इरोम शर्मिला लष्करी कायद्याच्या विरोधात स्रीजातीच्या अब्रुसाठी तू १६ वर्षे उपोषण केलं तुझ्या योगदानाची मणीपूरी महिलांनी नव्वद मतांच दान करुन बोळवण केली
उपोषणाऐवजी जर तू साध्वी बनून आश्रम काढला असता देशभर तुझ्या आश्रमांचं साम्राज्य निर्माण झालं असतं आणि मग तू इलेक्शनला उभी राहिली असती तर विक्रमी मताधिक्याने निवडून आली असती इतकंच काय मंत्रीही झाली असती
वेडाबाई! महिला बिचाऱ्या फार भाविक असतात त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागण्यापेक्षा त्यांच्यापुढे तू दानपेटी ठेवली असती सोन्या-नाण्यांनी ती ओसंडून वाहीली असती
विषमतावादी ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेचं समर्थन आणि पुरुषप्रधान व्यवस्थेचं गुणगान गाणारी कीर्तन-प्रवचनं केली असती तर महिलांनी मंडपात प्रचंड गर्दी केली असती सहा आकडी बिदागी मिळाली असती
त्या भांडवलावर हर्बल सौंदर्यप्रसादनांचे उत्पादन सुरु करुन आध्यात्मिक साम्राज्याबरोबर आर्थिक साम्राज्यही उभारले असते कणग्यात पैसे साठवले असते
जिवंतपणीच तू नवसाला पावणारी देवी म्हणून ख्यातकिर्त झाली असती. हळदीकुंकवाने मळवट अनं खणानारळाने तुझी ओटी भरायला महिलांची झुंबड उडाली असती.
सोळा वर्षे तपश्चर्या करुन ख्याती तुझी पोहचली फक्त नव्वद जणांपर्यंत पण भगवी-श्वेत वस्र परिधान करणाऱ्या साध्वींना कोणत्याही साधनेविना अख्खा भारत ओळखतो सर्व सुखसाधने त्यांच्या पायाशी लोळतात नि हजारो भक्त त्यांच्या पायांवर लोळण घेतात
तू सायकलीवर फिरत मतं मागत बसली बये! मतांसाठी चारचाकी वाहनातून रोड शो करावे लागतात ‘पुअर’ शो नाही लोक पुअर उमेदवाराला मतं देत नाहीत कारण जो स्वतःची उन्नती करु शकत नाही तो लोकांची उन्नती काय खाक करणार! जो स्वतः खातपित नाही तो आम्हाला खाऊपिऊ घालणं दूरच खाऊपिऊही देणार नाही
मित्रहो! हे विनोदावारी घेऊ नका आता आमच्यासाठी उपोषणं करायला कोणीही धजणार नाही रडायला माणसं मिळत नव्हती आता हसायला मिळत नाहीत उद्या उपोषणकर्तेही भाड्याने आणावे लागले तर नवल नाही