Back to Top

Back to Top

3 Ways Media

इटलीची ‘सावित्रीमाई’ – सेंट रोझ व्हेनेरिनी.

इटलीची ‘सावित्रीमाई’ – सेंट रोझ व्हेनेरिनी.

आज आपण २१ व्या शतकात वावरताना स्त्री-शिक्षणाबद्दल सहज बोलतो. पण शेकडो वर्षांपूर्वी, मग तो भारत असो वा युरोप, मुलींच्या हातातील पुस्तक हे समाजाला धोका वाटत असे. पुण्याच्या भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला, तसाच एक लढा इटलीच्या भूमीवर लढला जात होता. तो लढा होता सेंट रोझ व्हेनेरिनी यांचा. त्यांना आज आपण ‘इटलीतील सावित्रीबाई’ म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ९ फेब्रुवारी १६५६ रोजी इटली येथील व्हिटरबो येथे जन्मलेल्या, इटलीच्या मातीत स्त्री-शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या आणि हजारो मुलींच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश नेणाऱ्या, सेंट रोझ व्हेनेरिनी या माऊलीने आजच्या दिवशी म्हणजे ७ मे १७२८ रोजी जगाचा निरोप घेतला. त्या क्रांतीकारिकेच्या स्मृतिदिनानिमित्त हा लेखन प्रपंच!
 
एका अस्वस्थ मनाची हाक
 
१७ व्या शतकातील इटली. स्त्रियांचे आयुष्य चूल, मूल या चार भिंतींत बंदिस्त होते. अशा काळात व्हिटरबो शहरात एका तरुण मुलीचे मन अस्वस्थ होते. तिचे नाव रोझ व्हेनेरिनी. रोझला जाणवले की, जोपर्यंत स्त्री सुशिक्षित होत नाही, तोपर्यंत समाज आणि कुटुंब अंधारातून बाहेर येऊ शकणार नाही. १६८५ मध्ये, जेव्हा समाजाने मुलींच्या हातात लेखणी देणे अयोग्य मानले होते, तेव्हा रोझ यांनी सर्व विरोधाला झुगारून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तेव्हा त्यांच्याकडे ना मोठी साधनसामग्री होती, ना समाजाचा पाठिंबा. त्यांच्याकडे होती ती केवळ एक अढळ जिद्द. त्यांनी केवळ उच्चभ्रूंसाठी नव्हे, तर सर्वसामान्य आणि गरीब मुलींसाठी शाळेची दारे उघडली.
 
दगडफेक, अपमान आणि अढळ निष्ठा
सावित्रीबाईंना पुण्यातील रस्त्यांवरून चालताना शेण आणि दगडांचा मारा सोसावा लागला. रोझ यांच्या वाट्यालाही असेच दुःख आले. “स्त्रीने शिकणे म्हणजे धर्माचा अपमान आहे,” असे म्हणणाऱ्या सनातनी समाजाने रोझ यांनाही मानसिक आणि सामाजिक छळाला सामोरे जायला लावले. लोक त्यांना वेडी ठरवू पाहत होते, पण रोझ यांच्या डोळ्यात भविष्यातील साक्षर स्त्रीचे स्वप्न होते. रोझ म्हणायच्या, “मुलींना केवळ साक्षर करणे पुरेसे नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवणे हे माझे ध्येय आहे.” या विचाराने त्यांनी इटलीतील हजारो स्त्रियांचे भविष्य बदलले.
 
राजकीय आणि धार्मिक सत्तेची मान्यता.
१७१६ मध्ये जेव्हा प्रत्यक्ष पोपनी त्यांच्या कार्याची दखल घेतली, तेव्हा त्यांच्या कार्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. बिशप आणि चर्चच्या नेत्यांनी रोझला इतर शहरांमध्ये शाळा स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. तिची शैक्षणिक मोहीम संपूर्ण इटलीभर पसरली. सावित्रीमाई व जोतीराव फुले यांच्या स्त्री शिक्षणाची दखल घेऊन १८५२ साली जाहीर सभेत शिक्षणाधिकारी मेजर कॅन्डी यांनी सत्कार केला. हंटर कमिशन समोर भारतीय शिक्षणासंदर्भात महात्मा फुलेंची साक्ष नोंदवली जाणे ही त्यांच्या कार्याची मोठी दखल होती. महात्मा फुले यांच्या निवेदनाने सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल होऊन त्यांनी ‘झिरपता सिद्धांत’ (म्हणजे वरच्या वर्गाला शिकवले की ते खालच्या लोकांपर्यंत झिरपत जाते) हा सोडून देऊन तळागाळातील लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. ही फार मोठी राष्ट्रव्यापी ऐतिहासिक शैक्षणिक क्रांती होती.
 
शिक्षिकांची फळी: एक नवी चळवळ
रोझ यांनी मुलींना स्वतः शिक्षण दिले, तसेच सावित्रीबाईंप्रमाणे त्यांनी शिक्षक तयार करण्याच्या प्रशिक्षण केंद्रावर भर दिला. त्यासाठी त्यांनी व्हेनेरिनी सिस्टर्स नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था आजही जगभरातील ४० हून अधिक शाळा आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून तिचे ध्येय पुढे चालवत आहे. 
 
दोन क्रांतीकारिकांचे समान ध्येय
सावित्रीबाई फुले आणि रोझ व्हेनेरिनी या दोन वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या देशांत जन्मलेल्या स्त्रिया होत्या. पण त्यांच्या हृदयाचे स्पंदन एकच होते. आज इटलीतील मुली ज्या आत्मविश्वासाने वावरतात, त्याच्या मुळाशी रोझ यांची तपस्या आहे, जशी भारतातील स्त्री-शक्तीच्या मागे सावित्रीबाईंची पुण्याई आहे.
 
तथापि, लक्षात घ्यायच्या काही बाबी
सेंट रोझ व्हेनेरिनी आणि सावित्रीबाई फुले यांची तुलना करताना काही महत्त्वाचे पैलू समजून घेणे गरजेचे आहे. रोझ व्हेनेरिनी (१६५६-१७२८) यांचे कार्य सावित्रीबाईंच्या (१८३१-१८९७) दीडशे वर्षे आधीचे आहे. युरोपीय आणि भारतीय समाजाची समाज सुधारणेची एकंदरीत तफावत याप्रकरणी जमेस धरावी लागते.
 
रोझ व्हेनेरिनी यांनी ख्रिस्ती धर्मशास्त्राच्या आधारे स्त्री-शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तर, सावित्रीबाईंचे कार्य हे समाजसुधारणा आणि सत्यशोधक चळवळीचा भाग होते, ज्यात जात आणि वर्णव्यवस्थेविरुद्धचा मोठा लढा अंतर्भूत होता. सावित्रीबाईंचे कार्य भारतीय समाजव्यवस्थेतील जातिभेद आणि अज्ञानाविरुद्ध होते, तर रोझ यांचे कार्य युरोपातील स्त्रियांच्या बौद्धिक कोंडीविरुद्ध होते. रोझ यांनी शिक्षणासोबतच स्त्रियांना धार्मिक आणि नैतिक वळण लावण्यावर भर दिला, तर सावित्रीबाईंनी शिक्षणाला शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीचे अस्त्र मानले.
आज जगभरातील स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात अशा क्रांतिकारी नावांचे स्थान अढळ आहे. 
 
धनंजय आदित्य
0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *