभवाची शिखरे गाठली. परंतु इतिहासात असे फार थोडे राजे आहेत ज्यांनी युद्ध जिंकूनही युद्धाचा त्याग केला आणि सत्ता असूनही मानवतेचा मार्ग स्वीकारला. अशाच अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे अशोका, ज्यांना इतिहासात सम्राट अशोक महान म्हणून ओळखले जाते. सम्राट अशोक हे केवळ एक सामर्थ्यशाली राजा नव्हते, तर ते मानवतेचा संदेश देणारे, दयाभाव आणि करुणेचा मार्ग दाखवणारे एक अद्वितीय शासक होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या धम्मनीतीचा विचार करताना भारतीय समाजाला आजही नवी दिशा मिळू शकते.
अशोक हे बिंदुसार यांचे पुत्र आणि महान सम्राट चन्द्रगुप्त मौर्य यांचे नातू होते. मौर्य साम्राज्य आधीच विशाल होते, परंतु अशोक यांच्या काळात त्याने प्रचंड विस्तार केला. त्यांच्या सामर्थ्यवान लष्कराने भारतातील मोठा भूभाग जिंकला. त्यांच्या राजवटीच्या सुरुवातीला ते एक कठोर, निर्णायक आणि पराक्रमी योद्धा म्हणून ओळखले जात होते. सत्ता मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक युद्धे लढली. परंतु त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरला तो कालिंग युद्ध कलिंग, इतिहास बदलणारा क्षण. कलिंग (आजचे ओडिशा) जिंकण्यासाठी झालेल्या युद्धाने इतिहासाची दिशा बदलली. या युद्धात लाखो लोक मारले गेले, हजारो जखमी झाले आणि असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. रणांगणावर पडलेली प्रेते, विधवा झालेल्या स्त्रिया, अनाथ झालेली मुले या सगळ्या दृश्यांनी सम्राट अशोक यांचे मन हादरून गेले. इतिहासात सांगितले जाते की या युद्धानंतर त्यांनी रणांगणावर उभे राहून एक प्रश्न स्वतःला विचारला, “या विजयाची किंमत इतकी भयानक का असावी?” याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला.
कलिंग युद्धानंतर अशोक यांनी हिंसेचा मार्ग सोडला आणि बुद्धिस्म स्वीकारले. त्यांनी धम्म हा जीवनाचा आणि राज्यकारभाराचा आधार बनवला. धम्म म्हणजे केवळ धार्मिक विचार नव्हता. तर तो होता दया, करुणा, अहिंसा, सहिष्णुता, सर्व धर्मांचा आदर. सम्राट अशोक यांनी युद्ध जिंकणाऱ्या राजापासून मानवतेचा संदेश देणाऱ्या राजामध्ये केलेले रूपांतर हे जगाच्या इतिहासात अद्वितीय मानले जाते. अशोक यांनी आपल्या राज्यात धम्मनीती राबवली. त्यांनी प्रजेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. रस्त्यांच्या कडेला झाडे लावणे, प्रवाशांसाठी धर्मशाळा उभारणे, विहिरी बांधणे, रुग्णालये उभारणे या सगळ्या गोष्टी त्या काळात अत्यंत प्रगत विचारांचे उदाहरण होते. त्यांनी प्राण्यांच्या हत्येवर मर्यादा आणल्या आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता दाखवली. त्यांच्या शिलालेखांमध्ये प्रजेबद्दलची काळजी आणि नैतिकतेचा संदेश स्पष्टपणे दिसतो.
सम्राट अशोक यांनी बुद्धिसम चा संदेश केवळ भारतापुरता मर्यादित ठेवला नाही. तर त्यांनी धम्मदूत विविध देशांत पाठवले. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ, अफगाणिस्तान अशा अनेक देशांमध्ये बौद्ध विचारांचा प्रसार झाला. इतिहासात सांगितले जाते की त्यांचा पुत्र महिंदा आणि कन्या संघमित्ता यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार केला. यामुळे भारताची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचली. अशोक यांनी आपल्या प्रशासनात नैतिकतेला विशेष महत्त्व दिले. त्यांनी धम्ममहामात्र नावाचे अधिकारी नेमले जे लोकांच्या कल्याणाची काळजी घेत होते. राज्यकारभाराचा उद्देश केवळ सत्ता टिकवणे नसून प्रजेचे सुख आणि कल्याण आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला. आजच्या लोकशाही व्यवस्थेतही हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे.
आज भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थकारणात मोठी प्रगती केली आहे. परंतु सामाजिक तणाव, हिंसा, असहिष्णुता आणि द्वेषाची भावना अनेक ठिकाणी दिसून येते. अशा वेळी सम्राट अशोक यांची धम्मनीती आपल्याला आठवण करून देते की, सत्ता मोठी असते, पण मानवता त्याहून मोठी असते. त्यांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. खरा विजय तलवारीने नाही, तर करुणेने मिळतो. आज भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांमध्येही अशोक यांची छाप दिसते. भारतीय राष्ट्रचिन्हातील लॉयन कैपिटल ऑफ अशोका हे त्यांच्याच काळातील सारनाथ स्तंभाचे शिल्प आहे. तसेच भारतीय ध्वजावरील अशोक चक्र हे त्यांच्या धम्मचक्राचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की आधुनिक भारताच्या मूल्यांमध्येही सम्राट अशोक यांच्या विचारांची छाया आहे. आज जगभरात युद्धे, संघर्ष आणि राजकीय तणाव वाढताना दिसत आहेत. अशा काळात सम्राट अशोक यांचा इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. हिंसेने सत्ता मिळू शकते, पण मन जिंकता येत नाही. मानवतेचा मार्ग स्वीकारणारा राजा खऱ्या अर्थाने महान ठरतो.
सम्राट अशोका यांचे जीवन म्हणजे शक्तीपासून शांतीकडे, युद्धापासून करुणेकडे आणि अहंकारापासून मानवतेकडे जाणाऱ्या प्रवासाची प्रेरणादायी कथा आहे. त्यांनी दाखवलेला धम्माचा मार्ग आजही मानवतेसाठी प्रकाशाचा दीप आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांच्या साम्राज्याचे स्मरण करू नये, तर त्यांच्या विचारांचे स्मरण करावे. कारण खऱ्या अर्थाने महान राजा तोच असतो, जो तलवारीने नव्हे, तर मानवतेने जग जिंकतो. सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान विचारांना विनम्र अभिवादन!
प्रवीण बागडे