• 79
  • 1 minute read

तुझ्या वीणा भीम अधुरा गं रमाई !

तुझ्या वीणा भीम अधुरा गं रमाई !
भिकू धुत्रे यांची मुलगी रमा व सुभेदार रामजी सकपाळ यांचे पुत्र भीमराव यांचा विवाह मुंबईतील भायखळा भाजीमंडीमध्ये झाला. त्यावेळी रमा 9 वर्षाची व भीमराव 14 वर्षाचे असतांना त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रुढ होती. समाजाने देखील मान्यता दिली होती. विवाह अत्यंत साध्या पध्दतीने पार पडला. रमा लहान असतांनाच आई व वडीलांचे छत्र हरपले होते. तेव्हा रमाच्या कोवळया मनावर आघात झाला. परिस्थिती देखील बेताचीच होती. मामा व काकांनी चार भावंडांचा सांभाळ केला, लग्नाला पुढाकार देखील त्यांनीच घेतला. सागराची अथांगता, सुर्याचे तेज, चंद्राची शितलता, पाण्याची निर्मळता, वृक्षाची सावली, कस्तूरीचा सुगंध आणि अमृताची गोडी म्हणजे रमाई. आई ही  व्यक्ति असते, त्यापेक्षाही एक वृत्ती असते. आश्वस्त करणारी शक्ति असते, तिच्यात पुण्यसंचय आणि अध्यात्मकता ठासून भरलेली असते. सोसण्याने माणूस खंग‍त नाही. खचत नाही आणि कणखर बनतो. आपल्या सहनसीमेचा अंदाज आपल्यालाच नसतो. त्या दु:खाचा आवंढा गिळत होत्या पण कधीच हतबल, हताश, हिरमुसल्या नाहीत. इतक्या सोज्वळ व शांत स्वाभावाच्या रमाई होत्या. इतकी करारी बान्याची माता आजवर बघण्यात आलीच नाही. संवेदनाचा ओलावा हेच नात्याचं बलस्थान असते, हे आपणांस रमाईत आढळते.
भीम आम्हा शेषितांच्या मायेचा पदर
तू त्या पदराची सोनेरी किनार गं रमाई !
भीम वणवा जुल्मी व्यवस्था जाळणारा
तू त्या वणव्याची ठिणगी गं रमाई
भीम जरी जगी ओळख भारताची
तुझ्या वीणा भीम अधुरा गं रमाई !
अत्यंत हालाकीचे दिवस काढणारी माता रमाईने अनेक निधन जवळून बघितले. प्रत्येक निधनाने ती ही थोडी-थोडी मेल्यागत पण त्या खचल्या नाहीत, बेडर झाल्यात. मरण म्हणजे काय ? कळत नव्हते, त्या बाल वयात आई वडिलांचा मृत्यू. 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू, 1914 ते 1917 दरम्यान रमेशचा मृ्त्यू, बाबांच्या सावत्र आई जिजाबाईंचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. 1921 ला बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व 1926 मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले, रमाई एकट्या पडल्या. घर चालविण्यासाठी तिने शेण गोवऱ्या, सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोकं नावे ठेवतील, या भितीने त्या पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8 नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असंत, मुलांसाठी उपास करत असंत. बाबासाहेबांशिवाय दुसरा कूणीच पाठराखा नव्हता, त्यामुळेच त्यांना उपरोक्त उपक्रम करावाच लागला. पोटाची खडगी भरणे गरजेचं होतं. दोन वेळचं जेवन सुध्दा नशीबी नव्हतं. इतके कष्ट रमाईने सोसले. त्याची आच मुलांना सुध्दा लागू दिली नाही. 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती, तरी पण त्या खचल्या नाहीत. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई!
बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते, पण रमाईला एकटी घरामध्ये कसे ठेवायचे म्हणून बाबासाहेबांनी धारवाडच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वस्तीगृह चालवत असत. त्या वस्तीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ती लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाईनी वराळे काकांना विचारले, “दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात कां आली नाही”. त्यावेळी वराळे म्हणाले, ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत. कारण वस्तीगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत. त्यामुळे ती खेळायला बाहेर आली नाहीत. ते रमाईला कंठ दाटून सांगत असतांना, रमाई लगेच आपल्या खोली मध्ये गेल्या आणि रडत बसल्या त्यांनाही ते दु:ख सोसावेना. कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या, “तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत”. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात, लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण झाल्यावर. खूप आनंदी असतात. हे पाहून रमाई देखील आनंदी झाल्या. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, मन गहिवरुन आलं. सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून नाचू बागडू लागली. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.
 
ख्यातनाम गायक, मिलिंद शिंदे म्हणतात,
“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढुनी.. धन्य रमाई | धन्य रमाई |”
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून 18-18 तास अभ्‍यास करु लागले. त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत करत होती. डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज व त्यांना मानणारा चाहता वर्ग मुंबई बंदरात आला. साहेबांचे स्वागत बघण्यासाठी माईला सुध्दा जायचे होते. परंतू, नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती तेव्हा त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच जनासागर उफाळून आला, त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी दिसताच, बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली, ते जवळ गेले. त्यांनी विचारले, “रामू ! तू लांब का उभी राहीलीस’? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असतांना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नव्हते, म्हणुन तर मी अशी लांब उभी आहे, शेवटी, मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.
रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत, इतकी ती त्यांना जोपासत होती. हळवं मन मितभाषी अत्यंत स्वाभिमानी अशा रमाई होत्या. साहेबांसाठी जिवाचं रान करणारी रमाई त्यांना कसलीही इजा होणार नाही यासाठी धडपडणारी रमाई !
रमाईचं शरीर काबाड कष्टाने पोखरून खंगुन गेलं होतं, रमाईचा आजार बळावला होता. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा होत नव्हता. बाबासाहेबांना दुःख अनावर होत होतं. अस्वस्थपणा जाणवत होता, ते काहीच बोलू शकत नव्हते, निमूटपणे रमाई कडे बघत होते. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी 2 वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखे बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या त्यामुळे बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी पडले.
बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत. आजच्या दिनी माता करुणामूर्ती रमाईच्या 136 व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !
 
-प्रविण बागडे
(जरीपटका, नागपूर – 14)`
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *