- 10
- 1 minute read
अमेरिकेत जोम धरू लागलेली प्रेडिक्शन मार्केट !
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 20
अमेरिकेत जोम धरू लागलेली प्रेडिक्शन मार्केट !
इराण युद्धाचे निमित्त होऊन अमेरिकन साम्राज्य अस्ताला जाण्याच्या चर्चा सुरू होणे आणि अमेरिकेत प्रेडिक्शन मार्केटला उधाण यायला सुरुवात होणे हा काही योगायोग नाही. !
( कालच्या पोस्टमध्ये “प्रेडिक्शन” मार्केटचा उल्लेख होता. त्यावर हे टिपण. कालची पोस्ट वाचली नसल्यास जरूर वाचावी. दोन्ही पोस्ट परस्पर पूरक आहेत.)
वित्तक्षेत्राचे “सट्टेबाजी”साठी अजून एक अंगण : प्रेडिक्शन ( Prediction) मार्केट!
Prediction म्हणजे मराठीत अंदाज बांधणे. आपण सर्वजण आपल्या दैनंदिन आयुष्यात विविध अंदाज बांधतच असतो. व्यक्तिगत आयुष्याशी संबंधितच नाही तर अगदी गप्पांमध्ये. “काय वाटत तुला कोण जिंकून येईल” हे अंदाज बांधणेच असते. अगदी शेतकरी देखील पावसाचे अंदाज बांधत असतात. आधी केलेल्या अंदाजात बदल करत असतात. एखादा शेयर स्टॉक मार्केट वर विकत घेताना गुंतवणूकदार तो शेयर अमुक दिवसात तमुक रुपयांनी वधारेल असा अंदाज बांधतच निर्णय घेत असतो. तीच गोष्ट रोखे, सोने, कमोडिटी इत्यादींची.
हे फार पूर्वीपासून सुरू आहे. तो मानवी समाजाचा, स्वभावाचा एक भाग आहेच. पण त्याची उपयुक्तता देखील आहे. त्याशिवाय निर्णयच घेता येणार नाहीत.
वित्त भांडवल अत्यंत श्र्यूड आहे. समाजात सुरू असणाऱ्या गोष्टींसाठी एखादे वित्तीय प्रॉडक्ट, फायनान्शियल प्रॉडक्ट तयार करून, त्यासाठी संस्थात्मक संरचना जन्माला घालून, त्याचे मार्केटिंग करून त्यातून नफा कमावणे ही वित्त भांडवलाची खासियत राहिली आहे.
वित्त भांडवलाची मक्का असणाऱ्या अमेरिकेत अजून एक वित्तीय मार्केट उभे राहिले आहे. जोम पकडत आहे. त्याला प्रेडिक्शन मार्केट म्हणतात. त्याची थोडक्यात संकल्पना अशी. एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतो. जसा शेयर मार्केटसाठी नॅशनल स्टॉक मार्केट आहे. त्यावर कोणत्याही प्रश्नावर पैसे भरून, गुंतवणूक करून अंदाज बांधले जातात. त्याची खासियत ही आहे की प्रश्न धारदार असतो, उत्तर संदिग्ध येऊ शकत नाही. त्याचे उत्तर हो/ YES किंवा नाही/ NO असेच येऊ शकते आणि तो निर्णय विशिष्ट तारखेला येणार हे नक्की असते.. उदा डोनाल्ड ट्रम्प निकालाच्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी होतील का ? स्टँडर्ड अँड पुवर डिसेंबर ३१ रोजी ७००० अंक पार करेल का ? किंवा अमुक गायकाला ग्रॅमी अवॉर्ड त्या दिवशी जाहीर होईल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त हो किंवा नाही अशीच असू शकतात. हा प्रेडिक्शन प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी विशिष्ट प्रश्नासाठी बोलीचा भाव ठरवते. त्याला इव्हेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात.
उदा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदी ट्रम्प निवडून येतील का ? या साठी एका डॉलरसाठी २५ सेंट्स भरून तुम्ही येस किंवा नो प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. म्हणजे एखादा येस अंदाज बांधणारा १००० कॉन्ट्रॅक्ट विकत घेतो आणि प्लॅटफॉर्मला २५० डॉलर्स फी भरतो. नो अंदाज बांधणाऱ्याला देखील तोच रेट. ट्रम्प त्या दिवशी निवडून आले तर १००० कॉन्ट्रॅक्ट गुणिले एक डॉलर याप्रमाणे येस वाल्या गुंतवणकदाराला २५० डॉलर्सचे १००० डॉलर्स मिळतात. ज्यांनी नो विकत घेऊन २५० डॉलर्स भरले त्याचे सगळे पैसे जातात.
अमेरिकेत Kalshi आणि Polymarket ही दोन प्रमुख प्रेडिक्शन मार्केट / ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. इतरही आहेत. यावरील होणारे व्यवहार सतत वाढत आहेत. २०२५ मध्ये ५० बिलियन डॉलर्सचे व्यवहार झाले. ते २०२६ मध्ये २५० बिलियन डॉलर्स आणि २०३० पर्यंत १००० बिलियन डॉलर्स होतील असे अंदाज आहेत.
प्रेडिक्शन मार्केट मधील व्यवहार भांडवलाची गुंतवणूक म्हणून मानायची की जुगारी सट्टेबाजी हा प्रश्न कोर्टापर्यंत गेला. सध्या तरी हा सट्टा नाही असा कोर्टाचा निर्णय आहे. अमेरिकेतील विविध राज्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कायदेशीर बाबी बाजूला ठेवूया. सामाजिक / आर्थिक / राजकीय पैलू बघूया.
जीवनात अनिश्चितता आहे. नोकरी, पगार, उत्पन्न मिळणार का याबद्दल अनिश्चितता आहे. उत्पादक कामे करून अपेक्षित पैसे मिळतील का याबद्दल खात्री नाही. कोट्यवधी तरुणांच्या जीवनात तणाव आहेत. पोकळी आहे. व्यसनाधिनतेसाठी परफेक्ट सेटिंग. अल्कोहोल, ड्रग, पॉर्नोग्राफी, जुगार…असे जुने आणि नवे प्रकार.
प्रेडीक्शन मार्केट वित्त भांडवलशाहीचे अविभाज्य अंग आहे. वित्त भांडवलशाही फक्त आर्थिक नाही सामाजिक प्रश्नांचा मागोवा ठेवत निरनिराळी फायनान्शिअल प्रोडक्ट्स लॉन्च करत असते. आणि गडगंज नफा कमावते.
शेअर / रोखे या सेकंडरी मार्केटमध्ये किमान काही अभ्यास लागतो. भांडवल निर्मितीला हातभार लागतो. प्रेडीक्शन मार्केट नागडा उघडा जुगार आहे. प्रेडीक्शन मार्केट मधून बचतदारांना जुगाराची सवय लावणे , तरुणांना जुगार खेळण्याचे व्यसन लावणे हेच घडणार आहे.
संजीव चांदोरकर
0Shares