- 45
- 1 minute read
“सेक्युलर” शब्दाला ब्राह्मण्यवाद्यांचा विरोध का?
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 47
‘सेक्युलर’ शब्द हा पाश्चात्य लोकशाही युगातून भारतात आला आहे. सेक्युलर शब्दाला युरोपातील पोपविरोधी चळवळीचे संदर्भ आहेत.
युरोपात पोपशाही होती. मध्ययुगात तेथील विविध देशांचे राजकीय प्रतिनिधी हे पोपद्वारे नियुक्त केले जात असत. पोपशाही कॅथॅालिक परंपरा पाळते. त्यामुळे पोपद्वारे नियुक्त केलेले राजकीय प्रतिनिधी देखील कॅथॅालिक असणे अपरिहार्य होते.
मध्ययुगात युरोपात ‘रेनेसन्स’ चळवळ चालू झाली व पोपशाहीविरुद्ध रणशिंग फुंकले गेले. या रेनेसन्स चळवळीचे प्रवर्तक व समर्थक हे प्रॅाटेस्टंट समजले जातात. या रेनेसन्स चळवळीने ज्ञान- विज्ञानाची कास धरली. ‘पृथ्वी सपाट आहे’ , हे बायबल प्रणित वाक्य मानण्यास नकार दिला व विज्ञानाच्या आधारे पृथ्वी गोल असल्याचे सिद्ध केले. पोपशाही जुलमी कर देखील लादत असे व त्याचा जनतेला त्रास होत असे. म्हणून पोपशाहीच्या विरोधात आवाज उठविणारा प्रॅाटेस्टंट पंथ लोकप्रिय होऊ लागला.
समाजात चाललेल्या या ज्ञान विज्ञानाच्या प्रसाराचा पोपशाहीला त्रास होत असे , कारण त्यामुळे पोपचे हितसंबंध दुखावले जात असत. परिणामी आपल्या कॅथॅालिक परंपरेच्या राजकीय प्रतिनिधींना हाताशी धरून पोपशाही या रेनेसन्स चळवळीला —- पर्यायाने प्रॅाटेस्टंट पंथाला —- विरोध करीत असे.
कॅथॅालिक राजेशाहीचा प्रॅाटेस्टंट जनतेला होणारा त्रास लोकशाही आंदोलनांत प्रवर्तित झाला. त्यातून सरंजामदारी समर्थक राजेशाही नष्ट झाली अथवा राजेशाही इंग्लंडसारखी नामधारी झाली. जुन्या शासकांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या. लोकशाही विकसित होताना यांपैकीची एक मर्यादा म्हणजे “राजा ‘सेक्युलर’ असावा” ! याचा खरा अर्थ असा कि , राजाने आपल्या कॅथॅालिक असण्याचा गैरफायदा घेऊन बायबल विरोधात जाणाऱ्या ज्ञान-विज्ञानाला बाधा आणू नये व पर्यायाने प्रॅाटेस्टंट पंथाला लक्ष्य करू नये ! पुढे लोकशाही प्रस्थापित झाल्यावर “राज्य (स्टेट) हे ‘सेक्युलर’ असावे” हे तत्त्व देखील प्रस्थापित झाले.
अशा तऱ्हेने सेक्युलर शब्दामागे युरोपीय पोपशाहीच्या विरोधात लढविल्या गेलेल्या धर्मविरोधी चळवळीच्या दैदिप्यमान विजयाचा इतिहास आहे. ही धर्मविरोधी चळवळ भारतीय जनतेला प्रेरक ठरू नये , यांसाठी ब्राह्मण्यवादी सेक्युलर शब्दाला विरोध करीत आहेत. दत्तात्रय होसबाळे हे या विरोधकांतील नवीन नाव आहे. लालकृष्ण अडवाणी लोकप्रियतेच्या शिखरावर होते त्या काळापासून “स्युडो सेक्युलर” हा शब्द प्रचलित करून मनुवाद्यांनी सेक्युलर शब्दाला लक्ष्य केले आहे.
यांवर उपाय काय ? एक उपाय असा कि , युरोपातील लोकशाही चळवळीचा इतिहास ज्ञान- विज्ञानाच्या बारीक सारीक तपशीलांसह जनतेसमोर आणणे ! असे करताना पोपशाहीची महापातके भारताच्या वेशीवर टांगणे !! मध्ययुग काळातील पोपशाही ही रखेल्या ठेवून अनौरस संतती निर्माण करण्यात आघाडीवर होती. तेथील लोकशाहीवादी लेखकांनी यांवर भरपूर लिहून ठेवले आहे. Power corrupts and absolute power corrupts absolutely ! सत्ता भ्रष्ट होतेच व निरंकुश सत्ता निरंकुश पद्धतींनी भ्रष्ट होते ! हे जसे युरोपीय पोपशाहीला लागू आहे तसेच भारतीय ब्राह्मण्यशाहीला सुद्धा लागू आहे. कोंकणस्थ ब्राह्मणांची पेशवाई कशी रंगेल फंदीफितुरीत बरबटून निघाली होती , हे पहिल्या बाजीरावाच्या मस्तानीपासून थेट दुसऱ्या बाजीरावाने नग्न स्त्रियांच्या लावलेल्या जाहीर शर्यतीपर्यंत दिसून आले आहे. एतद्देशीय परिवर्तनवादी हा बरबटलेला इतिहास जनतेसमोर आणण्यात अपयशी ठरले आहेत. या पोकळीत सेक्युलर शब्दाला विरोध होत आहे. तथापि , सेक्युलर शब्दाला विरोध करून ही मनुवादी महापातके झाकण्याचे प्रयत्न एकविसाव्या शतकातील इंटरनेट युगात यशस्वी होतील , असे स्वतःला महाविद्वान समजणाऱ्या या मंडळींना का वाटते , कोणास ठाऊक !
भारतात सेक्युलर शब्दाचा हा धर्मविरोधी आशय नाकारून त्याला ‘धर्मनिरपेक्ष’ अथवा ‘सर्वधर्मसमभाव’ असा अर्थ दिला गेला आहे. हा अर्थ चुकीचा आहे. सेक्युलर शब्दात “जुन्या प्रस्थापित धर्मातील रूढी – परंपरावादी अशा जनविरोधी धोरणांना कायदेशीर नकार” अनुस्युत आहे. धर्मनिरपेक्ष अथवा सर्वधर्मसमभाव या शब्दांतून हा नकार अभिव्यक्त होत नाही. धर्मनिरपेक्ष अथवा सर्वधर्मसमभाव हे सेक्युलर शब्दाचे अर्थ होऊ शकत नाहीत. ‘राज्य (स्टेट) सेक्युलर आहे / असावे’ याचा अर्थ असा कि , राज्याने (म्हणजे शासनाने !) जुन्या प्रस्थापित धर्मातील अन्याय्य रूढी – परंपरा व चालीरिती यांना लोकशाही मूल्यांच्या आधारे प्रतिबंध करावा. जर जुन्या धर्मातील रूढी – परंपरा व धोरणे ही स्वातंत्र्य – समता – बंधुता व न्याय या आधुनिक लोकशाही मूल्यांना विरोध करीत असतील तर सेक्युलर शासनाने त्या जुन्या रूढी – परंपरा व धोरणे यांना कायद्याने प्रतिबंध करायला हवा , असे “सेक्युलर” शब्दाला अभिप्रेत आहे.
भारतीय संदर्भातील उदाहरणे बघू या ! समजा , जुन्या धर्म- रूढी परंपरा व धोरणे म्हणून कोणी सतीची चाल समाजात रुजवू पाहात असेल तर शासनाने ते चालवून घेता कामा नये. याचे कारण असे कि , आधुनिक लोकशाही मूल्यांनुसार हा स्त्रियांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर व सन्मानाने जगण्याच्या अधिकारांवर घाला आहे. जुन्या धर्म रूढी – परंपरा व धोरणांनुसार ‘शूद्रांनी ब्राह्मण – क्षत्रिय – वैश्य यांची सेवा करावी’ असे म्हणत असेल व तसे वागत असेल तर हा देशातील शूद्र जनतेच्या लोकशाही अधिकारांवर घाला आहे. जुन्या धर्म रूढी – परंपरा व धोरणे यांनुसार कोणी अस्पृश्यता पाळू पाहात असेल तर तो देशातील समस्त पूर्वास्पृश्य समाजाच्या अधिकारांवर घाला आहे. अशा वेळेस “सेक्युलर” शासनाने जुन्या धर्म- रूढी परंपरा व धोरणे यांच्या विरोधात जाऊन समस्त स्त्रिया , समस्त शूद्र ओबीसी व समस्त पूर्वास्पृश्य यांच्या लोकशाही अधिकारांचे कायदेशीर जतन करणे अपेक्षित आहे.
अशा तऱ्हेने सेक्युलर शब्दाला धर्मनिरपेक्ष वा सर्वधर्मसमभाव शासन असा नकारात्मक अर्थ नसून जुन्या धर्म – रूढी परंपरा व धोरणे यांत शासनाला लोकशाही मूल्यांच्या बाजूने हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार आहे , असा सकारात्मक अर्थ आहे. हा अर्थ ब्राह्मण्यवादी शक्तींच्या हितसंबंधांना मारक आहे. म्हणून ते सेक्युलर शब्दाला विरोध करीत आहेत.
सेक्युलर शब्दाला विरोध करण्यामागे मनुवाद्यांचा अंतस्थ हेतू (hidden agenda) सर्वसामान्य भारतीयांना समजून यावा म्हणून हा लेखप्रपंच !
—— शुद्धोदन आहेर
(3 जुलै 2025 , अष्टमी)
0Shares