छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित महिलेला, तिच्या सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर, तिची जात, धर्म, ठिकाण यांचा कुठलाही मतलबी विचार न करता, माणुसकीच्या नात्याने तिला पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन मुली तसेच सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या राहत्या घरात आसरा दिला. तिला सर्व प्रकारची मदत केली. हे प्रेम, सहकार्य आणि माणुसकीचे अत्यंत अभिनंदनीय असे उदाहरण आहे. सध्या आपल्या देशात आणि महाराष्ट्रात स्वार्थी सत्ताकारणासाठी जात,धर्म,वंश, प्रांत इ. मुद्द्यांवरून समाजात सतत द्वेष, हिंसा पेरली जात असतानाच्या काळात कोथरूड मधील या मुलींनी माणुसकी जिवंत असल्याचा जणू एक संदेशच आपल्या समाजाला दिला. मुलींच्या या कृतीबद्दल आम्ही सर्व संविधानवादी, लोकशाहीवादी , मानवतावादी पक्ष संघटना व पुणेकर नागरिक या तीनही मुलींचे मनापासून अभिनंदन करत आहोत. तसेच या संपूर्ण प्रकरणात त्या विवाहितेला व या तीनही मुलींना मदत करणाऱ्या, त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन करत आहोत.
मात्र संभाजीनगर येथील विवाहितेला मदत करणाऱ्या या मुलींचा पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मधील महिला व पुरुष पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी चौकशीच्या नावाखाली छळ केला. त्यांचा स्त्री म्हणून लैंगिक अपमान होईल असे अपशब्द वापरून त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला. त्यांची जात काढत, त्यांना जातीवाचक अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक देत मारहाण केली. अशी तक्रार या मुलींनी पोलिसांविरोधात अर्जाद्वारे केलेली आहे. या मुद्द्याबाबत पोलिसांविरोधातील व अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधातील मुलींच्या या लढाईत आम्ही सर्व पक्ष-संघटना ठामपणे मुलींच्या बाजूने उभे आहोत. या मुली व त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील व महाराष्ट्रातील पोलिसी दमनशाहीच्या विरोधात, लढ्यात आम्ही सहभागी आहोत असे देखील या ठरावाद्वारे आम्ही जाहीर करत आहोत.
जात,धर्म,वंश,लिंग,प्रांत, इ. वर आधारित भेदभाव व द्वेषाच्या पलीकडे जात माणुसकीसाठी ठामपणे उभे राहण्याच्या भूमिकेतून, तसेच पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात पुणेकर नागरिकांचे आंदोलन करण्याचा निर्णय देखील आम्ही करत आहोत. या मुलींवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात महिला अत्याचार प्रतिबंधक व जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली, गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्यांना घेऊन पुणेकर नागरिकांचे ७ ऑगस्ट २०२५ रोजी, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा देखील निर्णय आम्ही करत आहोत.
तेव्हा माणुसकीचा संदेश देणाऱ्या मुलींच्या बाजूने उभे राहण्याचा व पोलीस दडपशाहीच्या विरोधात लढा करण्याचा ठराव आम्ही करत असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व न्यायप्रिय जनतेला आम्ही करत आहोत.
*खालील पक्ष व संघटना या बैठकीला उपस्थित होते व यांनी मिळून हा ठराव केला. -*
*वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, नव समाजवादी पर्याय,भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, जातिअंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, सत्यशोधक बहुजन आघाडी , ट्रायबल डॉक्टर फोरम, जवाब दो, मिळून साऱ्याजणी, स्त्री मुक्ती लीग, न्यू स्टुडन्ट अँड युथ फेरडरेशन, पी. यु.सी.एल. , एन. ए. पी.एम.