• 107
  • 1 minute read

“इन्सायडर माहिती आणि जलद नफ्याचा खेळ”

“इन्सायडर माहिती आणि जलद नफ्याचा खेळ”

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना मागच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेने लष्करी मोहीम आखून ताब्यांत घेतले हे वाचकाना आठवत असेलच. अर्थात त्या अमेरिकन सैनिकांना आपण कोणत्या मिशनवर आहोत त्याची माहिती आधी दिली गेली असणार. नाहीतर तर ते सैनिक मिशन पूर्णत्वास नेऊच शकले नसते.

 
खालील वाक्यांचा वरील परिच्छेदाशी काय संबंध आहे असा प्रश्न पडेल; पण वाचा 
 
अमेरिकेत “प्रेडिक्शन मार्केट” जोरात मुळे रुजवत आहे. “पॉली मार्केट” हे त्यापैकी एक. या व अशा संकेतस्थळावर एखादी घटना घडेल की नाही यावर बेटिंग चालते. ऑनलाईन सट्टेबाजी साठी स्थापन झालेले हे प्लॅटफॉर्म. तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहेत.  व्हीनेझुएलावर अमेरिका लष्करी कारवाई करेल का ? “हो” किंवा “नाही” अशी बेटिंग लागली होती. या मिशन मध्ये सामील झालेल्या गॅनन डायक या सैनिकाने या घटनेवर बेटिंग साठी पैसे लावले आणि त्यात चार लाख डॉलर्स जिंकले असा आरोप त्याच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. (लोकसत्ता २५ एप्रिल २०२६, पान क्रमांक नऊ बातमीवर आधारित)  बातमी छोटी आहे. पण आपला या पोस्टचा विषय वेगळा आहे. लोकसत्तातील बातमी म्हटले तर निमित्त आहे. 
 
वरील केस क्लासिकल इन्सायडर ट्रेडिंगची केस आहे. एखादी महत्वाची बातमी सार्वजनिक होण्याआधी मूठभर संबंधित व्यक्तींना ऍडव्हान्स मध्ये नक्कीच माहित असते. अशा व्यक्ती आपल्या विशेष स्थानाचा वापर करून मार्केटमध्ये पोझिशन घेऊन नफा कमावत असतात. 
कॉर्पोरेट क्षेत्र / बँकिंग / वित्त / सरकारी अधिकारी / सल्लागार अशा अनेक क्षेत्रात हे होतच असते. इन्सायडर ट्रेडिंग प्रतिबंधात्मक कायदे सर्वच देशात आहेत. पकडला गेला तरच चोर, नाहीतर साव ! असा अलिखित नियम आहे इन्सायडर ट्रेडिंग संबंधित कायद्याचा. हे करणारे सिस्टीम अंर्तबाह्य जाणणारे असतात. ते काही मूर्ख नाहीत स्वतःला पकडून द्यायला.  तो बिचारा सैनिक ! त्याने आपल्याकडील माहितीवर बेटिंग केले. आणि पकडला गेला. त्या मिशन मध्ये सामील झालेल्या इतर सैनिकांनी / वा अगदी आरोप ठेवलेल्या अधिकाऱ्याने देखील असे बेटिंग केलेलेच नसेल याची गॅरंटी कोण देणार.
 
अमेरिकेत तर अनेक गुंतवणूकदारांना इन्सायडर ट्रेडिंग, अँडव्हान्स माहिती असण्याचे महत्व माहित आहे. इतर इन्सायडर ट्रेडिंग करतात मग आपण का नाही करायचे? असा विचार त्या सैनिकाने केला.. पुढचा मुद्दा अधिक वैश्विक आणि गाभ्यातील आहे.  आजचे युग वित्त भांडवशाहीचे युग आहे असे म्हटले जाते. त्यावर अनेक जण टीका करतात. ती काही स्टॉक मार्केटवर सट्टेबाजी चालते एव्हढया पुरती मर्यादीत नाही. आपली वित्त भांडवलशाहीवरील टीका सट्टेबाजीपेक्षा अधिक गंभीर आणि मूलभूत आहे. 
 
या प्रणालीने जगभर अगदी सामान्यातील सामान्य नागरिकांची, विशेषतः तरुण पिढीची, जीवनाकडे, पैशाकडे, कष्टाकडे बघण्याची दृष्टी पार वाकडी तिकडी करून टाकली आहे. कोणतेही उत्पादक काम न करता , नवनवीन गोष्टी / कौशल्य शिकून मुलवृद्धी करून, वस्तुमाल / सेवा उत्पादित / विक्री न करता लवकरात लवकर कसे पैसे मिळवण्याची मानसिकता तयार केली गेली आहे.  नुसती मानसिकता तयार नाही केली तर विविध प्रकारची फायनान्शियल मार्केट्स तयार केली गेली. स्मार्ट फोन , इंटरनेट, ऑनलाइन पेमेंट यामुळे ऑनलाईन काही क्षणात पैसे गुंतवणे आणि विकणे शक्य केले. आयपीओ, शेयर्स, म्युच्युअल फंड्स, एसआयपी , ऑप्शन्स , फ्युचर्स, ईटीएफ, क्रिप्टो, आणि बरेच काही. यात सोने आणि जमिनी , रियल इस्टेट या फिजिकल मत्तांचा देखील समावेश करावयास हवा. सतत खरेदी विक्री हीच ऍक्टिव्हिटी !
 
या सर्वात भारतासकट अनेक देशातील तरुण पिढी आघडीवर आहे. अर्थव्यवस्थेतील बचती मोठ्याप्रमाणावर या ऍक्टिव्हिटीकडे वळू लागल्या. लोक कर्जे काढून हा खेळ खेळू लागले आहेत. 
 
हे प्लॅटफॉर्म तेव्हाच वर्षानुवर्षे सुरु राहू शकतात ज्यावेळी त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्त असते. समाजातील जास्तीत जास्त समाज / वर्ग घटक सामील करून घेतले जातात , कारण त्यामुळे सामाजिक / राजकीय mandet तयार होते.  उत्पादक औद्योगिक भांडवलशाहीला मागच्या सीटवर ढकलून वित्त भांडवलशाहीने अर्थव्यवस्था रुपी गाडीच्या ड्रायव्हिंग सीट / व्हीलचा ताबा घेतला आहे 
नैतिक अनॆतिकच्या पलीकडे जाऊन वित्त भांडवलाची राजकीय अर्थव्यवस्था समजून घेऊन सिस्टीम केंद्री राजकीय टीका करावयास हवी. “माणसे स्वार्थी असतात किंवा झाली आहेत” अशा इसापनीती स्टाईल वाक्याच्या पलीकडे गेले तरच राजकीय अर्थव्यवस्थेत नक्की कोठे हस्तक्षेप करायचा याचे आकलन होईल. अमेरिकेत जोमाने मुळे रुजवणाऱ्या , आणि भारतात देखील येऊ शकणाऱ्या प्रेडिक्शन मार्केट बद्दल लवकरच स्वतंत्र पोस्ट. 
 
संजीव चांदोरकर 
0Shares

Related post

मोदी, शहाने शिवसेना तोडली, पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरें यांचीच या जनमानसातील प्रतिमेला तोडू शकले नाहीत……!

मोदी, शहाने शिवसेना तोडली, पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरें यांचीच या जनमानसातील प्रतिमेला तोडू शकले नाहीत……!

गद्दार खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे भाजपच्या सत्तेला सुरुंग…..!            उद्धव ठाकरे…
पवनराजे प्रकरणातील निकाल राजकीय प्रभावातून लागला असेल तर ओमराजे निंबाळकर हारले व सुनेत्रा पवार जिंकल्या….!

पवनराजे प्रकरणातील निकाल राजकीय प्रभावातून लागला असेल तर ओमराजे निंबाळकर हारले व सुनेत्रा पवार जिंकल्या….!

निकालानंतरची ओमराजेंची भूमिका ऐतिहासिक व देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरणार….!         सत्र,उच्च व…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *