- 167
- 1 minute read
शिक्षणव्यवस्थेतील मनुवाद !
1974 पर्यंत आपल्या महाराष्ट्रात ‘11 वी म्हणजे मॅट्रिक’ असा एज्युकेशन पॅटर्न चालू होता. 1975 पासून ‘10 वी म्हणजे मॅट्रिक’ असा नवीन एज्युकेशन पॅटर्न चालू झाला.
त्याप्रमाणे 1975 पासून या नव्या पॅटर्न नुसार परीक्षा होऊ लागल्या ; परंतु जोशी- कुलकर्णी , नेने- गोखले , फडके- विद्वांस अशा आडनावांची मुलीमुलं एसएससी बोर्डात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याचा “जुना” पॅटर्न मात्र चालूच राहीला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे अगदी पहिल्या पानावर फोटोसह कोडकौतुक छापून यायचे. तेव्हा आजच्यासारखे चोवीस तास चालणारे न्यूज चॅनेल्स नसायचे. इंटरनेट तर स्वप्नातही दिसत नव्हतं. दररोज सकाळी येणारी वृत्तपत्रं हीच जगाची खिडकी ! सर्व दैनिकांचे संपादक बहुधा ब्राह्मण असत व बहुतेक पत्रकारदेखील ब्राह्मण ! त्यामुळे सदाशिव पेठी संस्कृतीची मुलं बोर्डात पहिली आल्यावर कौतुक करण्यासाठी या लेखणीबहाद्दरांच्या लेखणीला अगदी बहर यायचा ! ती ‘गुणवत्ता यादी’ , या गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या मुलांचं कौतुक , त्यांचे शिक्षक , आई-वडील यांचे पेढे भरवणे व ‘आमची मुलं लहानपणापासून कशी हुशार आहेत’ हे सांगण्याचा अट्टाहास ! सगळंच कसं भारावून टाकणारं ! त्यानंतर गुणवत्ता यादीत झळकण्याची संधी अवघ्या एक-दोन गुणांनी हुकली म्हणून हळहळणारे पालक- शिक्षक व विद्यार्थी ! हे हळहळणारं दु:ख वाचून डोळ्यात टचकन पाणीच यायचं ! थोडक्यात , ‘ब्राह्मणांची मुलं म्हणजे हुश्शार’ हे समीकरण सगळ्या समाजाच्या डोक्यात फिट्ट बसावं, यांसाठी पार्ले टिळकसारख्या शाळांपासून तर थेट वृत्तपत्रांत नोकऱ्या करणाऱ्या पत्रकारांपर्यंत सगळे जण आपलं सगळं कौशल्य पणाला लावायचे. खरं सांगायचं तर या ‘कृत्रिम’ गुणवत्तेचा परिणाम मात्र नैसर्गिक व्हायचा !
एकीकडे या सदाशिव पेठी गुणवत्तेचे असे कौतुक सोहळे साजरे होत असताना गिरणी कामगार , माथाडी कामगार , सिद्धार्थ कॅालनी , आपल्या हरीभाऊ नरकेंचे हडपसर , शेतकरी वस्त्या, वडार वाडी , वंजारी तांडा , धनगर वस्त्या वगैरे ठिकाणी वेगळंच चित्र असायचं. कित्येक मुलं स्वहत्या करायची. ज्यांची मुलं नापास झालेली असत ते पिताश्री आपल्या पोटच्या पोरांना अगदी गुराढोरासारखे मारायचे. बिचारी आई आपल्या मुलांचा मार चुकवण्याचा प्रयत्न करायची ! परंतु वर्षातून एकदाच ‘शिस्त’ दाखवणाऱ्या नवऱ्यापुढे तिचं काही चालत नसे. ज्यांची मुलं पास व्हायची त्यांचे वडील आपल्या ओळखीपाळखीच्या जोशी – नेने वगैरेंचे मार्क्स सांगून आपल्या कोवळ्या लेकरांवर डाफरायचे ! काही जणांना मॅट्रिक म्हणजे काय , हेच समजत नसे. ‘पोरगं (किंवा पोरगी !) काय तरी पास झालंय , ब्वॉ !’ असा काहीसा अविर्भाव असायचा. कसलं कौतुक अन कसलं काय !
एकीकडे वृत्तपत्रांत साजरा होणारा हा कृत्रिम गुणवत्तेचा सोहळा व दुसरीकडे बहुजन वस्त्यांत स्वहत्येपासून मुलांना मारहाण , तुलना करून डाफरणं ते ‘पास झाला तरी मला काय त्याचं’ हे चित्र यांतील विसंगती फार काळ चालणं शक्य नव्हतं. तथागत सम्यक संबुद्ध यांच्या ‘अनित्यता’ तत्त्वाप्रमाणे परिस्थिती हळू हळू बदलू लागली. गुणवत्ता यादीत नागरगोजे , नरके , म्हैसकर , कांबळे , भोसले , पाटील अशी आडनावे चमकू लागली. नंतर तर परिस्थिती एवढी बदलली की सगळी गुणवत्ता यादी अशा ‘सदाशिव पेठ बाह्य’ आडनावांनी चमकू लागली आणि क्वचित कुठे तरी जोशी – नेने दिसू लागले !
मग आपल्या बोर्डाने जाहीर केलं की , ‘गुणवत्ता यादी जाहीर केल्यामुळे गुणवत्ता यादीत न आलेल्या मुलांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो ! त्यामुळे गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही !’
आता गंमत बघा ! जोपर्यंत जोशी- कुलकर्णी , नेने -गोखले , फडके – गाडगीळ वगैरे आडनावांची मुलं बोर्डात पहिली यायची , त्यांचीच गुणवत्ता यादी झळकायची तोपर्यंत कोणाच्याही बालमनावर विपरीत परिणाम होत नव्हता ! बालमनावर सोडाच , अगदी बालशरीरावर देखील वण उठेस्तोवर बाप हाणायचा ! त्यातल्या त्यात एखाद्या दारु पिणाऱ्या संतापी बापाच्या तडाख्यात कोवळं लेकरु सापडलं की मारहाण पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडत असे. पण नापास झालेल्या पोराला इंगा दावल्याशिवाय बापाला चैन पडायची नाही. त्यामुळे वर्तमानपत्रांत ब्राह्मणी यशाचे कौतुक सोहळे साजरे होत असताना अगदी त्याच वेळेस हडपसर, संत रोहिदास नगर , बिस्मिल्ला चाळ , अण्णाभाऊ साठे नगर , सिद्धार्थ कॅालनी, शिवाजी नगर , गिरणी कामगारांच्या चाळी , शेतीखळ्यातील वाड्या , माथाडी कामगारांच्या वस्त्या , वडार- धनगर – बंजारा वस्त्या येथे राहणाऱ्या समवयस्क बाल मनांवर – शरीरांवर काय दुष्परिणाम झाले असतील , याचा कोणी विचार केला आहे काय ?
अर्थ अगदी स्पष्ट आहे. सदाशिव पेठ संस्कृतीची मुलं बोर्डात आल्यावर आमच्या मुलांच्या मनावर शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नव्हता ! परंतु आमची मुलं बोर्डात पहिली येवू लागल्याबरोबर सदाशिव पेठ संस्कृतीत राहणाऱ्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम होऊ लागला ! ही कोणती मानसिकता आहे ?
आपली शिक्षणव्यवस्था आजही कशी ब्राह्मण्यहितसंवर्धक आहे , याचा हा केवळ एक नमुना आहे. या शिक्षणव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक , प्राध्यापकांपासून तर थेट लिपिक शिपायापर्यंतच्या सर्वजातीय ‘माणसांना’ हा मनुवाद दिसतोय का ? कि , या ब्राह्मणी शिक्षणव्यवस्थेनं त्यांचंही ब्राह्मणीकरण केलं आहे ? त्याचप्रमाणे ‘शिक्षणव्यवस्थेतील मनुवाद’ नष्ट करण्याबाबत येत्या निवडणुकीत कोणी काही म्हणतंय का ?
कोणाला उत्तर सापडलं तर सांगा ! नालंदा – तक्षशीला विद्यापीठांचा गौरवशाली वारसा सांगणारा या पवित्र पावन भारत भूमीला या उत्तराची नितांत आवश्यकता आहे.