- 15
- 1 minute read
फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 25
देवाभाऊ फडणवीस व शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र.....!
प्रिय लाडक्या बहिणीनो,
आपण सर्वजणी सुखी असालच या विश्वासाने पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे. स्रीविरोधी सरकार राज्यात असल्यावर आपण सुखी कसे असणार ? म्हणूनच आपण सुखी असाल हे म्हणण्याचे धाडस करावे लागते. पण लाडक्या बहीण योजनेंतर्गत मिळणारे १५०० शे रुपये मिळणे बंद झाल्याने तुम्ही काही मरणार नाही. हे मला माहित आहे. ४०० रुपयांचा गॅस हजार रुपये झाल्यानंतर, डाळी, पीठ, तेल, भाज्यांचे भाव वाढल्यानंतर ही आपल्या किचनमधून धूर निघत आहे. चुली पेटत आहेत. महागाईमुळे चहामधील दुधाची मात्रा कमी झाली आहे, अथवा दूध गायबच झाले आहे. ताटातील चमचमीत पदार्थ आणि कधीकाळी सणवाराला पडणारी तुपाची धार ही आता गायब झाली असेल यात शंका नाही. मात्र तुम्ही साऱ्या जणी जीवित आहात. सरकारकडून मिळणाऱ्या १५०० शे रुपयांच्या मदतीवर तुम्ही कधीच जगत नव्हता, तर कष्टाच्या भरवशावर जगत होता. पण सत्तेवर येऊन महाराष्ट्राला लुटण्यासाठी राज्यातील देवाभाऊ फडणवीस, शिंदेनी तुमच्याशी गद्दारी केली. लाडकी बहीण योजना आणून तुमच्या खात्यात १५०० रुपये टाकले. तुम्ही भुललात आणि लाख मोलाची मतं दिली. मतांचा सौदा केला. ते सत्तेवर आले आणि तुमच्याशी गद्दारी केली. आता या योजनेला घरघर लागली आहे.
लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर बाजारात आल्याने ती केवळ तुमची मतं मिळविण्यासाठी होती. हे तुम्हाला समजायला पाहिजे होते. पण तुम्ही भुललात. एकनाथ शिंदेनी ही योजना मध्य प्रदेशातून आणली. त्यांच्या डोक्यातील उपज नाही. शिंदे ठाण्यात रिक्षा चालवायचे. शिवसेनेत आले. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मोठे झाले. उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार, मंत्री केले. म्हणजे शिवसेनेने मोठा केले, उद्धवने मंत्री केले. अन् त्यांनी गद्दारी करून शिवसेना तोडली, ठाकरे सरकार पाडले. बाळासाहेबांशी गद्दारी केली. तेच शिंदे आपल्याशी ही गद्दारी करेल, असे तुम्हाला मतं देताना वाटायला हवे होते. पण ५०० रुपयांच्या तीन नोटा तुम्हाला दिसत होत्या. त्यामुळे तुम्हाला भुरळ पडली व फडणवीस, शिंदे यांना मतं देऊन तुम्ही ही महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली. अपराध केलात तुम्ही या मातीशी आणि स्वतःशी, आपल्या भविष्याशी ही.
२०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फुले, शाहू,आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील जनता आपल्याला मतं देणार नाही, याची कल्पना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना होती. त्यामुळेच महिला मतांना भ्रमित करण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. सुरुवातीला तुम्हा १ कोटी ७७ लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यामुळे तुम्ही महिलांनी या गद्दारांना भरभरून मतं दिली. अन् गद्दार पुन्हा सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले व त्यांनी तुमच्या या योजनेला कात्री लावायला सुरुवात केली. आज ८० लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्या आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत ३३ लाख २३ हजार ७२४ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र हा निधी महाराष्ट्राच्या अन्य विकासाच्या योजनांना कात्री लावून करण्यात आला आहे. विशेष करून मागासवर्गीय व आदिवासी योजनांना कात्री लावून या योजनांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला गेला आहे.
लाडक्या बहिणीला १५०० शे रुपये देताना ही ते तुमच्याच खिश्यातून विविध मार्गाने काढून घेतले आहेत . हे तुम्हाला समजत नाही. विविध प्रकारचे टॅक्स लागू करून त्या माध्यमातून ते रिटर्न घेतले आहेत. ४०० रुपयांचा गॅस सिलेंडर हजार रुपयांना मिळत आहेत. सहाशे रुपये तुमच्याच खिश्यातून दर महिन्याला काढून घेतला जात आहे. डाळी, तेल, कडधान्य महाग करून तुमचीच राजसोषपणे लूट सुरू आहे. कफनवर ही टॅक्स लावला गेला आहे. काही खरेदी करा, टॅक्स द्यावा लागतो. तुमचाच पैसा तुम्हाला रिटर्न दिला जात आहे.
या महाराष्ट्राला जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि माता रमाईचा वारसा आहे. तो जपण्याचे काम तुम्ही करायला हवे. महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचा आणि महापुरुषांचा अवमान व अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही आणि महाराष्ट्राच्या गद्दारांना तुम्ही साथ दिलीत. आपले स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे भविष्य केवळ १५०० रुपये प्रतिमाह हा सौदा तुम्ही केलात. आता त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली आहे. ते पेपर लीक करून तुमच्या मुलांच्या, भावांच्या भविष्याशी खेळत आहेत. त्यांचे रोजगार ते अन्य राज्याकडे पाठवीत आहेत. बिहारमध्ये ही असेच केले. निवडणुकीच्या तोंडावर उद्योग करायला व लाडक्या बहिणींना उद्योगपती बनवायला दहा हजार रुपये दिले. त्यावर मतं मिळविली. सत्तेवर आले. अन् वसुली सुरू केली. ज्यांना तुम्ही निवडूण दिलेत, ते तुमचे प्रतिनिधी नाहीत. तुम्हाला जो मुख्यमंत्री दिसतोय, जो उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदार दिसतोय तो तुमचा नाही. अदाणीचा आहे. विविध करांच्या माध्यमातून तुमची लूट करून ते अदाणी, अंबानींची भरती करीत आहे.
बस…. इतकेच… पत्र आटोपते घेतो. तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र…! जय भीम….!!
तुमचा एक हितचिंतक भाऊ
राहुल गायकवाड,
प्रदेश महासचिव
समाजवादी पार्टी
प्रदेश महासचिव
समाजवादी पार्टी
0Shares