मी विचारलेल्या प्रश्नांना, “रिटायर्ड होऊन कर्ताला काय ? नातवंडांना जेऊक कोण देतलं ?” असं खणखणीत उत्तर देणाऱ्या या महिलेला मी गेली २० वर्षे बघतोय. कोंकण रेल्वेच्या मुबंईकडे जाणाऱ्या मांडवी गाडीत ती सावंतवाडीत चढते , राजापूरला उतरते आणि मुंबईवरून येणाऱ्या मांडावीत चढते आणि सावंतवाडीला येते. जेव्हापासून कोंकण रेल्वे सुरू झाली तेव्हापासून ही गाडीत कोंकणात मिळणारी फळे, भाजी आणि इतर वस्तू विकते. नेहमी हसतमुख व या डब्ब्यातुन दुसऱ्या डब्ब्यात जात येत असते. एखादा रेल्वे कर्मचारी समोर आला की “साहेबांनू काय होये ?” असं अगदी हसत मुखाने विचारते. मलाही ती कधी भेटली तर असेच विचारते. मग मी तिच्याकडे काही तरी घेतो, कारण ती पोटासाठी कमावते, श्रीमंत होण्यासाठी नाही.
गेल्याच महिन्यात ती मला सावंतवाडीला भेटली. ती गाडीची वाट बघत एका ठिकाणी प्लॅटफॉर्मवर बसली होती, मी ही रिकामा होतो. तेव्हाच तिला विचारले कि, रिटायर्ड कधी होणार ? ते त्यावर तिने जे मार्मिक उत्तर दिले ते योग्य होते. मुलगा व्यसनी , म्हणून ती नातवंडांना शिकवते. खंबीरपणे घर चालवते. एका नातवाला एम बी ए पर्यंत शिकवलं. तो आता नोकरी करतो. हे सारे सांगत असताना मी तिला एवढया वर्षात कधीच विचारलं नाही म्हणून नाव विचारलं , तर तिने नाव सांगितले सुलोचना ! मग पुढे आडनाव विचारले. तिने सांगितले, “सुलोचना जयभीम ! मी कोणाक घाबरत नाय. मी जयभीम ! माझं नाव सुलोचना जयभीम म्हणूनच सांगते. कोणी माझ्या वाटेक जात नाय. ज्या बाबांनी अमका सगळ्या बायांना एवढं दिल्यानं आनि त्यांचं नावं घेऊक घाबरू कशाक हुया ?”
ती बोलत होती आणि मी एकत होतो. या महिलेला एवढा अभिमान ! तसं पाहू गेल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिला काय दिलं ? दोघं कधी भेटली देखील नाहीत. ही फाटक्या साडीत गाडीत केळी, भाजी विकते, पोटापूरते कमावते, वयाच्या सत्तरी मध्ये गाडीतून धावपळ करते. परंतु केवढा अभिमान ! ज्या महापुरुषाला तिने वाचले नाही —— वाचणार कुठून ? शिक्षणच नाही ! —— कधी पाहिले नाही त्यांच्याबद्दल इतका आदर !!
म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्त हिला प्रथम मानाचा जयभीम आणि मंगल कामना !!