- 21
- 1 minute read
Gen -Z बाबत गैरसमज निर्माण करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न; विनाश काले – विपरीत बुद्धी!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 51
Gen -Z बाबत गैरसमज निर्माण करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न; विनाश काले – विपरीत बुद्धी!
RSS चे जॉइंट सेक्रेटरी यांनी ABVP च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यां समोर बोलताना , CJP च्या जंतर मंतर वरील आंदोलनाबाबत जे वक्तव्य केले. या भाषणाची मीडिया मध्ये खूप चर्चा सुरू आहे. ते म्हणतात, हे आंदोलन समाज विरोधी व असंवैधानिक आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील दिनांक 25 नोव्हेंबर 1949 च्या भाषणाचा संदर्भ ही देतात. आंदोलनकर्त्याना बदनाम करून युवाबाबत – Gen -Z बाबत गैरसमज निर्माण करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे माझे मत आहे. सत्तेच्या बाजूने असलेल्यांनी गव्हर्नन्स चे वास्तव व युवकांची न्याय मागणी लक्षात घ्यावी. सर्वसामान्य , शोषित- वंचित, गरीब , दुर्बल , दुर्लक्षित समाज घटकांचे शिक्षण ,आरोग्य, रोजगार, वस्तीत सेवा सुविधा, अन्याय अत्याचार प्रतिबंध, सुरक्षा, सन्मान याकडे लक्ष देऊन प्रतिष्ठापूर्वक जगण्याचे प्रश्न सोडविण्याकडे सरकारचा, प्रशासनाचा भर असावा. खरं तर या आंदोलनाचे व युवकांच्या हिंमतीचे व समजदारीचे कौतुक करायला पाहिजे. एवढ्या मोठ्या आंदोलनात काही किरकोळ प्रकार अजाणतेपणे किंवा कोणामुळे झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करण्यातच शहाणपण आहे. युवकांच्या भावना, त्यांचे प्रश्न समजून घेत, संवाद साधला पाहिजे. उलट, त्यांना व CJP च्या युवा नेत्यांना अडचणीत आणण्याचा, दबाव टाकण्याचा प्रयोग केला जाणे हे बरोबर नाही. संविधानिक लोकशाही व्यवस्थेत मत मांडण्याचा, शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. सरकारने संविधानाचा सन्मान करावा, vindictive होऊ नये. Gen -Z आणि आता Gen -Alpha चे म्हणणे काय आहे हे मैत्रीपूर्ण वातावरणात जाणून घ्यावे. आंदोलनाची स्थिती उद्भवू नये असे काम शासन प्रशासनाने करण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील दिनांक 17 डिसेंबर 1946 चे , objective resolution वरील भाषण सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. मुस्लिम लीग ला सोबत घेण्याबाबत चा विषय होता. बर्क चा संदर्भ देत बाबासाहेब म्हणतात,….. “फक्त बळाचा वापर हा तात्कालिक उपाय होय. त्यामुळे काही काळासाठी विद्रोह शमल्यासारखा वाटतो पण पुन्हा विद्रोह शमविण्याची आवश्यकता मात्र त्यामुळे नाहीशी होत नाही ..”
पुढे पुन्हा बर्क चा संदर्भ देत बाबासाहेब म्हणतात, “सत्ता देणे सोपे आहे पण सुज्ञपणा -शहाणपण देणे महाकठीण कर्म आहे.”. आपण आपल्या आचरणाने हे सिद्ध करू या की, जर या संविधान सभेने स्वतःकडे सार्वभौम अधिकार घेतले असतील तर ही सभा त्या अधिकाराचा वापर शहाणपणे करू इच्छिते. या देशातील सर्व समाजघटकांना आपल्यासोबत आणण्याचा हाच एकमेव मार्ग होय. याशिवाय आपणास एकात्मतेकडे नेणारा अन्य कोणताही मार्ग नाही. या मुद्द्यांवर कोणाच्याही मनात कोणतीही शंका असू नये”.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भाषण खूप महत्वाचे आहे, सत्ताधाऱ्यांनी जरूर वाचावे. आपल्याच देशाच्या युवकांशी जे देशाचे नागरिक आहेत, त्यांच्याशी वैरभावनेने वागणे उचित नाही.
CJP च्या आंदोलनात डॉ बाबासाहेब आंबेडकर ची प्रतिमा होती, संविधान होते, महात्मा गांधी होते, शहीद भगत सिंग होते. जयभीम चा जयघोष होता. जयभीम चे नारा म्हणजे सामाजिक न्याय, समानता ,स्वातंत्र्य , बंधुता चा , राष्ट्राच्या अखंडतेचा जयघोष आहे. हे पॉझिटिव्ह मुद्दे होते. हल्ली सगळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात, सोयीने सांगतात मात्र त्यानुसार वर्तन करीत नाही. हे आंदोलन आपल्या फायद्याचे व मनासारखे झाले नाही, म्हणून सत्ताधाऱ्यांनी इगो चा विषय करून, द्वेषपूर्ण कार्यवाही करू नये. सरकारने युवा पिढीशी संवेदनशीलतेने संवाद साधावा आणि प्रश्न सोडवावेत. हेच संविधानिक कार्य ठरेल .
इ झेड खोब्रागडे भाप्रसे नि संविधान फाऊंडेशन नागपूर.
1Shares