• 589
  • 1 minute read

ममता का बोझ उठाया नही जाएगा’…

ममता का बोझ उठाया नही जाएगा’…

भारतीय परंपंरेत आदीशक्ती म्हणून नेहमीच स्त्री शक्तीचा गौरव केला जातो. असे म्हटले जाते की शेतीचा शोध स्त्रीने लावला. एका जननक्षम स्त्रीने धरतीच्या पोटातून धान्य कसे उगवायचे हे सांगितले. गमंत म्हणजे आज सात बाराच्या उताऱ्यावर तिला आपल्या नावाची मोहर सहजासहजी उमटवता येत नाही. तिचा सातबारा कोराच राहतो. पौराणिक ग्रंथात असो की आधुनिक संविधानात…तिला स्थान तर दिले आहे पण वास्तवात तिचे शरीर हीच तिची ओळख कायम राहिल याची अलिखित तरतूदही केली आहे. तिच्या शरीराच्या आत तिचे स्वत्त्व असते तिकडे मात्र कानाडोळा करण्याचे पुरूषी कसब आपल्या संस्कृती नावाच्या व्यवस्थेने केले आहे.

तिच्या विचारांवर अदृष्य लगामही लावण्यात पुरूषी सत्तेला यश आले आहे. सौंदर्यवान स्त्रीयानां विषकन्या बनविण्याच्या प्रयोगशाळेचे सूत्रधार पुरूषच….तिच्या देहाचा असा वापर करतानां प्रतिष्ठेचा मुखवटा फाटू नये म्हणून स्वत:ला जपणारा धुरंदर देखिल पुरूषच………… गुलामीतही स्वातंत्र्य कसे जपता येते हे हिकमतीने सांगणारा धूर्त ही पुरूषच…….कधी कधी स्त्री मर्दानी असते असं सांगून फसव्या जाळ्यात ओढणारा पुरूषच…… निसर्गत:च स्त्री दुबळी आहे सांगत स्वत:चं षंढपण जपणारा कावेबाज देखिल पुरूषच….!!!! स्त्रीयांची कितीतरी विविध रूपं आहेत असं मिश्कीलपणे सांगत वरील स्वत:ची सर्व रूप दडवून ठेवण्याची किमया पुरूष सहजपणे करू शकतो…

खरे तर मानवी डोळे समोरच्या दर्शनी भागावर असतात. तो थोडा फार डावीउजवीकडे कटाक्ष टाकू शकतो. मात्र डोळ्या बाबत स्त्रीकडे एक नैसर्गिक शक्ती प्राप्त आहे.. ती जरी पाठमोरी चालत असली तरी पाठीवरच्या कामूक नजरा ती तिच्या अदृष्य शक्तीने ओळखू शकते…..तिच्याकडे उपजतच एक नैसर्गिक रिसीव्हिंग पॉवर आहे हे रहस्य पार पूर्वी पासून लबाड पुरूषाला समजले होते. म्हणून ही पॉवर आपल्या मुठीत जेरबंद करण्यासाठी एक छानसा चक्रव्यूह निर्माण करण्यात आला….या चक्रव्यूहाच्या झरोक्यातून ती आजही आपल्या अस्तित्वाचा शोध घेतेय…….

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात एक प्रसंग आहे तो असा- चित्रपटाची नायिका राधाचा पती तीन चिल्लीपिल्ली पदरात टाकून परागंदा होतो. सासू मरते. राधा एकटी पडते. स्त्री लंपट सावकार सतत तिच्या मागावर असतो. एकदा अतिवृष्टीने गावात पूर येतो अन् राधाचे सर्व काही वाहून जाते. घरादारात व मनात चिखलच चिखल साचतो. पोरांचा जीव भूकेने कासाविस होतो. प्रत्येक स्त्रीमधील आई विलक्षण असते. मग ती ती तरूण असो की म्हातारी. मुलांचे भूकेने विव्हळणे राधाला सावकाराच्या वाड्याकडे पोहचवते. चिखलाने बरबटलेल्या आईत सावकाराला मात्र एक मादी दिसते.भितींवर देव्हाऱ्यात देवीची मूर्ती असते. मूर्तीकडे अत्यंत त्वेषाने बघत राधा हातातले काळे दोरे व गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडते व फेकून देते जे नेमके देव्हाऱ्यावर पडते. कपाळावरचे कूंकू पुसत राधा म्हणते-“मुझे खाना दे लाला….मेरे बच्चो भूखे है….’ त्यावर लोचटपणे तिच्याकडे बघत सावकार तिच्या गळ्यात सोन्याची चेन घालत म्हणतो- ‘सुखीलाला अगर कुत्ता भी पालेंगे तो उसके गलेमे भी सोनेकी जंजीर डालेंगे…..राम कसम लक्ष्मी लगती हो लक्ष्मी….’ राधाची नजर देव्हारातल्या लक्ष्मीच्या मूर्तीकडे जाते. तिच्याकडे आर्ततेने बघत राधा म्हणते- ‘लक्ष्मी लगती हूं….देवी…राधाके रूप मे आते हूए लाज ना आयी. मेरे रूपमे आयी हो तो अपनी लाज लुटती हुई भी देख लो…’ राधाचा चेहरा त्वेष, आगतिकता, असाहयता, व्याकूळतने पेटतो. जळजळीत नजरेने देवीकडे बघत तिच्यातील आई म्हणते- हँसो नही… हँसो नही… संसारका भार उठा लोगी देवी…ममता का बोझ उठाया नही जाएगा’…………………… आईची ममता जागोजागी अशी पणाला लागते मा़त्र पुरूषातला बाप काही केल्या झोपेतून उठत नाही.

उत्तर प्रदेशातील लखनौ पासून ७० कि.मी.वर हरदोही रस्त्यावर नटपूरवा नावाचे गाव आहे. येथील मुलानां आपला बाप कोण आहे हे माहितच नाही. त्यानां आडनावे नसतात. ४०० वर्षा पासूनचा हा इतिहास आहे. ५ हजार वस्ती असणाऱ्या या गावातील ७० टक्के महिलानां देहविक्री हाच व्यवसाय करावा लागतो. येथील सर्व आर्थिक व्यवहाराचा मूख्य स्त्रोत हाच आहे. तर मध्य प्रदेशातील बचारा आदीवासी जातीचा समूह पिढ्यानपिढ्या परंपंरा म्हणून हाच व्यवसाय करत आहे. या आदीवासी जमातीतील मुलीनां त्यांचेच पिता आणि भाऊ बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलतात. प्रत्श्क घरात एक स्वतंत्र रूम यासाठी राखीव असते. मंदसौर ते निमच या प्रवासा दरम्यान रस्तावर तुम्हाला अनेक स्त्रीया व मुलींचा झूंड पुरूषानां आकषिर्त करण्यासाठी दिसून येईल. विशेष् म्हणजे यातील अधिकांश मुली या अल्पवयीन असतात. विशेष म्हणजे येथील स्त्रीया फार पुरातन काळा पासून तेथील राजे महाराजे यांचे वशंज असल्याचे सांगतात. अशीच कथा उत्तर गुजरात मधील वाडिया गावची आहे. अहमदाबाद पासून २५० कि.मी. अतंरावरील हे गाव सेक्स वर्कर व्हिलेज म्हणून ओळखले जाते. गेली ८० वर्षांची ही परंपंरा आहे. येथील पुरूष आपल्याच घरातील स्त्रीयासाठी गिऱ्हाईकं शोधत असतात. सरणिया नावाचे आदीवासी या गावात आहेत. कर्नाटकातील बेल्लारी आणि कोप्पल जिल्ह्यात देवदासी मुलींच्या व्हर्जिनीटीचा लिलाव उच्च वर्णीय लोकां कडून केला जातो… या देवदासी कोणत्या वर्गातील असतात हे सांगायला नको.

स्त्रीयांचा खतना ही एक अत्यंत जीवघेणी परंपंरा. आजही जगातील जवळपास ३० देशातून मुलींचा खतना करण्याची कूप्रथा सुरूच आहे. मुलींना लग्नासाठी तयार करण्यासाठी क्लिटोरिस कापणे गरजेचे असते. त्यानंतर महिलांमध्ये जेनेटाइल मालफॉर्मेशनसह आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टींचा त्रास दूर होतो, असे समजले जाते. इजिप्तमध्ये या प्रक्रियेतून जाणा-या मुली आणि महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. वयाच्या ९ ते १२ व्या वर्षीच मुलींचा खतना केला जातो. इजिप्तने सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार येथे ९२ टक्के विवाहित महिला खतनाच्या प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. अनेक देशातून होणारा खतना हा धर्माशी नाही तर परंपंरेशी निगडीत आहे. अनेकदा विविध गोंडस नावाखाली या प्रथेचे उदात्तीकरण केले जातेय. आपला देशही याला अपवाद नाहीय.
सुप्रसिद्ध पाकिस्तानी कवयित्री सारा शगुफ्ता एके ठिकाणी म्हणते-

इज़्ज़त की बहुत-सी क़िस्में हैं
घूंघट, थप्पड़, गंदुम
इज़्ज़त के ताबूत में क़ैद की मैंखें ठोंकी गई हैं
घर से लेकर फुटपाथ तक हमारा नहीं
इज़्ज़त हमारे गुज़ारे की बात है
इज़्ज़त के नेज़े से हमें दागा जाता है
इज़्ज़त की कनी हमारी ज़बान से शुरू होती है
कोई रात हमारा नमक चख ले
तो एक जिंदगी हमें बे जायका रोटी कहा जाता है
ये कैसा बाजार है…………………

स्त्रीला कधी थेट देव्हाऱ्यात तर कधी देहासाठी व्यापारात नेऊन ठेवण्याचे षड्यंत्र किती काळ चालत राहणार? माहित नाही.……

आजचा एक दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो..हाही भपंकपणाच वाटतो अनेकदा..असो…महिला दिना निमित्त् सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा…

-दासू भगत

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *