- 8
- 1 minute read
असंतोषी कॉम्रेड..!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 16
दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते. कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुर्बोध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते.” – कॉ. शरद पाटील
आज प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद तानाजी पाटील यांची जयंती.
१७ सप्टेंबर १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात सत्यशोधक कुटुंबात जन्मलेले कॉ. शरद पाटील हे प्रख्यात विचारवंत, इतिहासकार, सौंदर्यशास्त्रकार आणि क्रांतिकारक म्हणून सबंध देशाला परिचित आहेत. त्यांचा विचार व कार्याचा वारसा आजही जाती-वर्ग-स्त्रीदास्याच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येका कार्यकर्त्याला प्रेरणा देतो. त्यांचे औपचारिक शिक्षण फक्त मॅट्रिकपर्यंतचे (१०वी) असले तरीही संस्कृत, पाली, प्राच्यविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, मार्क्सवाद आणि अब्राह्मणी परंपरेचा त्यांचा गाढा अभ्यास आज हजारो विद्यार्थ्यांच्या PHD चा विषय आहे. त्यांच्या या उत्तुंग उंचीमुळेच सबंध महाराष्ट्र त्यांना प्राच्यविद्यापंडित या उपाधीने ओळखतो. त्यांनी मार्क्सवादाला फुले-आंबेडकर विचारांची जोड देऊन ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद’ (माफुआ) ही नवीन विचारसरणी निर्माण केली आणि बहुप्रवाही, विधायक, अब्राह्मणी ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती विकसित केली. अशाप्रकारे त्यांनी भारतीय इतिहासाला ब्राह्मणी एकप्रवाहातून बाहेर काढून वर्ण – जात – वर्ग – स्त्रीदास्य यांच्या संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा मार्ग खुला केला.
कॉ. शरद पाटील यांचे विचार आणि कार्य यांचा आढावा घेतांना त्यांचे साहित्य, जनहितासाठी केलेले लढे आणि आजच्या सामाजिक – राजकीय परिस्थितीत त्यांची प्रासंगिकता यांचा सर्वांगीण परिचय घेणे आवश्यक आहे. त्यांचा जन्म सत्यशोधक विचारांच्या प्रभावाखाली झाला. ब्राह्मणेतर चळवळीच्या मर्यादा लक्षात घेऊन ते कम्युनिस्ट पक्षात (CPI) सामील झाले. धुळे येथे गिरणी कामगार, शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे काम केले. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. मात्र कम्युनिस्ट पक्षात वर्गलढ्यावर जास्त भर आणि जाती – लिंगविषमतेची उपेक्षा दिसल्याने सन १९७८ मध्ये त्यांनी ’सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’ची स्थापना केली. हा पक्ष मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित होता. त्यांनी जातीव्यवस्थेला ‘विषम उत्पादन संस्था’ मानले आणि वर्ग, जाति व स्त्रीदास्य यांचा एकत्रित अंत हा क्रांतीचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादित केले.
कॉ. शरद पाटील यांचे साहित्य केवळ इतिहास – संशोधन नव्हे, तर क्रांतिकारी वैचारिक हत्यार आहे. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये दास-शूद्रांची गुलामगिरी, रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष, जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद – फुले – आंबेडकरवाद, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण? आणि जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती इ. क्रांतिकारी साहित्याचा समावेश आहे.
’दास – शूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात त्यांनी इतिहासपूर्व काळातील दास-शूद्र गुलामगिरीचा प्रश्न प्रथमच मूलभूतपणे मांडला. सिंधू संस्कृतीपासून बौद्ध काळापर्यंतच्या स्त्रीसत्ताक आणि अब्राह्मणी परंपरेचा शोध घेतला. निऋती, अंबपाली, शूर्पणखा यांसारख्या ऐतिहासिक स्त्री व्यक्तिरेखांना नवीन अर्थ दिला. ’अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथात त्यांनी कालिदासाच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राच्या विरुद्ध दिग्नाग-धर्मकीर्तीच्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी केली. ज्याला त्यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र संबोधले. या माध्यमातून भारतीय सौंदर्यशास्त्राचा उगम स्त्रीराज्यात असल्याचे त्यांनी प्रथमच सिद्ध केले. दलित, आदिवासी आणि शेतकरी साहित्याला प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडले. त्यांनी साहित्याला ‘भारतीय दु:खाची आंशिक दर्शने’ न मानता समग्र जातीय आणि वर्गीय दु:ख म्हणून पाहिले.
त्यांचे लेखन काही जणांना दुर्बोध वाटते. यासंदर्भात कॉ. शरद पाटील यांना विचारले असता ते म्हणत, ”माझी वैचारिक पातळी वरची आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी ती समजून घेण्यासाठी स्वतःची पातळी उंचावली पाहिजे.” त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास हे लक्षात येत, की त्यातून संस्कृत, पाली, प्राच्यविद्या, मार्क्सवादी तत्त्वज्ञान आणि लोकअनुभव यांचा अद्वितीय मिलाफ साधल्या गेला आहे. त्यांनी ‘एकप्रवाही मार्क्सवाद’ला ‘बहुप्रवाही अब्राह्मणी विधायक ऐतिहासिक भौतिकवाद’ असे विस्तारित रूप दिले. भारतीय इतिहास हा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांतील सततचा संघर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉ. शरद पाटील केवळ विचारवंत नव्हते, तर कृतीशील कार्यकर्ते होते. धुळे येथे गिरणी कामगार संघटना, शेतकरी आघाडी आणि आदिवासी चळवळीचे नेतृत्व केले. आदिवासी भूमिहीनांसाठी वनकायद्याची भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात लढवली. पश्चिम भारतातील स्वायत्त आदिवासी राज्याची मागणी केली, ज्यात महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातील आदिवासीबहुल भागाचा समावेश आहे. नामांतर आंदोलन, शिवसन्मान मोर्चा यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याची संकल्पना मांडताना त्यांनी शाक्त तंत्राकडे अब्राह्मणी मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिले. त्यासंदर्भात त्यांनी लिहिलेल्या ’शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण?’ या ग्रंथातून शिवरायांचा ब्राम्हण मंत्री आणि सामंती मराठा सरदार यांनी केलेल्या शिवरायांच्या हत्येचे गूढ उलगडले. त्यांच्या पक्षाने जाति – वर्ग – स्त्रीदास्यांतक क्रांतीचा कार्यक्रम राबवला. अब्राह्मणी साहित्य व कला महासभा, कॉम्रेड शरद पाटील इतिहास परिषद, नैर्ऋत्य समाजविज्ञान अकादमी यांसारख्या संस्थांमधून वैचारिक आणि सांस्कृतिक लढे उभारले.
आज जातीय राजकारण, हिंदुत्ववादी ध्रुवीकरण, भांडवलशाहीची नवीन रूपे, स्त्री – दलित – आदिवासी शोषण आणि सांस्कृतिक ब्राह्मणीकरण यांचा काळ आहे. ब्राह्मणवादाने अत्यंत क्रूर स्वरूप धारण केले आहे. अशा काळात कॉ. शरद पाटील यांचे साहित्य अत्यंत मार्गदर्शक ठरते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, केवळ वर्गलढा किंवा केवळ जातिलढा पुरेसा नाही; एकात्मिक जात – वर्ग – स्त्रीदास्य अंत हाच खरा मार्ग आहे. त्यांची बहुप्रवाही अन्वेषण पद्धती आजच्या ‘एकप्रवाही’ इतिहासलेखनाला आव्हान देते. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र दलित – बहुजन साहित्याला वैचारिक आधार देते. मा – फु – आ विचारसरणी आजच्या डाव्या आणि आंबेडकरवादी चळवळींना एकत्र आणण्याचे सूत्र देते. त्यांच्या ग्रंथातून मिळणारा ‘विधायक नकार’ आजच्या कालबाह्य ब्राह्मणी संकल्पनांना नाकारण्यासाठी आणि नवसमाजनिर्मितीसाठी आवश्यक आहे.
आपल्या साहित्याविषयी अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र या क्रांतिग्रंथात ते लिहितात,
’भारतीय दु:खाची ही आंशिक दर्शने आहेत. भारताचे समग्र दु:ख जात – वर्गीय आहे.’
कॉम्रेडांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांच्या बहुप्रवाही अब्राह्मणी क्रांतीच्या मार्गावर चालणे हेच त्यांना जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल.
बाळासाहेब गरुड (BG)
0Shares