- 79
- 1 minute read
महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 81
महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!
महाड येथे केलेल्या चवदार तळ्याचा मुक्तीसंग्राम, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मसंगर संबोधले; आज ९९ वर्षे पूर्ण करून शताब्दी वर्षात प्रवेश करित असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या धर्मसंगराचा आम्हाला समजावून दिलेला अन्वयार्थ पुन्हा एकदा जाणून घेण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ‘मुकनायक’ च्या माध्यमातून केली; तर, प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाचा प्रारंभ महाडच्या चवदार तळे सत्याग्रहापासून केली. या लढ्याची जबाबदारी निश्चित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जीवनातील चार घटकांना त्यांची जबाबदारी काय असावी यावर आपले विचार परखडपणे मांडले आहेत. महाड च्या धर्मसंगर संदर्भात वरिष्ठ हिंदू जातींना त्यांच्या जबाबदारीचे भान सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या मुळाशी एकाच धर्माच्या दोन विभागांमध्ये जो संघर्ष उभा राहिला त्याच्या मुळाशी, “आपण एकाच धर्माचे असताना आम्ही देखील समान योग्यतेचे असून धर्माचे समान अधिकारी आहोत, या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी हा लढा दिला”. परंतु, वरिष्ठ हिंदू जातींनी यांस नकारार्थी उत्तर दिले ते जगजाहीर आहे. तत्त्व आणि आचरण यात विरोधाभास ठेवणाऱ्या वरच्या जाती समुहांनी समतेच्या तत्त्वाला कायम नकार दिला आहे. आजही, देशात समतेच्या तत्वाला वरच्या हिंदू जातींचा विरोध आहे, हे अनेक घटना प्रसंगातून आपल्याला म्हणता येईल.
समतेच्या तत्त्वाला नाकारणारे संविधान बदलाची भाषा किंवा त्या दिशेने कृती करण्यासाठी आजही जी पावले प्रतिगामी व्यवस्था उचलते, त्याच्या मुळाशी समतेच्या तत्वाला असणारा विरोध हेच कारण आहे. समतेचे तत्त्व अंगिकारले म्हणजे आपल्या खालच्या जातीसमुहांना बरोबरीचे मानावे लागेल, ज्यांस त्या समुदायाची आजही मानसिक तयारी नाही. आता तर, समतेच्या तत्वासाठी महाडच्या धर्मसंगरात एकसंघपणे लढलेल्या समुहांना अबकड वर्गीकरण करून विभाजित केले जात आहे. हे विभाजन समतेच्या तत्वासाठी असते तर, त्याचे निश्चितपणे स्वागत केले असते; परंतु, कोणताही डेटा नसताना जाती विशेषांची प्रगती झाली, असं आनमान फटके म्हणऱ्यांना ज्ञान-विज्ञानातील शास्त्रीयता आणि तत्व व्यवहारातील मानवता या दोन्हीही नको आहेत, हे स्पष्ट असल्याने या वर्गीकरणामागील त्यांची भूमिका समतावाद्यांना विभाजित करून विषमतेचे घोडे दामटण्याची आहे. याचा अर्थ एवढाच होतो की, महाडच्या धर्मसंगराचा प्रवेश शताब्दी वर्षात होत असताना ही वरिष्ठ हिंदू जातींना त्यांच्या जबाबदारीचे भान आलेले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ‘मुकनायक’ या नियतकालिकापासून पत्रकार म्हणून झाली. महाडच्या धर्मसंगराचा जो वृत्तांत तत्कालीन नियतकालिकांनी छापून प्रसिद्ध केला, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या नियतकालिकांचा खरपूस समाचार घेत, त्यांची धर्मसंगराप्रति काय जबाबदारी असावी, याचे परखड भान आणून दिले. यात कुलाबा समाचार, ज्ञानप्रकाश, चाबुकस्वार, आणि भालाकार या सर्वच नियतकालिकात महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा वृत्तांत छापून आला; परंतु, अत्यंत खोटारडेपणाने. कोणतेही सत्य किंवा वास्तव त्यांच्या वृत्तांतामध्ये नव्हते. या बाबतीत देखील आपणांस हे म्हणता येईल की, गोदी मिडिया हा आजच्या काळातच आहे, असे नव्हे; तर, त्या मिडीयाची पूर्वसुरी परंपरा त्या काळात ही होतीच! मात्र, या दोन्ही काळातील त्यांचे अधिष्ठान एकच आणि ते म्हणजे समता तत्त्वाला कडाडून विरोध आणि विषमतेचे प्रवाह विस्तृत करण्याचे षडयंत्र!
महाडच्या धर्मसंगर संदर्भात तत्कालीन इंग्रज सरकारची जबाबदारी काय असली पाहिजे होती, यावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आमचे मागणे न्यायाचे आणि हक्काचे आहे. ही बाब डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन सर्व संदर्भ देऊन सिद्ध केली आहे. सार्वजनिक म्हणजे नेमके काय, हे सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, सार्वजनिक म्हणजे सरकारी असा संकुचित अर्थ करतात जो सर्वथैव चुकीचा आहे. जे जे सरकारी असेल ते सर्वांसाठी असणारच; परंतु, सर्वांच्या उपयोगाकरिता ते सार्वजनिक हाच सार्वजनिक या शब्दाचा खरा अर्थ असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग ती सार्वजनिक व्यवस्था सरकारी असो, बिनसरकारी असो किंवा निमसरकारी!
‘दे ग बाई जोगवा’, असं म्हणून काही मिळत नसते. आपले हक्क रडून, मागून किंवा इतरांच्या दया बुद्धीवर अवलंबून राहून मिळत नसतात.ज्याने त्याने आपल्या तेजानेच ते मिळवले पाहिजे. आपल्या हक्काच्या विरोधात कोणी प्रतिकार करेल म्हणून ते सोडून द्यायचे नसतात; तर, निश्चयाने त्या शक्तींचा प्रतिकार केला पाहिजे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. महाडच्या धर्मसंगरावर आपल्या समाज बांधवांना उद्देशून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ” ब्रह्मराक्षस लागतो तो भित्यापाठीच लागतो. सर्वशक्तिमान देवाला बळी द्यावयाचा झाला तर त्या कामी व्याघ्रादी हिंस्र पशूंचा कोणी उपयोग करीत नाहीत. त्यांच्याऐवजी गरीब बिचाऱ्या कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्यात येतो. असं सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, आजचे समाज बांधव मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. याची इतिहास ही साक्ष देतो असं सांगत, ते पुढे म्हणतात की, नागेवाडीच्या महजूर सेटी बिन रायनाक महारांत एवढे तेज कुठून आले असते की, ज्या तेजामुळे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या पाटीलकीसाठी धारदिव्य करून कोणाचीही कुमक न घेता मोगलांच्या ताब्यात असलेला वैराटगड जिंकून मराठ्यांच्या राज्यास परत जोडून दिला. या उदाहरणावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या समाजाला शूरतेचा कसा इतिहास आहे, हे सांगत असताना ही शूरता कोणत्याही काळात आपल्या हक्क आणि अधिकारासाठी पणास लावण्याचे ते सांगतात.
महाड धर्मसंगराचा शताब्दी वर्षात प्रवेश होत असताना याचे भान समाजाती सर्व घटकांना असावेच; परंतु, त्याहीपेक्षा आजच्या काळात विषमतावादी व्यवस्थेशी जुळवून घेणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या आत्मसन्मानाचे तेज जागवावे लागेल!
महाडचा धर्मसंगर आम्हाला केवळ अभिवादनासाठी खुणावत नाही तर, आमचे आत्मतेज कायम राहून समतेच्या तत्वासाठी धर्मसंगर देत राहण्यासाठी बजावतो. समतेचे तत्व धारण करणाऱ्या व्यवस्थेसाठी विषमतावादी व्यवस्थेशी संगर कायम राहील, हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा यानिमित्ताने समग्र भारत वासियांना संदेश आहे!
चंद्रकांत व्ही. सोनवणे
संपादक,
3 Ways Media, Mumbai.
0Shares