- 6
- 1 minute read
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 28
देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला.....!
ताशी 250 ते 260 वेगाने वाहणाऱ्या वाऱ्या, वादळाचा मुकाबला करण्याची क्षमता मुंबई – पुणे मिसिंग लिंक महामार्गात असल्याचे प्रवचन देताना कथावाचक देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पावसात या मार्गावर दरड कोसळून, खड्डे पडून मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर सांगितले. अतिशय मवाळ व गोड भाषेत प्रवचन देताना त्यांनी मोदींच्या अति महत्त्वकांक्षी ” मेक इन इंडिया ” आणि ” स्टार्ट ऑफ इंडियाची” या धोरणाची ही पोलखोल केली. देशात मेक इन इंडियाचा कोटी रुपये खर्च करून गाजावाजा होत असताना महामार्गाच्या लगतचे कठडे बांधण्याची क्षमता ही आपल्याकडे नाही. त्यासाठी ही विदेशी टेक्नॉलॉजीची मदत घ्यावी लागते, हे त्यांनी आवर्जून सांगितले. हा मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे निसर्गाच्या कोपानंतरच कळते. त्यासाठी अशा कोपाची वाट ही पाहणे आवश्यक असते, अशी मंत्रमुग्ध करणारी वाक्य ही त्यांच्या वाणीतून बाहेर पडताना उभ्या महाराष्ट्रातील जनतेने ऐकली आणि पाहिली. हे ऐकल्यावर व पाहिल्यावर असे वाटत आहे की, फडणवीस राजकारणात गेल्याने आखा महाराष्ट्र एका अत्यंत प्रभावशाली कथा वाचकाला मुकला आहे. त्यांनी राजकारणी नव्हेतर कथा वाचकच व्हायला हवे होते.

देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले, त्या अगोदर मुंबई पुणे मिसिंग लिंक महामार्गाचा प्रस्ताव २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आला होता. मात्र बोगद्याचा मार्ग लोणावळा धरणाच्या सुमारे २०० मीटर खाली जात असल्याने धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच अतिवृष्टी आणि भूस्खलनाचा धोका असल्याने हा प्रकल्प त्यांनी नाकारला. बोगद्याच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती ही या मार्गासाठी अनुकूल नाही, हे ही त्याच वेळी निदर्शनास आले होते. तरी ही विकास कामांनी पछाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच हा प्रस्ताव पुन्हा मागवून घेतला व मंजूर ही करून टाकला. हा प्रस्ताव मंजूर करीत असतानाच्या काळातच नवयुग इंजिनिअररिंग कंपनीने भाजपला ५५ कोटी रुपयांचा निधी पार्टी फंड म्हणून दिला व त्यानंतर याच कंपनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मिसिंग लिंक रोडचे काम ही दिले. आपल्या मवाळ आणि बालिश वाणीतून त्यांनी हे ही सांगितले असते, तर कथा ऐकताना अधिकची मजा आली असती.
काँग्रेस सरकारच्या काळात नाकारलेला प्रस्ताव भाजपची सत्ता आल्यानंतर पुन्हा येत असेल तर हा प्रस्ताव आणून ७०००० कोटींचा हा मिसिंग महामार्ग बांधणे ही राज्यातील जनतेची गरज होती की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील बड्या अधिकाऱ्यांची गरज होती, हे तरी तपासण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची होती. पण विकासाने पछाडलेल्या फडणवीसांना त्याची गरज वाटली नाही. आला प्रस्ताव आणि पक्ष फंड की लगेच प्रस्ताव मंजूर करून नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ही टाकले. याच वर्षी १ मे रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पावसात या मार्गाची पुरती वाट लागली आहे. ७० हजार करोड रुपये अतिवृष्टीत वाहून गेल्याचे चित्र महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे. तर कथा वाचक फडणवीस या मार्गाच्या बांधणीची कथा सांगून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहेत.
राज्यात झालेल्या पहिल्याच अतिवृष्टीत भाजप व मित्र पक्षांच्या सरकारने केलेला विकास सर्वत्र वाहून गेलेला आहे. पण कथावाचक ते मानायला तयार नाहीत. यासंदर्भात बोलणे, टीका करणे हा विरोधी पक्षांचा संवैधानिक अधिकार आहे. पण विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा शहाणपणा कथा वाचकात नाही. विकासाचे प्रयोग करताना असे अनेक 70 हजार कोटी रुपये पाण्यात वाहून जातात. अशा पद्धतीने ते विरोधकांच्या विरोधाची खिल्ली उडविताना म्हणतात. स्वतःला इन्फ्राँमॅन म्हणून प्रोजेकट करण्यासाठी या 70 हजार कोटींची त्यांना पर्वा नाही. हे त्यांनी या संदर्भात दिलेल्या प्रवचनामुळे स्पष्ट होत आहे.
कथा वाचक अथवा प्रवचनकार बेधुंद होऊन, तलीन होऊन कथा सांगतात. यावेळी त्यांचे भान हारपलेले असते. तसेच काही फडणवीस यांचे 70 हजार कोटी अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेल्याची कथा सांगताना झाले. मेक इन इंडिया व स्टार्ट ऑफ इंडिया या मोदी सरकारच्या अति महत्त्वकांक्षी धोरणानंतर देश स्वावलंबी झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी होणाऱ्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च ही झाले आहेत व होत आहेत. पण याचे भान फडणवीसांना राहिले नाही. हा महामार्ग संपूर्णपणे विदेशी अभियांत्रिकी टेक्नॉलॉजी व सल्ल्याने निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते जी काही माहिती देत होते, ते मोदींच्या धोरणांची पोलखोल करणारे असले तरी त्याची सुरस कथा फडणवीसांच्या वाणीतून ऐकताना मजा येत होती. ते सांगत होते…. जगातील सात देशांच्या मदतीने हा मार्ग बांधण्याचे कार्य विकासाचा ध्यास असल्याने माझ्या हातून पार पडलेले आहे. याचे डिझाईन कॅनडामध्ये तयार करण्यात आले आहे. पोस्ट टेक्नॉलॉजी डेन्मार्क देशातून उचलली आहे. तर यासाठी वापरलेली केबल स्टेट ऑस्ट्रेलियाने केलेली आहे.
७० हजार कोटीचा विकास वाहून गेला हे महत्त्वाचे नसून विकासाची जिद्द भाजपसाठी महत्त्वाची…. फडणवीस ?
इतकेच सांगून ते थांबले नाहीत. अतिशय अभिमान आणि गर्वाने ते आपल्या कथा वाचनात पुढे म्हणतात…. वापरण्यात आलेल्या केबलचे उत्पादन ही आपल्या देशात झालेले नाही, तर ते मलेशियामध्ये झालेले आहे. रस्त्या लगतचे कठडे बांधण्यासाठी ही आम्ही भारतीय भारतीय अभियांत्रिकी तंत्र वापरलेले नाही. ते ही ऑस्ट्रेलिया या देशातून घेतले आहे. अग्निशामक चाचणी स्पेनने केलेली आहे, तर बऱ्याच आवश्यक गोष्टी आम्ही सिंगापूर, तैवान यांच्याकडून घेतलेल्या आहेत. इतके सगळे केल्यानंतर हा महामार्ग तयार झाला आहे. यासंदर्भातील सर्व कथा फडणवीसांच्या वाणीतून बाहेर पडत असताना देहभान विसरत होते. इतके अपार कष्ट करून त्यांनी हा मिसिंग लिंक महामार्ग उभा केला आहे. राज्याच्या विकास करताना इतके कष्ट घेतल्यानंतर ७० हजार कोटी अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून जात असतील, ते महत्त्वाचे नाही. तर त्या मागचे कष्ट आणि विकास करण्याची जिद्द महत्त्वाची आहे. पण विरोधक केवळ घरात बसून आरडाओरडा करीत आहेत. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. किती ही करोड पाण्यात आणि अन्य कशात बर्बाद झाले तरी चालतील, पण विकासाच्या मार्गांवरून आम्ही मागे हटणार नाही. हा त्यांचा आत्मविश्वास नक्कीच राज्याला पूर्ण बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही.
अतिवृष्टीनंतर केवळ हा मार्गच कोसळला आहे असे नव्हे. राज्यात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले अनेक मार्ग, महामार्ग वाहूतकीसाठी योग्य राहिलेले नाहीत. मुंबईत तुंबणाऱ्या पावसाने व रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहतूक व्यवस्थेची व मुंबईकरांची दैना उडविली आहे. पुण्यात अशीच परिस्थिती आहे. औरगाबाद रस्त्याचे की खड्ड्यांचे शहर आहे, असा संभ्रम जनतेत आहे. सर्वत्र अशीच स्थिती आहे. पण पहिला पाऊस हा निरीक्षणे करण्याचा असतो, असे कथा वाचक फडणवीसांना वाटते. हे ही महत्त्वाचे आहे. त्याच्या ही सुरस कथा फडणवीसांकडे आहेत. दैना उडाली असताना फडणवीस यांची वाणी जी काही करमणूक करीत आहे. त्याची मजा घेण्याची संधी राज्यातील जनतेला मिळाली असून ते ही काही कमी नाही.
मात्र अतिवृष्टी काही यंदाच आलेली नाही. दैना ही काही पहिल्यांदाच उडालेली नाही. पण यावेळची दैना आणि त्यासंदर्भातील सत्ताधारी पक्षाची भूमिका या अगोदर कधी ही राहिलेली नाही. रस्ते आणि महामार्ग काँग्रेस सरकारच्या काळात ही बांधले गेले आहेत. वरळी सी लिंक रोड बांधण्याचे काम आव्हानात्मक होते. पण काँग्रेस सरकारने ते आव्हान पेलल्याची साक्ष हा सी लिंक रोड देत अतिवृष्टी झेलत आहे. हा सी लिंक रोड बांधताना केलेला तांत्रिक अभ्यास, काटेकोर नियोजन, सुरक्षितता आणि नियम व निकषांचे केलेले पालन यामुळे हा सी लिंक रोड अतिवृष्टी झेलत आहे. काँग्रेसच्या राज्यात भ्रष्ट्राचार नव्हता असे धाडशी विधान करणे अवघड आहे. त्यावेळी ही हे रस्ते आणि महामार्ग बांधण्याचे कार्य सरकार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालीच करीत होते. येथे ही भ्रष्ट्राचारी अधिकारी नव्हते, असे ही म्हणता येणार नाही. पण विकास करताना सुरक्षितता, पर्यावरण, अभियांत्रिकी नियम आणि निकष यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यात झालेला विकास राज्यातील जनतेला फायदेशीर ठरत आहे. तो अतिवृष्टीचा आणि निसर्ग कोपाचा सामना करीत आहे. तर भाजपच्या राज्यात पक्ष निधीमध्ये वाहून जाताना दिसत आहे. काँग्रेस व भाजपच्या राज्यात झालेल्या विकासात हा फरक असून तो केवळ महाराष्ट्र नव्हेतर देशभर हा असाच आहे.
अतिवृष्टीच्या काळात फडणवीसांनी ज्या विकासाच्या ज्या कथा वाचल्या, विरोधकांवर ज्या पद्धतीने टीका केली. भ्रष्टाचारी व निष्क्रीय म्हणून हिणवले त्यामुळे राज्यातील जनतेची केवळ करमणूक झालेली आहे. होत आहे. राज्यातील जनतेने काँग्रेसच्या राज्यात झालेला विकास पाहिलेला आहे. तो त्याच्या घररादारात पोहचलेला आहे. राज्याच्या विकासात आणि तिजोरीत ज्यामुळे कोट्यवधी रुपये दर वर्षी जमा होत आहेत, ते काँग्रेसने केलेल्या विकासामुळे होत आहेत. देशातील सर्वात प्रगत व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. ती केवळ काँग्रेसमुळेच आहे. हा विकास काँग्रेसने फडणवीसांना शेंबूड ही काढता येत नव्हता तेव्हापासून केलेला आहे. विकास स्वतःला विकास पुरुष म्हणून घेण्यासाठी करायचा नसतो. तर राज्य व राज्यातील जनतेच्या विकासासाठी करायचा असतो. एवढी अक्कल राज्यकर्त्यांकडे असली पाहिजे. ती नसली की राज्यकर्त्यांचा फडणवीस होतो. जनता हसते.पण त्याचे ही भान त्यांना नाही. हे आत्मकेंद्री असण्याचे लक्षण आहे.
………………………… ………………………… …..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी
मुंबई/महाराष्ट्र प्रदेश
0Shares