- 30
- 1 minute read
बाळासाहेब, ही शेवटची संधी !
बाळासाहेब, ही शेवटची संधी !
जेष्ठ पत्रकार- बंधुराज लोणे
( बाळासाहेबांना खुलं पत्र )
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
सविनय जयभीम
ते वर्ष होत १९८४. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादला मी शासकीय वसतीगृहाचा विद्यार्थी होतो. पहिल्यांदा आपल्याला इथे बघितलं होतं. माझ्या बापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा बघितलं होतं. मी बाबासाहेबच्या नातवाला बघितलं याचा मला भारी आनंद झाला होता. मी माझ्या बापाला पत्र पाठवून याची माहिती दिली होती.
बाळासाहेब यानंतर बऱ्याच वर्षनी मी पत्रकार म्हणून आपली अनेकदा भेट घेतली. आपल्या मुलाखती घेतल्या. एकदा तर एका वृत्त वाहिनीच्या चर्चेत आपल्यासोबत माझा वाद झाला.
आपण माझी थेट लायकी काढली होती. त्या आधी १९९७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात आपण इतर रिपब्लिकन नेत्यांना विश्वासात न घेता भाजप पुरस्कृत उनेदवाराला पाठिंबा दिला होता. तेव्हा मी दै. महानगर मध्ये होतो. या संदर्भात मी दिलेली सविस्तर बातमी संपादक निखिल वागळे यांनी हेडलाईन केली होती. या बातनीचा मथळा होता, ” प्रकाश आंबेडकरांचा भाजपशी सौदा “
बाळासाहेब आता मी थेट कळीच्या मुद्यावर बोलतो. प्रत्येक निवडणुकित मतदार संघ , उमेदवार निवडीचे आपले निकष काय असतात हे एक मोठं कोडं आहे. आता गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात आपण उमेदवार दिला. तो त्या मनोहर भिडेच्या संपर्कात असलेला आणि संघाची बांधिलकी मानणारा.. त्याच्यामुळे तिथं भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणूक संपताच तो भाजपत गेला आणि आता भाजपचा आमदार आहे. अशी प्रत्येक निवडणुकीतील अनेक उदाहरणे देता येतील. उमेदवारी देताना आपल्या कार्यकर्त्यापेक्षा आपण वेगळ्याच मेरिटचा विचार करता आणि आपले हे डावपेच यश मात्र देत नाहीत. निवडणूक संपताच हे उमेदवार आपल्याला सोडून जातात. कारण ते फक्त निवडणुकीतील फायद्यासाठी आपले नेतृत्व मान्य करतांना दिसतात.
बाळासाहेब, संघ, भाजपच्या विरोधाची आपली जहाल भुमिका कागदावरच राहते प्रत्यक्षात त्याचा भाजपला काही तोटा झाल्याचं दिसत नाही. उलटं भाजपचा फायदा झाल्याचं आकडेवारी सांगते.
बाळासाहेब, शरद पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर एक संशयाच वातावरण नेहमीच असतं. तशीच परिस्थिती आपल्याबाबत आहे. आपण दिलेला शब्द पाळालच असा विश्वास कोणाला वाटतं नाही. बाळासाहेब हे वेदनादायी चित्र बदलण्याची गरज आहे. शरद पवारांबाबत कोणी काहीही म्हणो, शरद पवारांनी नेमक्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन फुले आंबेडकरी विचाराशी बांधिलकी सिद्ध केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात या टप्प्यावर सर्वोच्च किमत मोजली आहे. देशभरात एक आदर्श म्हणून नावाजलेलं त्यांचं कुटुंब मोडलं. पण पवारांनी कुटुंबाला महत्व न देता फुले आंबेडकरी विचार महत्वाचा मानला. बाळासाहेब राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, किमत तर मोजावीच लागते.
बाळासाहेब, भाजप, संघाच्या विरोधात जोराने बोलून वैचारिकदृष्ट्या या शक्तीच्या विरोधात असलेल्या समजाला, मतदारांना गोलबंद करणे ही आपली कार्यपद्धती आहे अशी टिका होत असते. ही टिका गैरलागू असल्याचं सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे.
बाळासाहेब सध्याचा काळ खुप कठिण आहे. ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा उदय, विकास आणि सध्याच्या काळातील त्याच चारित्र, त्याची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरु आहे हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब या ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा पाडाव करण्याची वैचारिक आणि मैदानातील ताकद फक्त फुले आंबेडकरी विचारधारेतच आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. (युरोपात या फॅसिस्ट शक्तिचा पाडाव कम्युनिस्ट विचाराच्या जनतेनं केला असेल पण भारतीय फॅसिस्टांच चारित्र्य आणि स्वरुप वेगळं आहे) हा संघर्ष अंतिम टप्प्यावर आहे , तेव्हा बाळासाहेब या लढ्याचे अग्रदुत व्हा आपण……‼️…….महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकशाहीवादी जनता आपल्याकडून हीच अपेक्षा करतेय सध्या.
आपला काँग्रेसवर राग आहे. (“माझ्या वंचिताचे राजकारण” या पुस्तिकेत यावर सविस्तर लिहिलं आहे)…… खास करुन यशवंतराव चव्हाण , शरद पवार यांच्यावर आपला वैयक्तिक राग आहे. भैयासाहेब आंबेडकर यांना यशवंतराव चव्हाण यानी त्रास दिलेला आहे आणि काँग्रेस/राष्ट्रवादी संपल्याशिवाय नवीन काही उभं राहणार नाही अशी आपली भुमिका आहे…….पण बाळासाहेब यांना संपवण्याच्या नादात भाजप किती वरचढ झाला हे समजलचं नाही. बाळासाहेब हेही मला मान्य आहे की पुरोगामी पक्ष आणि कॉग्रेस, राष्ट्रवादीला बळ देणं , निवडून आणणं ही
काही आपली जबाबदारी नाही आणि प्रस्थापित पक्षाचे नेते भाजपसोबत साटलोट करतात पण आता काळ सोकावला आहे याचं भान आपल्यालाच ठेवावं लागेल.
बाळासाहेब , सध्या आपणच सांगत आहात की मोदीची सत्ता पुन्हा आली तर संविधान आणि देश काहीच शिल्लक राहणार नाही. (तसं आताही फारसं काही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाहीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेद्वारे निर्माण केलेल्या घटनात्मक संस्था मोडित काढलेल्या आहेतच) तर मोदी आणि शक्तीसाठी ही अटीतटीची लढत आहे. लोकशाहीवादयांसाठी निर्णायक निवडणूक असेल. तर मग, *बाळासाहेब तुमच्यासाठीही ही शेवटचीच संधी आहे. तेव्हा ही संधी आपण वाया जाऊ देऊ नका. बाळासाहेब तुम्ही फक्त लढण्याचा आदेश द्या, बाळासाहेब….
(१) “घटनाकाराचा नातू,” (२) “प्रबोधनकारांचा नातू” आणि राष्ट्र निर्माण कार्यासाठी नेहमी बाबासाहेबांचं सहकार्य घेणाऱ्या व बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड आदर करणाऱ्या (३)”पंडित नेहरू यांचा पणतू” देशात एकत्र फिरले, तर बाळासाहेब सारा देश ढवळून निघेल. “बाळासाहेब या आपल्या ताकदीपुढे कोणी कितीही मोठा असो, ५६ इंचवालाही टिकणार नाही.” तेव्हा बाळासाहेब, ही संधी गेली तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही. आणि इतिहासाला कोण कोणाचा नातू आहे याचं भान नसत, बाळासाहेब.
जयभीम ‼️
– बंधुराज लोणे