• 49
  • 1 minute read

वयाच्या ९४ व्या वर्षी, बाबांची जिद्द,

वयाच्या ९४ व्या वर्षी, बाबांची जिद्द,
वयाच्या ९४ व्या वर्षी, बाबांची जिद्द, त्यांचा उत्साह आणि त्यांची बांधिलकी यांचे एकसंध दर्शन घडवणारा तो क्षण होता.
शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ ची संध्याकाळ, डॉ. बाबा आढाव आणि डॉ. अरुणा रॉय यांच्या संवादामुळे आणि त्याला जोडलेल्या निखिल डे यांच्या आशयपूर्ण उपस्थितीमुळे फार अर्थपूर्ण ठरली.
राजस्थानमधील स्कूल ऑफ डेमोक्रसी आणि पुण्यातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने मी पहिल्यांदाच जवळपास दोन महिन्यांच्या खंडानंतर घराबाहेर पडत होतो… एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या संविधान कट्यासमोरील प्रांगणात हा संवाद झाला.
” सत्यशोधकांची कहाणी आणि आजची आव्हाने “,या विषयावरील माहितीपट अरुणा रॉय यांनी तयार केला आहे. त्यातील बाबांच्या मुलाखतीचा टीझर त्या दिवशी दाखवण्यात आला. त्या निमित्ताने बाबांची मुलाखतही रॉय यांनी घेतली.
या मुलाखतीच्या वेळी या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेला आदरही व्यक्त होत होता.
बाबांनी अरुणा रॉय यांचे खूप कौतुक केले आणि माहिती अधिकारासाठी त्यांनी कशी पूर्वतयारी केली आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या सदस्या म्हणून त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. त्यामुळेच हे कायदे होऊ शकले असे बाबा म्हणाले.
“मी सत्यशोधक आहे आणि सत्याग्रही आहे. आजच्या काळात सत्याग्रही होण्याची गरज आहे…”, बाबांनी सांगितले.
“आपण सत्य शोधले पाहिजे आणि सत्यासाठी बाबांनी जो लढा उभा केला आहे, त्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे”, असे आवाहन अरुणा रॉय यांनी केले.
” बाबांच्या हमाल पंचायतीच्या चळवळीमुळे,माथाडी कामगार कायद्यासाठी त्यांनी जे आंदोलन केले, आणि असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षा कायद्याच्या मागणीसाठी झालेल्या सत्याग्रहामुळे राजस्थानमध्ये आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही त्या दिशेने काम केले “,अशी कृतज्ञता निखिल डे यांनी व्यक्त केली.
एक विलक्षण वेगळा कार्यक्रम दोन अडीच तास सुरू होता…
कष्टकरी महिलांची मोठी उपस्थिती होती. आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, अभ्यासक उपस्थित होते. पूर्णिमा चाकरमाने यांनी छान सूत्रसंचालन केले.डॉ.रॉय यांचा तरुण सहकारी शुभम विश्वास यांनीही या कार्यक्रमाच्या तयारीत सहकार्य केले होते. त्याचे छोटेसे भाषण यावेळी झाले.
मुख्य कार्यक्रमानंतर श्रोत्यामधून आलेल्या प्रश्नांची उत्तरे बाबा, अरुणा रॉय आणि निखिल डे यांनी दिली.
बाबा जेव्हा पुण्यात आणि महाराष्ट्रातील विविध भागात विषमता निर्मूलन शिबिरे घेत असत, त्यावेळी असा माहोल बघायला मिळायचा.
सतत घोषणा आणि चर्चा आणि संवाद यामुळे लोकशाहीला अभिप्रेत असणारे मंथन योग्य रीतीने होत असते.
शुक्रवारी सायंकाळी तसेच झाले.
बाबांबरोबर शीलाताई आल्या होत्या.
गंमत म्हणजे मुलाखतीचा टिझर बघितल्यानंतर संवादाला सुरुवात करताना बाबा म्हणाले की, अरे मी इतकं म्हातारा दिसतो आहे? त्यावर सगळे खळखळून असते! त्या संपूर्ण परिसरात त्या दिवशी सर्वात तरुण होते बाबा आढाव.
इथे एक गोष्ट सांगायला हवी आणि ती म्हणजे बाबा उत्तम गातात. चळवळीची अनेक गाणी विविध शिबिरात ते म्हणत आले आहेत.
महात्मा फुले यांच्या
अखंडाने कार्यक्रमाची सुरुवात करतात तशी आजही झाली. विशेष म्हणजे समारोपाला त्यांनी म्हटलेले क्रांती जिंदाबाद हे गाणे एका टिपेला पोचले होते… बाबांचा स्वर असा काही लागला होता की, आपण ऐकत राहावे आणि बघत राहावे…!
शुक्रवारी कार्यक्रमाच्या आरंभीच बाबांनी आपल्या बांधिलकीचे दर्शन घडवले. त्या दिवशीच्या वृत्तपत्रात दोन स्वच्छता कामगार एका टॅंकमध्ये अडकून मरण पावले होते, त्याची आठवण त्यांनी करून दिली. या सगळ्या अशा कष्टकऱ्यांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण श्रद्धांजली वाहू यात ,असे म्हणून त्यांनी सर्वांना या भावनेत सहभागी करून घेतले.
बाबांचा सत्कार करताना
अरुणा रॉय यांनी उपस्थितांना
स्टॅंडिंग ovation दिले पाहिजे असे आवाहन केले आणि सगळे लोक उभे राहिले.
कार्यक्रम संपल्यानंतरही बाबांबरोबर फोटो काढण्यासाठी अनेक कष्टकरी बंधू-भगिनी संविधान कट्ट्यावर आले होते, फोटो घेत होते. आणि बाबा हसतमुख चेहऱ्याने या सर्वांशी बोलत होते.
अरुणा रॉय, निखिल डे यांनी सत्यशोधकांच्या कहाण्यांचा हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. यात पुढील भागात मेधा पाटकर यांचा समावेश आहे.
मी विद्यार्थी असल्यापासून पुण्यातील सार्वजनिक जीवनात सहभाग घेत आलो आहे. अनेकांना भेटतो, अनेकांशी संवाद करतो.नवे लोक भेटतात, कार्यकर्ते भेटतात, अभ्यासक भेटतात. शुक्रवारी सायंकाळी किती तरी लोक भेटले.
बरेच लोक बऱ्याच काळाने भेटले आणि त्यांच्याशी संवादही झाला.
अरुणा रॉय, निखिल या दोघांनाही भेटलो. त्यांच्या राजस्थानमधील संस्थेला भेट देण्याची इच्छा आहे, असे त्यांना सांगितले. त्यांनी जरूर या, असा प्रतिसाद दिला.
फाउंडेशनचे समन्वयक असलेले राहुल भोसले यांनी खूप चांगली तयारी तिथे केली होती.
या कार्यक्रमात सुभाष लोमटे, सुभाष वारे ,मोहन आणि शारदा वाडेकर, उपेंद्र Tannu, दत्ता काळेबेरे,राणी जाधव,विजय कुंभार,विनिता देशमुख,दीपक म्हस्के,डॉ. अनंत फडके,अरुणा बुरटे, लता भिसे, सुरेखा गाडे, प्रा.श्रुती तांबे, विद्या कुलकर्णी, संयोगिता ढमढेरे, गोरख मेंगडे…असे अनेक कार्यकर्ते भेटले…
एस एम जोशी फाउंडेशनच्या संविधान कट्ट्याच्या प्रांगणात हा फार सुंदर कार्यक्रम झाला.
आणि मुख्य म्हणजे महात्मा फुले,महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत संविधान रक्षणाचा लोकशाहीचा लढा पुढे नेण्याची भूमिकाही अधोरेखित करण्यात आली…
अरुण खोरे, पुणे.
(रविवार,दि.७ एप्रिल,२०२४)
0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *