- 65
- 1 minute read
” पार्टी विथ डिफ्रंट ” या आपल्याच मूळ विचारधारेचा बळी घेतल्याने भाजप राज्याच्या सत्तेत नंबर वन….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 70
राज्यसभा निवडणूक : भाजपशी पंगा घेण्याची हिम्मत राष्ट्रवादीचे बंडखोर व शिंदेंच्या सेनेत नाही.....!
गेली किमान 5 दशके महाराष्ट्रातील व देशातील राजकारणावर प्रभाव असलेले व मंत्रीपदांसह सत्तेतील पदे आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना खैरातीसारखे वाटून त्यांना नेते बनविणाऱ्या शरद पवारांना आता स्वतःच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी लाचार व्हावे लागले आहे. शरद पवारांच्या मेहरबानीने सत्तेच्या राजकारणात स्थिरावलेल्या रामदास आठवले यांची राज्यसभा उमेदवारी निश्चित मानली जात असून भाजपकडे असलेले संख्याबळ पाहता ते निवडूण येणार हे ही निश्चित आहे. पण शरद पवारांचे काय ? २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १० आमदार आहेत. हेच त्यांचे खरे हक्काचे मतदार. पण निवडूण येण्यासाठी ३७ आमदारांची गरज आहे. म्हणजे २७ मतं कमी आहेत. अशा परिस्थितीत राज्यसभेसाठी इच्छुक असणे हे शरद पवारांना शोभत नाही. राज्यातील मतदार, जनता सोबत नाही, वय आणि शरीर ही साथ देत नाही, अशा परिस्थितीत संसदीय व सत्तेच्या राजकारणातून संन्यास घेणे केव्हाही उत्तम. पण इतका मोठा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांना इतकी छोटी गोष्ट समजत का नाही ? की, सत्तेचा मोह सोडत नाही ? हे प्रश्न आहेत.
देशभरातील 37 आणि त्यातील महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या असून आज 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर ५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीकडे शिवसेना उबाठा 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 10, इतके संख्याबळ असल्याने 7 पैकी केवळ 1 जागा निवडूण येवू शकते. या एका जागेसाठी उबाठा, काँग्रेसमध्ये ही इच्छुक उमेदवार आहेत. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असताना ही उबाठाचे उद्धव ठाकरे यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत, तर काँग्रेस नेते मातोश्रीवर जाऊन ही एक जागा मिळविण्यासाठी त्यांची मनधरणी करीत आहेत. महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिला तर तो सहज निवडूण येईल व किमान 10 मते अतिरिक्त असतील. समाजवादी पार्टीचे 2, शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिटी पार्टीचा 1 आमदार ही 4 अतिरिक्त मतं जोडली, तर या अतिरिक्त मतांचा आकडा 14 इतका होऊ शकतो. तरी ही दुसरी जागा जिंकून आणण्यासाठी 23 मतांची गरज आहे. ही मतं आणणार कुठून ? ती मिळविणे आजच्या घोडेबाजाराच्या राजकारणात मविआसाठी अशक्य आहे. त्यामुळे संयुक्तपणे एकच उमेदवार दिल्यास किमान एक जागा निवडूण येवू शकते. पण मविआने संयुक्तपणे एकच उमेदवार दिला नाहीतर तर ही एक जागा ही हातातून जाईल. मविआला यात अपयश आले तर भाजप पाचवा उमेदवार उतरवून घोडेबाजार करू शकतो. हे मविआ नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.
शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अजित पवारांच्या पत्नी, राज्याच्या उपमुख्यमंत्री व शरद पवारांच्या सुनबाई सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे. त्यांच्या पक्षाची एक जागा निवडूण येवू शकते व त्यांच्याकडे 4 मतं अतिरिक्त आहेत. पण ती भाजपच्या चौथ्या उमेदवाराला मिळू शकतात. भाजपशी पंगा घेण्याची हिम्मत ना राष्ट्रवादी काँग्रेस व ना शिंदेच्या शिवसेनेत आहे. पंगा घेण्याची चांगलीच किंमत मोजावी लागते, हे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर समोर आले आहे. अजित पवारांचा अपघात असो की घातपात. पण यामुळे भाजपच्या मित्र पक्षात केवळ राज्यातच नाहीतर देशभर भितीचे वातावरण पसरले आहे. हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मतं भाजपलाच मिळणार. यात काही शंका नाही.
भाजपकडे 132 आमदार असून चौथी जागा निवडूण आणण्यासाठी भाजपला 16 मतांची गरज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आणि शिंदे सेनेचे अतिरिक्त 20 मतं असल्याने भाजपला या जागेची चिंता नाही. सहज निवडूण येईल. खरे तर 20 अतिरिक्त मतं असलेल्या एकनाथ शिंदेने भाजप लढवित असलेल्या या चौथ्या जागेसाठी दावा करायला हवा होता. पण पंगा घेण्याची हिम्मत नाही. जे मिळतेय त्यात समाधान मानण्याशिवाय भाजपच्या मित्र पक्षांकडे पर्याय नाही. हे फक्त महाराष्ट्रातील चित्र आहे, असे नव्हेतर मित्र पक्षांची कोंडी करण्याचे राजकारण भाजप देशभर करीत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. बिहारमध्ये ही सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांची अशीच कोंडी भाजपने केलेली आहे. हे मंत्रिमंडळ, खाते वाटप व विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून बिहारमध्ये स्पष्ट दिसले आहे.
भाजपचे ” नंबर वन ” यश राज्यातील जनतेचा कौल नाहीतर मविआ नेत्यांच्या असमजूतदारपणाचे लक्षण….!
राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे सेनेचा प्रत्येकी १ उमेदवार सहज निवडूण येत असून त्यांचे उमेदवार भाजपच्याच मर्जीने ठरले आहेत अथवा ठरतील. आपल्या स्वमतांवर आपला उमेदवार निवडूण आणण्याची ताकद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची व शिंदेच्या शिवसेनेची आहे. गेल्या ४ वर्षांपूर्वी अजित पवार असो अथवा एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र अशी आजच्या सारखी ओळख नव्हती. शरद पवारांच्या आश्रयाने अजित पवार, तर उद्धव ठाकरे यांची जी हुजुरी करीत शिंदे राजकारण करीत. भाजपने या दोन्ही नेत्यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना फोडली. मूळ नेत्यांना बाजूला ठेवून पक्ष या फुटीर नेत्यांच्या हातात सोपविला व त्यांना आपले राजकीय मंडलिक बनविले आहे. राज्य विधानसभेत भाजपचे १३२ इतके संख्याबळ आहे, ते असंस्कृत, घटनाबाह्य व तोडफोडीचे राजकारण करून मिळविले आहे. ” पार्टी विथ डिफ्रंड ” या भाजपच्या मूळ विचारधारेचा स्वतःच बळी घेऊन मिळविलेले यश आहे.
महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात मविआची दयनीय अवस्था असून ती या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी व पक्षांनी ओढवून घेतलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मविआमधील घटक पक्षांची इंडिया आघाडी म्हणून एकजूट दिसून आली व भाजपला पर्याय उभा राहिला. राज्यातील जनतेने तो स्वीकारला. भरभरून मतं दिली व भाजपच्या विजयी घोडदौडीला रोखले. पण विधानसभा निवडणुकीत ते दिसले नाही. त्याचे परिणाम या पक्षांच्या समोर आहेत.
राज्यातील सर्वच सत्ता हातातून गेलेली आहे. लोकसभेतील यशाची घोडदौड कायम ठेवता येणे सहज शक्य होते. ती कायम ठेवली गेली असती तर सध्याच्या विधानसभेचे चित्र वेगळे असते. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चित्र ही वेगळे असते. दारूण पराभवाला सामोर जाण्याची वेळ उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शप) यांच्यावर आली नसती. गद्दारी व बंडखोरी करून पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदे व अजित पवारांना नेते म्हणून सत्तेच्या राजकारणात स्थिरावता आले नसते. पण शरद पवार यांच्याकडे सहा दशकांचा राजकीय अनुभव असताना , उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा करिश्मा असताना आणि काँग्रेसकडे शंभरपेक्षा अधिक वर्षांचा उज्ज्वल इतिहास असताना फडणवीस यांच्यासारखा उथळ व बुड नसलेला नेता हवी झालेला दिसत आहे. भाजपला मिळालेले व मिळत असलेले यश हे राज्यातील जनतेचा कौल नाहीतर विरोधकांच्या असमजूतदारपणाचे लक्षण आहे.
अदानी व दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण अडचणीचे….!
मविआने शरद पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजप व मित्र पक्ष ७ वा उमेदवार उभे करणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर उबाठाने उमेदवार दिल्यास अतिरिक्त २० मतांच्या बळावर शिंदे भाजपच्या सहमतीने दुसरा उमेदवार ही मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. मविआला त्यांच्या हक्काची एकही जागा मिळू नये, अशी व्यूहरचना भाजपने सुरू केली असून सध्या तरी महाविकास आघाडीकडे त्यावर कुठलाच पर्याय असल्याचे दिसत नाही.
शरद पवार यांच्या नावावर एक वेळ उबाठा तयार होऊ शकते. पण दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊन शरद पवार येणाऱ्या काळात भाजपसोबत जाऊ शकतात. ही चर्चा राज्यभर सुरू असून शरद पवार यांनी या संदर्भात काही ही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पवारांची ही कृती म्हणजे मूक संमतीच आहे, अशी ही चर्चा पुन्हा सुरू आहे. त्याशिवाय शरद पवार यांचे व मोदीचे उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्याशी संबंध असल्याने शरद पवारांसाठी जागा सोडायला काँग्रेस तयार नाही. असा सर्व पेच आघाडीसमोर उभा असल्याने सातवी जागा ही धोक्यात आली आहे.
सन २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सत्ता व मुख्यमंत्रिपद हाती असताना, तसेच पुरेसे संख्याबळ असताना ही उद्धव सेनेचे संजय पवार हे भाजपचे धनंजय महाडिक यांच्याकडून पराभूत झाले होते. यावेळी तर भाजप व मित्र पक्षांकडे सत्ता आहे. दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत. घोडे बाजार करण्यासाठी धन ही अफाट आहे. त्यामुळे १ जागा जिंकून आणणे हे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीपुढे आव्हान आहे. हे आव्हान महाविकास आघाडीचे नेते कसे पेलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय महाविकास आघाडी खरेच भाजप आणि मित्र पक्षांच्या विरोधात लढण्यास तयार आहे, हे ही या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार असल्याने हा निकाल महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुढील राजकीय वाटचालीवर ही परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे या घटक पक्षांच्या नेत्यांनी खूप विचार करून निर्णय घेतला पाहिजे. संख्याबळ असताना ही एक जागा मिळविणे सहज शक्य राहिलेले नाही.
……………
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
9967380268
0Shares