• 7
  • 1 minute read

ऍड. बी. जी. बनसोडे : लढवय्या विधीज्ञ

ऍड. बी. जी. बनसोडे : लढवय्या विधीज्ञ

१९९२-९३च्या दरम्यान ठाण्याचे तत्कालीन प्रसिद्ध वकिल ॲड.शिवहार कांबळेंशी मैत्री झालेली.त्यांनी एक दिवस ठाणे कोर्टात बोलावून ॲड.बी.जी.बनसोडे,ॲड.राजय गायकवाड,ॲड.हिरालाल पोतदार आदी चळवळीची बांधीलकी असलेल्या वकीलांची ओळख करुन दिली.त्यानंतर बी.जी.बनसोडेंच्या ४-६वेळा भेटी,गप्पाटप्पा झालेल्या.

 
शिवहार कांबळेंचे बाबासाहेंबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन परततांना त्यांच्या गाडीला अपघात होऊन निधन झाल्या नंतर या भेटीत खंड पडलेला.
 
त्यानंतर ११जुलै१९९७ला रमाबाई आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांच्या पूतळ्याची कुणा समाजकंटकाने विटंबना केल्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाने रमाबाई आंबेडकर नगरच्या आंबेडकरी जनतेवर भारताने पाकिस्तानी अतिरेक्यांवर केलेल्या हल्ल्यासारखाच गोळीबार करुन दहा जणांचे बळी घेतले होते;तर असंख्य निरपराधांना जायबंदी केलेले. 
पोलिसांच्या या निघृण कृत्याचे संतप्त पडसाद देशभरात उमटले होते.
 
पोलिसांनी केलेल्या या हत्याकांडाचे बाळ ठाकरेने खोटी टँकर स्टोरी रचून समर्थन करीत गोळीबाराचा आदेश देणार्‍या मनोहर कदमला शाबासकी दिली होती.
 
“रमाबाई नगरमधल्याच दलिताने पूतळ्याची विटंबना केली आहे.हा देशद्रोही कट होता.रमाबाई आंबेडकर नगरमधील गुंड पेट्रोलचे डब्बे आणि पेटते पलिते घेऊन ज्वलनशील केमिकल्सचे टँकर जाळायला हायवेवर उतरले होते.त्यांनी या टँकर्सना आग लावली असती तर मुंबईचा २५कि.मी.परिसर जळून झाला असता.असंख्य लोक जळून खाक झाले असते.त्यामुळेच मनोहर कदमने त्या गुंडांना ठार केले;हे खुपच बरे झाले.” असे अकलेचे तारे बाळ ठाकरेने तोडले होते.
 
बाळ ठाकरेच्या इशार्‍यावर सरकारने पूतळा विटंबना आणि दंगल-जाळपोळ आदी गुन्ह्यांखाली पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेल्या अकराजणांसह जखमी,रमाबाई आंबेडकर नगर मधील अनेक कार्यकर्ते आणि वीस हजार अज्ञात नागरीकांना आरोपी ठरवले होते.पोलिसांच्या अत्याचारांचा वरवंटा रमाबाई आंबेडकर नगरवरती फिरु लागला होता.
 
त्याचवेळी श्याम गायकवाड,मिलींद भवार,जयवंत हिरे,प्रा.विठ्ठल शिंदे,प्रा.एकनाथ जाधव,जगन्नाथ ओगले,उदय चौधरी,ॲड.बी.जी.बनसोडे,ॲड.राजय गायकवाड,ॲड.संघराज रुपवते यांनी एकत्र येऊन “रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती” स्थापन करुन पोलीसी गोळीबार-अत्याचारांमधील जखमी,गोळीबारात बळी पडलेल्यांचे नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यास सुरवात करण्यास सुरवात केली.
 
राज्य सरकारने या हत्याकांडाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्याय.गुंडेवार कमिशन”समोर हे सर्व सज्जड पुरावे घेऊन ॲड.बी.जी.बनसोडे,ॲड.संघराज रुपवते,ॲड.राजय गायकवाड,ॲड.राजेश करमकर आणि जेष्ठ विधीज्ञ ॲड.प्रभाकर हेगडे ही फौज उभी राहिली.शिवसेनेने गोळीबाराचा मुख्य आरोपी फौजदार मनोहर कदमला वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या भल्याभल्या वकीलांची डाळ या वकिलांच्या सरबत्ती पुढे शिजू शकली नाही.
 
मनोहर कदमने निरपराध नागरीकांवर गोळीबाराचा आदेश देवून त्यांची हत्या घडवून आणली आहे.बाळ ठाकरेने रचलेली टँकर स्टोरी स्टोरी तद्दन खोटी आहे;हे सिद्ध करण्यामध्ये या सर्व वकिलांसह ॲड.बी.जी.बनसोडेंच्या वकिली कौशल्याचा विशेष उल्लेख करावाच लागेल.
 
बी. जी. बनसोडे यांच्या या वकिली कौशल्यामुळेच सत्र न्यायालयात मनोहर कदमला जन्मठेपेच्या सजेपर्यंत पोहचवण्यात आपण यशस्वी झालो होतो;हे मान्य करावेच लागेल.
 
या न्यायालयीन लढ्यासाठी हे योगदान देणार्‍या ॲड.बनसोडे यांची बाबासाहेबांनी रुजवलेल्या मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्षरत राहण्याची बांधीलकी-कर्तव्याची जितकी जाणीव होती.तितकीच १९७२पासून रमाबाई आंबेडकर नगरशी जुळलेली नाळही महत्वाची होती.
 
बी.जी.बनसोडेंचे मेहूणे रमाबाई नगर शेजारच्याच रेल्वेपोलीस वसाहतीत रहात होते.बनसोडेंचे आपल्या बहिणीकडे नेहमीच येणे जाणे १९९०पर्यंत चालू होते.१९८६मध्ये कायद्याचे शिक्षण पुर्ण करुन त्यांनी ठाणे कोर्टातुन वकिलीची सुरवात केली.
 
वकिलीच्या आरंभापासूनच आपण स्विकारलेल्या बुद्ध, फुले, आंबेडकरी सामाजिक जाणिवांमुळे ते अनेक लढ्यांमध्ये संघर्षरत होतेच.
 
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडानंतर त्याला अधिकच धार आली.राज्यातील बौद्ध-दलित हत्याकांडांच्या अनेक खटल्यांमध्ये जे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विधीज्ञ आपले कर्तव्य निभावत आहेत.त्यामध्ये बी.जी.बनसोडेंना वगळून कुणाला पुढे जाता येईल काय?
 
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाच्या खटल्यानंतर १जानेवारी२०१८रोजी भीमा कोरेगाव युद्धाला २००वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भीमा कोरेगावच्या युद्ध स्मारकाला अभिवादन करण्यास आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांवर भीडे आणि मिलींद एकबोटेंनी रचलेल्या कारस्थानानुसार योजनाबद्ध हल्ले करण्यात आले.
 
त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनाच गुन्हेगार ठरवण्याचा खटाटोप तपास यंत्रणांनी केला.त्याच्या चौकशी आयोगासमोरही बी.जी.बनसोडे हे श्याम गायकवाड,ॲड.किरण चन्ने,ॲड.राहूल मखरे यांच्या खांद्याला खांदा लावून जातीय शक्ती ,पोलीस,तत्कालीन भाजपा-सेना सरकारने रचलेले विकृत कारस्थान उघडे पाडीत आहेत.
 
या चौकशी आयोगाचा अहवाल जाहिर झाल्यानंतर केंद्र व राज्याच्याही आंबेडकरी जनतेविरुद्धच्या कारस्थानांवर मोठ्ठाच प्रकाश पडेल;असा त्यांना विश्वास आहे.
 
भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर सरकार आणि तपास यंत्रणांमधील मनुच्या माश्याची शिकार करीत असतांना तिकडे बी.जी.बनसोडे यांच्या जीवनसाथीचे निधन झाले असतांनाही त्यांनी चौकशी आयोगासमोर साक्षीदाराचा जबाब नोंदवून झाल्यानंतरच दू:खाचा हूंदका दिला होता.
 
आज १३एप्रिल रोजी बी.जी.बनसोडेंचा जन्मदिन. त्याच्या जीवननिष्ठांचा,त्यांच्या बांधीलकीचा,सामाजीक जाणीवांचा,अन्यायाविरुद्ध लढ्याचा यथायोग्य गौरव होणे गरजेचेच आहे.
 
ॲड.बी.जी.बनसोडेंच्या सामाजिक न्यायाच्या आंबेडकरी जाणीवांच्या ठीणग्या आंबेडकरी जनतेमधील संख्येने साधारणत: लाखभर तरी असलेल्या वकिलांमध्ये पेटल्या तर कोणत्याही,कितीही मोठ्या जातीय शक्तींची आंबेडकरी जनतेवर अत्याचार करण्याची हिंमत तरी होईल काय?
 
या जाणीवांचे स्फुल्लींग पेटून उठो!
 
ॲड.बी.जी.बनसोडेंचे आभाळाला गवसणी घालणारे अभिनंदन!!
0Shares

Related post

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

*औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव्य आयोजन*

औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव्य आयोजन Add Your Heading Text Here औरंगाबाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *