श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता
नुकतेच एशियाटिक सोसायटी मुंबई येथे JNU चे प्रा. शरद बाविस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. बाविस्करांच्या त्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खरे तर श्री दाते यांच्याकडून मतमतांतरे होणे स्वाभाविक होते. परंतु तसे न होता या व्याख्यानाला प्रत्यक्षदर्शी श्रोता म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते यांनी प्रत्यक्ष स्थळावर आपली असहमती किंवा प्रतिपक्ष प्रतिपादन दर्शविण्याऐवजी फेसबुक सारखे समाज माध्यम निवडले. त्यालाही हरकत नाही. कदाचित थोड्यावेळाने काही विचार मंथन झाले असेल आणि त्यातून प्रा. बाविस्कर यांचेसोबतची असहमती व्यक्त करावीशी वाटली असेल. आणि म्हणून देखील त्यांनी समाज माध्यम निवडले असे क्षणभर आपण म्हणूयात.
परंतु समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह आणि बाविस्करांना कमी लेखण्याची काही शब्द किमया त्यांनी वापरली. याबाबत समाज माध्यमांवरून वाचण्यात आले. तेंव्हा तेही हरकत नाही ते त्यांचं व्यक्तिगत जडण घडण आणि लाभलेला परिवेश यामुळे वेगळं असहमतीचं मत असू शकतं, व्यक्तिगत धारणा देखील असू शकते.
हे विचारात घेऊन आज श्री दाते यांच्या फेबु भिंतीवर मूळ पोस्ट वाचावी म्हणून बघितले असता. आज पोस्ट पूर्णतः संपादित करून मवाळ केली असल्याचे दिसले. श्री दाते यांनी स्वतःची पोस्ट संपादित केली. त्यातील विखार असलेले शब्द मागे घेत आपला एकूणच स्वर अधिक मवाळ केला असल्याचे दिसले. यानिमित्ताने त्यांच्या इतरही पोस्ट स्क्रोल केल्या. श्री दाते इंग्रजीत लिहितात.चांगले जुने संदर्भ देतात. जुन्या स्मृतींना उजाळा देतात. आजच्या उथळ बातमीदारी पेक्षा विषय आणि प्रकरण याचे अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षण नोंदवत असतात हे देखील दिसून आले.
श्री दाते यांनी स्वतःचे शब्द आणि मत स्वतःच माघारी घेणे ही बाब पाहता श्री. दाते यांनी समाज माध्यमांवरील वाद विवाद देखील पराभूतपणे स्वीकारला असेच म्हणावे लागेल. आधी वापरलेले शब्दच परस्पर स्वतःहून मागे घ्यायचे असतील तर यापूर्वी जे मळभ त्यांनी व्यक्त केले ते कशासाठी? आणि कोणत्या उद्देशाने? हा प्रश्न मात्र या निमित्ताने त्यांनीच अनुत्तरीत ठेवून या मत मतांतराला एकतर्फी पूर्णविरामही देत असल्याचे वॉल वर घोषित केले. हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
निदान वयाची जेष्ठता आणि लेखणी मधली आपले दीर्घ आयुष्य पाहता विद्याधर दाते यांनी त्यांच्या फेसबुकच्या भिंतीवरील त्यांनीच लिहिलेली पोस्ट अशी संपादित करणे नक्कीच “वादे वादे जायते तत्वबोधे” या उक्तीला पाठ दाखविणारे ठरले आहे.
तर इकडे प्रा. बाविस्कर यांनी देखील या चर्चेला त्यांच्याकडून पूर्णविराम दिला आहे.
याप्रसंगी एक बाब लक्षात घेतली पाहिजे आणि ती ही की वयाने ज्येष्ठ असलेले श्री विद्याधर दाते यांनी हा सगळा प्रकार प्राध्यापक शरद बाविस्कर यांच्या उपस्थितीत बाविस्करांची योग्यता, सिद्धता, विद्यार्थी मूल्यमापन याबाबतचे प्रश्न आणि शंका सभास्थळीच उपस्थित न करता त्यासाठी गर्दीतल्या अशा समाज माध्यमातून का केला असावा? या प्रश्नात बघितल्यावर लक्षात येईल की आपल्या समाजात सामाजिक विशेषाधिकार (social privilege) कसा कार्यरत असतो.