• 116
  • 1 minute read

वारी, भागवत संप्रदाय, आषाढी एकादशी, रिंगण, लोटांगण, फुगड्या, मिठ्या, साष्टांग दंडवत इत्यादींचे कौतुक करून झाले असेल तर…

वारी, भागवत संप्रदाय, आषाढी एकादशी, रिंगण, लोटांगण, फुगड्या, मिठ्या, साष्टांग दंडवत इत्यादींचे कौतुक करून झाले असेल तर…

वारी, भागवत संप्रदाय, आषाढी एकादशी, रिंगण, लोटांगण, फुगड्या, मिठ्या, साष्टांग दंडवत इत्यादींचे कौतुक करून झाले असेल तर वारीत समतेचे- सहिष्णुतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगायला मिळते, असे सांगणाऱ्या उत्साही लोकांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत…

▪️वारीतून परत आल्यावर बहुजन समाजातील लोक मुलाच्या/मुलीच्या लग्नात ब्राह्मण पुरोहिताला का बोलावतात ? त्याच्याकडून मुहूर्त काढून का घेतात ? कुंडली का बघतात ? स्वजातीतच लग्न का ठरवतात ? मुलाने/मुलीने स्वजातीच्या बाहेरचा विचार केल्यास हिंसक का होतात ? वारीत अनुभवलेली समता- सहिष्णुता अशा वेळी कुठे जाते ? हे सगळं करायला त्यांना कोण भाग पाडते ?

▪️वारीतून परत आल्यावर पुढच्या वारीपर्यंतच्या काळात बहुजन समाजातील लोक घरी सत्यनारायणाची पूजा का घालतात ? स्वतःच्या घरात, जिथे कायमस्वरुपी राहायचे असते त्या चाळीत/हाऊसिंग सोसायटीत, जिथे जॉब असतो त्या कार्यालयात ही पूजा केली पाहिजे, असे त्यांच्या मनावर कोण बिंबविते ? या पूजेला ते ब्राह्मण भटजीलाच का बोलावतात ? ब्राह्मणाला बोलवायला नको, असे त्यांना का वाटत नाही ? उलट, त्याने सांगितल्याबरहुकूम कटाक्षाने सर्व कर्मकांड मनोभावे आणि यथासांग पार का पाडतात ? त्याला भरमसाठ दक्षिणा आणि अन्य भेटवस्तू का देतात ? कुणाचा दबाव असतो हे सगळं करायला ?

▪️वारीत स्त्रीपुरुषांनी एकमेकांना समताधिष्ठित मिठ्याबिठ्या मारून झाल्यावर गावात आल्यानंतर विधवा, परित्यक्ता स्त्रियांना लग्नकार्यात, हळदीकुंकवाच्या समारंभात दूर का ठेवले जाते ? त्यांना बहिष्काराची अस्पृश्यतेसम वागणूक का दिली जाते ? कोण सांगते त्या स्त्रियांशी असे वागायला ?

वारीत भाग घेऊन आलेल्यांविषयी आणखी अनेक प्रश्न विचारता येतील. परंतु सध्या हे तीनच पुरेत…

वरील प्रश्नांची उत्तरे कुणीही देणार नाही. कारण ती अडचणीची ठरणार आहेत.

यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात.

▪️ब्राह्मणी-वैदिक संस्कृतीचा सर्वव्यापी आणि खोल प्रभाव अद्यापही आपल्या बहुजन समाजावर आहे. हा प्रभाव नष्ट करण्याचा कोणताही कृतिकार्यक्रम डाव्या, पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी, सर्वोदयवादी मंडळींकडे नाही. किंबहुना असे काही केले पाहिजे (किंवा करायचे असते) या जाणिवेचा स्पर्शदेखील त्यांना झालेला नाही. पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रबोधनातून काही लोकांमध्ये तशी जाणीव थोड्याफार प्रमाणात निर्माण झालेली असली तरी ब्राह्मणी/वैदिक प्रभुत्त्वातून मुक्त होण्याच्या दिशेने जोरदार काम करावे, अशी प्रबळ इच्छाशक्तीच त्यांच्या मनात सळसळत नाही.

▪️खेड्यापाड्यातले सर्वसामान्य लोक परंपरा म्हणून वारीला जातात. पुरोगामी लोक मात्र श्रमपरिहार म्हणून, घरी बसून कंटाळा आलेला असतो म्हणून थोडासा चेंज, वेगळा अनुभव घेता येईल, वारीत एकमेकांना भेटता येईल, एवढ्याच मर्यादित उद्देशाने वारी करतात. मोकळ्या हवेत फिरून येऊया, पाय मोकळे करूया आणि त्यायोगे वारीला पुरोगामी टच देऊया, हा त्यांचा हेतू असतो. समाजपरिवर्तन, समताप्रस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, जातिअंत वगैरे उद्दिष्टांशी त्यांना काही देणेघेणे आहे, असे कुठेही दिसत नाही. कारण समग्र परिवर्तन केले पाहिजे, असे मुळात त्यांना वाटतच नाही.

वरवरचे बोलत राहावे, वरवरचे करत राहावे आणि त्या आधारावर सगळीकडे भाव मारत राहावा, असे हे धोरण आहे. हे धोरण परिवर्तनवादी नसून अपरिवर्तनवादी आहे.

फुले-आंबेडकरांना अपेक्षित असलेले सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन का होत नाही, याचे हे सर्वात प्रमुख कारण आहे. प्रतिगाम्यांना दोष देऊन उपयोग नाही. खोट पुरोगाम्यांमध्येच आहे !!!

– संदीप सारंग

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *