- 8
- 1 minute read
होय… मला तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 13
होय... मला तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे - प्रशांत आंबी
आ. गायकवाड यांनी मला धमकी व शिवीगाळीचा फोन केल्यापासून लोक जसे माझ्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत, तसे माझ्या विरोधातील काही लोक मला शिवीगाळ, आई, बायको, बहिणीवरून वाईट कमेंट, माझ्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत आहेत. हा देशद्रोही, अर्बन नक्षलवादी असल्यामुळे याला अटक करा, अशी मागणी करत आहेत. खोट्या अफवा पसरवत आहेत. धमक्यांचे फोन सुरूच आहेत. F.I.R. व्हावी या मागणीसाठी आतापर्यंत माझे 14 सहकारी जखमी झालेले आहेत. माझ्यामागे अवघा शिवप्रेमी महाराष्ट्र, मिडिया, चळवळीतील लोक, AISF, CPI, वंचित बहूजन आघाडी, पंँथर संघटना, आंबेडकरी समाज, इंडिया आघाडी उभी राहिली नसती, तर कदाचित सुरुवातीला तक्रारच घेत नाही पासूनचा प्रवास हायकोर्टापर्यंत पोहोचला नसता. तुम्ही आहात म्हणूनच मी हे धाडस करू शकलो.
आ. गायकवाड हे मला कोल्हापुरात येऊन घरात घुसून मारणार होते, माझी जीभ कापणार होते, मला चिरडून मारणार होते, पण ते आले नाहीत. त्यामुळे आम्हीच बुलढाण्यात त्यांच्या दारात संविधानिक मार्गाने पुस्तक वाचणार होतो. त्यासाठी निघताना अचानक वाटेत मला आ. गायकवाड यांच्या समर्थकांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन मिळालं, त्यात या पुस्तकाची विक्री करून करोडो रुपये मिळवणारा प्रशांत आंबी याला अटक करा, अशी प्रमुख मागणी होती. त्याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. चीन व पाकिस्तान आधी देशातून त्याला फंडिंग आले आहे का? तसेच हे पुस्तक छापण्यासाठी त्याला कोणत्या जीहाद्याने मदत केली? याची CID चौकशी व्हावी. तसेच अटक वॉरंट जाहीर करून त्याची मालमत्ता जप्त करावी, अशा व इतर मागण्यांचा त्यात समावेश होता. यावरून मला एवढं लक्षात आलं आहे की, हा त्रास फक्त काही दिवसांपुरता नाही तर हे लोक मला व कुटुंबीयांना शेवटच्या श्वासापर्यंत त्रास देणार आहेत. तसेच अजून मला हे कशाकशात अडकवण्याचा प्रयत्न करतील? हे सांगता येणे अवघड आहे. माझ्यावर अन्याय होऊन देखील साधी F.I.R. न घेणारी पोलीस यंत्रणा माझ्यावर भविष्यात किती गुन्हे दाखल करून, कधी अटक करेल? हे सांगता येत नाही. आ. गायकवाड यांनी माझ्या संपत्तीबाबत जी मागणी केली आहे, याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, सध्या माझ्या नावावर राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे 99 वर्षाच्या करारावर असणारं घर त्यांनी घ्यावं, याबरोबरच माझं कर्जसुद्धा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं, ही मागणी मी सरकारकडे करत आहे.
यापुढे अजून काय काय घडामोडी घडतील? माहित नाही. ज्या पानसरेंनी विचारांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत मी रेडगार्ड होतो. या विचारासाठी कधी जीव जरी द्यायला लागला, तरी त्याची तयारी मी तेव्हापासूनच ठेवली होती. एकीकडे त्यांच्याकडून असे खोटे आरोप होत आहेत, त्यामुळे खरी बाजू काय आहे? हे लोकांना कळावं यासाठी हा लेखनप्रपंच मी करत आहे. कारण पानसरेंचं विवेक निर्धार परिषदेतील भाषण माझ्या पक्कं लक्षात आहे, त्यात ते म्हणाले होते. त्यांच्याकडे कुजबुज ब्रिगेड आहे. ते नेहमी कुजबुजतात, खोटं बोलतात पण रेटून बोलतात. पुन्हा पुन्हा बोलतात. एवढ्यांदा बोलतात की लोकांना पण वाटतं की हे खरंच आहे. 1972 च्या दुष्काळात माझं कुटुंब कर्नाटकातून कोल्हापुरात आलं. मी चार वर्षाचा असताना माझे वडील वारले. वयाच्या 9 व्या वर्षापासून मी भंगार गोळा करायला सुरुवात केली. मी, माझी छोटी बहीण चिमी, आई (यल्लव्वा), ताई (रुक्मीणी) आम्ही सगळ्यांनी कोल्हापूर शहरातला एक कोंडाळासुद्धा वेचायचा सोडलेला नाही. याचे साक्षीदार हजारो लोक आहेत. गटारी-नाल्यातून, ओढ्या-विचुकाट्यातून, उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात भंगार मी गोळा केलंलं आहे. रोज गु-शेणात, घाणीत, खरखट्यात, घाण पाण्यात, चिखलात हात घातलेला आहे. अनेकवेळा पायात काच, मोळे, इंजेक्शनच्या सुया घुसलेल्या आहेत. लोक आम्हाला रस्त्यावरून बोद घेऊन चालताना पाहिलं तरी पलीकडच्या बाजूला जायचे, शिवून घ्यायचे नाहीत, भूक-तहान लागल्यावर कुठे भीक मागितली तर अन्नपाणी वरून द्यायचे. भंगार वेचताना लोक आम्हाला चोर या संशयाने शिव्या द्यायचे, मारायचे, कुत्री अंगावर सोडायचे. हे सगळं आम्ही 11 वर्ष सहन केलंलं आहे. पण त्या लोकांबदल माझा कोणताही राग नाही, पण सध्या ज्यांना हे भोगावं लागतं, त्यांच्यासाठी मी काम करत आहे. त्याचदरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे शाळेतील शिक्षक राहिलेले गिरीष फोंडे यांच्यामुळे चळवळीशी माझा संपर्क आला. तेव्हा 2012 च्या AISF च्या शिबिरात माझी पानसरेंबरोबर ओळख झाली. याच शिबिरात मला शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेटलं. या पुस्तकामुळेच मला शिवराय किती महान राजे होते, हे कठालं.
मी अगोदर पुरोगामी विचारांचा नव्हतो, कारण आई देवदासी, वयाच्या 7 व्या वर्षी तिच्या गळ्यात आई-वडिलांनी दर्शन बांधून तिला देवाला सोडलं. जातीने हिंदू-कोळी घरात देवांच्या फोटोंची रांग आणि देवाऱ्यात मुर्त्या ठेवायला जागा नाही, एवढे देव आहेत. सौंदत्ती आणि कोगुटनुर या दोन्ही परड्या आमच्या घरात आहेत. आम्ही या विचारात वाढल्यामुळे मी स्वतः दर अमावस्येला कधी बाळूमामा, कधी सौंदत्तीला वाऱ्या करणं, उपवास करणं, हातात गंडेदोरे, गळ्यात देवाचे लॉकेट घालून फिरणं, परड्या भरणं, कोल्हापुरातील वड्यावरच्या यल्लम्मा यात्रेत जोगवा मागणं. एवढेच काय मी स्वतः आमच्या घरात असणारा साती आसरा सुपात वाजत-गाजत आणलेला आहे. या वातावरणात वाढलेला मी अचानक या प्रवाहात आलो आणि या चळवळीचा झालो. थोडं थोडं वाचत गेलो, ऐकत गेलो, चिकित्सा करू लागलो आणि परश्यापासून कॉम्रेड प्रशांत आंबी या प्रवासाला सुरुवात झाली. 2012 पर्यंतचा हा सविस्तर प्रवास मी माझ्या बोद या आत्मकथनपर पुस्तकात मांडला आहे. आईच्या आणि माझ्या वयात खूप अंतर आहे, तिला या वयात मी माझे पुरोगामी विचार सांगण्यासारखी परिस्थिती नाही, तिचं जोगव्याला जाणं मी बंद केलं होतं, पण त्यानंतर तिच्या गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन झाल्यामुळे अजूनसुद्धा ती तेव्हा तू मला जोगव्याला जावू दिलं नाहीस, म्हणून मला त्रास झाला. त्यामुळे मी आता त्या गोष्टीलासुद्धा विरोध करत नाही आणि आजसुद्धा ती जोगव्याला जाते, याचे कोल्हापुरात हजारो साक्षीदार भेटतील. माझी मोठी बहीण आठरा घरची धुण्या-भांड्याची कामे करते. तिचे हे काम करत असताना साबणाने नासलेले हात-पाय बघितले, तर तुम्हाला विश्वास बसेलच. माझी ताई ज्यावेळेला कामावर सांगते की, हा माझा भाऊ आहे, त्यावेळेला त्यांनासुद्धा पटत नाही. मी टीव्हीमध्ये दिसतो, पेपरमध्ये दिसतो यावरून त्यांना मी खूप मोठा माणूस आहे, असं वाटतं. 2012 पासून आजतागायत अनेकांना नुकसान भरपाई मिळवून दिली, लोकांना अनेक योजनांचे लाभ मिळवून दिले. अनेक विद्यार्थी-युवकांचे प्रश्न सोडवले. हजारो आंदोलने, मोर्चे केले. हे करताना ते कोणत्या विचारांचे आहेत, हे पाहिलं नाही, पण विचारांशी, तत्त्वांशी बेइमानी मी कधीच केली नाही. 2022 साली माझा सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह झाला. ती (आरती) सुद्धा 2014 पासून चळवळीत सक्रिय आहे, सध्या ती AIYF ची राज्याची अध्यक्ष आहे. माझे दोन्ही भाचे (सुनिल, श्रीकांत) या चळवळीत सक्रिय आहेत. म. फुले जनआरोग्य योजनेतला भ्रष्टाचार मी यापूर्वी बाहेर काढला आहे, त्यात फक्त कोल्हापुरात त्यावर्षी 306 कोटीचा भ्रष्टाचार हॉस्पिटलमध्ये झाला होता, त्यावेळीसुद्धा या कारवाईदरम्यान माझ्यावर अनेक स्टोऱ्या आणि पहिल्या पानावर माझ्या प्रतिक्रिया आल्या होत्या, यात मला भ्रष्टाचार किंवा पैसे कमवायचे असते तर मी किती पैसे कमावू शकलो असतो, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. असे अनेक प्रश्न मी हाताळले आहेत.
पुस्तक विक्रीशी माझा 2013 मध्ये संबंध आला. पानसरेंनी घेतलेल्या चरित्र ग्रंथमाला प्रकाशनाच्या कार्यक्रमात पुस्तकांच्या स्टॉलची जबाबदारी आमच्या दोघांवर (शिवाजी माळी आणि मी) दिली होती. त्यावेळी आम्हाला पुस्तक विक्रीतून चांगले पैसे भेटले होते, त्यातील निम्मे पैसे आंदोलनाची दोन-तीन बिलं भागवून उरलेले आम्ही घेतले आणि हीच पद्धत अजूनपर्यंत सुरू आहे. हळूहळू मी अनेक प्रकाशकांकडून पुस्तके मागवू लागलो, तसेच छपाईलासुद्धा लोकांकडून हात उसने तसेच घर स्टँपवर लिहून देऊन प्रकाशनाला सुरुवात केली. हळूहळू लोकांची प्रचंड मागणी वाढू लागली, तसं मी इतर पुस्तकेसुद्धा प्रकाशित करू लागलो. लोकांना पुस्तके पाठवू लागलो, काही लोक हा चळवळीचं काम करतोय, म्हणून पाच पन्नास रुपये जास्त पाठवायचे. पण तसे खूप कमी लोक भेटले आणि अशाच लोकांची संख्या जास्त वाढू लागली. जे पुस्तके मागवायचे आणि पैसे दोन वर्षानं, तीन वर्षांनं द्यायचे, ते पण वारंवार पैसे मागितल्यावर. ज्यांनी परत दिले, त्यांनी किमान दिले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, पण पैसे बुडवणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. त्यात पूर्ण पैसे बुडवणारे, कमी पैसे देणारे, ट्रान्सपोर्ट खर्च बुडवणारे असे बरेच प्रकार आहेत. त्यात काही पुस्तक विक्रेते, मित्र, काही चळवळीतील कार्यकर्ते आणि काही इतर लोक आहेत आणि सहजच प्रशांत, मला एक पुस्तक दे! तुला गुगलपे करतो, नंतर पैसेपण तिकडे आणि पुस्तकपण तिकडेच. अशा लोकांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. मी यातील अनेकांना मेसेज करायचा प्रयत्न केला, फोन केले. जे फोन उचलायचे नाहीत, त्यांना मॅसेज केले, ते सीन करायचे पण जाणीवपूर्वक रिप्लाय द्यायचे नाहीत. काही फक्त “देतो देतो म्हणायचे.” “आम्ही वाटायलाच घेतली होती, अशी त्यांची उत्तरं असायची. माणूस कायमचा तुटू नये, यासाठी मी कुणाला शक्यतो कधी दुखावलं नाही. हे सर्व आतासुद्धा सुरू आहे, पण मी आता जास्त काळजी घेतोय. अलीकडे स्मिता पानसरे आणि बन्सी सातपुतेंनी तर मला स्ट्रीक्ट वॉर्निंग दिली आहे, की पैसे आल्याशिवाय अजिबात पुस्तके पाठवायची नाहीत. याचा अर्थ सगळेच असे आहेत का? तर मुळीच नाही. अनेक लोक मला मदत करत आले आहेत. ते पहिल्यांदा पैसे पाठवतात आणि पुस्तक मागवतात. काही चळवळीतील कार्यकर्ते इतरांकडे जरी हे पुस्तक असलं तरी मला मदत म्हणून माझ्याकडूनच घेतात. म्हणूनच AISF चा कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला प्रवास माझा आजतागायत सुरू आहे. मी AISF चा राज्यसचिव म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. कोरोना काळात 2019 रोजी दरवर्षी पुस्तकांची शिवजयंतीला मागणी जास्त असते, मी गेली अनेक वर्ष लोकांनी वैचारिक जयंत्या साजऱ्या कराव्यात, यासाठी प्रयत्न करतोय. आता सध्या त्याला यशसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे जयंतीदरम्यान आम्ही जास्त प्रती छापतो. पण तेव्हा अचानक लॉकडाऊन पडलं, तेव्हा पुस्तके वर्षभर आमच्याकडे पडून राहिली. त्याचं व्याज माझ्या अंगावर पडत गेलं. ती पुस्तके हळूहळू नंतर संपवत उभारायचा प्रयत्न आम्ही करत होतो, सर्वत्र पुस्तके जात होती, पण काही कार्यकर्त्यांना ते बघवत नव्हतं, त्यामुळे आमच्या माघारी ते तक्रारी करू लागले होते, त्याला कंटाळून आम्ही चळवळीचं ऑफिस सोडून पिनाक प्रासाद येथून पुस्तके संपूर्ण देशभर पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही बराच व्याप वाढवला, कामाच्या पद्धतीत सुधारणा केल्या, कायदेविषयक पुस्तके, संविधान, आंबेडकरी-पुरोगामी साहित्य ठेवायला सुरुवात केली. स्टाफ वाढवला, थोडी चांगली घडी बसत होती, पण अजुन भांडवलाची गरज होती. माझी ही अडचण मी गिरीश फोंडेना सांगितली, पण अलीकडेच त्यांना नोकरीतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यांचेसुद्धा अनेक हप्ते Bounce झाल्यामुळे त्यांचा सिबिल खराब झाला होता. त्यामुळे तेव्हा त्यांनी मला त्यांचे सहकारी व माझे शिक्षक संतोष सरांना विनंती करून त्यांच्या नावावर कर्ज घेऊन द्यायला लावलं. त्यांनी एक रुपयाचा स्वार्थ न ठेवता स्वतः अडचणीत असून स्टॅम्प, कागदपत्रांचे पैसेसुद्धा त्यांनीच देऊन मला कर्ज घेऊन दिलं, त्यांना ते सहा महिन्यात मला परत करायचं होतं आणि आम्हाला म. फुले यांची सर्व पुस्तकेसुद्धा छापायची होती. त्यामुळे मी चळवळीशी संबंधित असणाऱ्या अनेक लोकांच्या पतसंस्थाना भेटून आलो. त्यांना बहिणीच्या नावावर असणाऱ्या जमिनीची कागदपत्रे, ITR, प्रॉपर्टी मॉर्गेज व्हॅल्युएशन रिपोर्ट, माझ्या व्यवसायाची कागदपत्रे सर्व दाखवलं, तसेच एक जामीनदार सरकारी कर्मचारी देण्याची तयारीसुद्धा दर्शवली, पण कुणीही लोनसाठी सहकार्य केलं नाही. आता अलीकडे कळतंय की त्यातील काहींनी बाहेर चौकशी केली, त्यांना मी अडचणीत आहे हे कळल्यामुळे त्यांनी मला कर्ज देण्यास नकार दिला. अशा पतसंस्था ज्या चळवळीतीलच कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्या अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभ्या राहत नसतील तर त्या संस्था तरी काय कामाच्या?
हे पुरोगामी, आंबेडकरी साहित्य पोहोचवत असताना आपले विचारविरोधी लोक जाणीवपूर्वक ही मोहीम राबवतात की यांच्याकडून पुस्तके मागवा, यांना पुस्तकाची ऑर्डर द्या आणि पुस्तके आली की ती घेऊ नका, रिटर्न करा म्हणजे हे तोट्यात येतिल. अशा विकृत लोकांनी न स्वीकारलेली पुस्तके रिटर्न परत येताना बऱ्याचदा गहाळ, खराब होतात, काही आपले लोकसुद्धा आज्जी वारली होती, वेळ नव्हता, पोस्टमन ऑनलाईन पैसे घेत नव्हता, अशी कारणं सांगायचे. काही पोस्टमनतर पार्सल द्यायचा कंटाळा करून डायरेक्ट खोटा शेरा टाकून परत पाठवायचे. याच्या तक्रारी आम्ही अनेकवेळा करतो, पण पोस्टातून अनेक पार्सलचा ट्रेस लागत नाही. फक्त मागच्या आर्थिक वर्षात 3 लाख वीस हजार तीनशे वीस रुपयांच्या मनीऑर्डरर्स आम्हाला मिळालेल्या नाहीत, त्याची तक्रार करून तीन महिने झाले पण अजून त्यावर पोस्टाचं काम सुरूच आहे. आम्ही गेली अनेक वर्ष पुस्तकांचा प्रचार व्हावा यासाठी Paid जाहिराती लावतो, कारण सध्या चळवळींच्या पोस्टना अजिबात रीच नाहीये. त्यावेळी लोक मला पुस्तके हवीत म्हणून कमेंट करायचे. त्यावर प्रवीण राऊत नावाचा इसम त्यांना संपर्क करायचा आणि मी साऊ बुक गॅलरीतून बोलतोय, तुम्ही पुस्तकाचे पैसे पाठवा. मी तुम्हाला पुस्तके पाठवतो असं त्यांने शेकडो लोकांना फोन केले, पैसे घेतले. नंतर तो फोन उचलायचा नाही. त्यामुळे काही दिवसांनी ते लोक आम्हाला फोन करायचे, बडबडायचे, आमचीच तक्रार करतो म्हणायचे. हा प्रकार आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्याची तक्रारसुद्धा केली. अनेक लोकांकडून त्याने पैसे घेऊनसुद्धा बदनामी नको म्हणून आम्ही पुस्तके पाठवली. नंतर इतर प्रकाशकांशी बोलल्यानंतर त्याने न्यू ईरा, पुस्तकविश्व अशा अनेक प्रकाशकांची अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे समजले.
त्यातभर म्हणजे याच दरम्यान पिनाक प्रासाद येथे पुस्तके व इतर वस्तू पावसात भिजून झालेलं मोठं नुकसान. येथून जेव्हा आम्ही देशभर पुस्तके पाठवत होतो, तेव्हा इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पावडर कोटिंगचा पत्रा होता आणि त्याच्या खाली लागूनच वारा खेळता राहावा, यासाठी एक फूटभर जाळी होती. आम्ही जवळजवळ तिथं दोन वर्ष होतो, पण कधीही तिथून एक थेंब पाणी आलं नव्हतं, कारण बाहेरपण पत्रा सोडला होता. पण एप्रिल 2025 मध्ये एवढा आक्राळविक्राळ स्वरूपाचा पाऊस पडला की आसपासच्या परिसरातील अनेक झाडं गळून पडली होती, त्या पावसात आत पाणी पडून लाखो रुपयांची पुस्तके, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य भिजलं. लाखोंचं नुकसान झालं पण काही ठराविक लोकांना सोडलं तर ही गोष्ट मी कुणाला सांगितली नाही. यावेळी मी मदतीचं आवाहन केलं असतं तर चळवळीतील हजारो लोकांनी मला मदत केली असती. कारण माझी काळजी असणारे, माझ्यावर प्रेम करणारे लाखो लोक मी मिळवले आहेत, पण तुम्हाला पुस्तके व्यवस्थित ठेवता येत नाहीत का? इन्शुरन्स काढता येत नाही का? असा प्रश्न काहीजण उपस्थित करून आमचीच बदनामी करतील, या भीतीने मी त्यावेळी मदतीचं आवाहन केलं नाही, त्याचबरोबर त्यावेळी स्वतःसाठी हात पसरायचं धाडस माझं झालं नाही. इतरांसाठी मात्र अनेकवेळा आम्ही आवाहन केलं आहे. कोरोना, महापूर, अशा अनेक नैसगिक आपत्तीमध्ये ट्रक ट्रक भरून साहित्य वाटलं आहे, मदतकार्यात सहभागी झालो आहे. ही सर्व परिस्थिती माझे जवळचे जे सहकारी आहेत त्यांना माहित आहे. त्यामुळे हरीश आणि धिरज या दोघांनी इतरांशी चर्चा करून सुरुवातीला माझा नकार असतानासुद्धा मदत गोळा करण्यासाठी पुढाकर घेतला. त्यांचे आभार. माझ्यासाठी या अगोदर अनेकांनी वैयक्तीक मदतीची तयारी दर्शवली, पण मी त्याला कायमच नकार देत आलो आहे. पण आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, हो…मला तुमच्या मदतीची खरंच गरज आहे, ती तुम्ही कराल हे मला ठाऊक आहे. कारण एवढा त्रास सहन करूनही माझे वैचारिक विरोधक माझी अशी बदनामी करत असतील आणि खोटारडे आरोप करून त्रास देत असतील, तर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. अगोदरसुद्धा माझ्या प्रत्येक कामासाठी तुम्ही उभे राहिलेले आहात आणि आत्ताही उभे राहाल म्हणून मी हे आर्थिक मदतीचं आवाहन आपल्यासमोर करत आहे, ज्या आ. गायकवाड यांनी मला तू इथून पुढे हे पुस्तक वाटताना दिस… अशी धमकी दिली आहे, त्यांचं आव्हान स्वीकारून मी या वर्षभरात या पुस्तकाच्या दहा लाख प्रती नाममात्र किंमतीत व 2 लाख मोफत वितरित करणार आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये 24 भाषांमध्ये संपूर्ण देशभर पाठवण्याचा माझा मानस आहे. तसेच इतर पुरोगामी व आंबेडकरी साहित्य प्रकाशित मला करायचं आहे, यासाठी मोठा निधी अपेक्षित आहे. आ. गायकवाड यांच्या विरोधातली लढाईसुद्धा पुढे बराच काळ लढावी लागणार आहे, उद्या हायकोर्टात आम्ही आ. गायकवाड यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे. यासाठी पिटीशन दाखल करत आहोत. यात ॲड. असीम सरोदे व त्यांची टीम सहकार्य करत आहे. या अगोदरसुद्धा मी लढलेलो आहे आणि ही लढाईसुद्धा मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन…
0Shares