• 9
  • 1 minute read

सत्तेममागची सत्ता!

सत्तेममागची सत्ता!

सत्तेममागची सत्ता!

  देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. अर्थात, रात्री उशिरापर्यंत बरेच निकाल अधिकृतरित्या जाहीर होण्याचे बाकी होतं; तरीही पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये जवळपास सरकार बदलले आहे, हे निश्चित झाले. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतः मुसंडी मारलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये काॅंग्रेस आणि त्यानंतर २५ वर्ष डाव्यांची सत्ता राहिली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग १५ वर्ष सत्ता राखली. ममता बॅनर्जी यांच्या मागे शक्ती उभी करण्यात ज्या शक्तींनी सहभाग नोंदवला, त्याच शक्तींनी ममता बॅनर्जींच्या मागची आपली शक्ती काढून, भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. पश्चिम बंगालचे राजकारण हे नेहमीच वरच्या जातींच्या भोवतीच फिरत राहिलेले आहे. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी यांची संख्या प्रचंड प्रमाणात असतानाही या जातींच्या भोवती कधीही पश्चिम बंगालचे राजकीय नेतृत्व राहिले नाही. या जातींचा मतदार म्हणून उपयोग जरी करण्यात आला, तरी त्यांना सत्तेमध्ये वाटा देताना मात्र, सर्वच पक्षांनी हात आखडता घेतला. आता भारतीय जनता पक्षाची ही सत्ता बॅनर्जी-मुखर्जी-अधिकारी या समूहांच्या भोवतीच एकवटेल हे आता जवळपास स्पष्ट झालेले आहे! पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात होत असतो. तो कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली तरी त्याचं सातत्य कायम आहे. त्यामुळे, आता भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये जो विजय मिळवला आहे, त्यातून पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार लुप्त व्हावा, अशी आता सर्वसामान्य भारतीयांची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला तमिळनाडू हे राज्य तीव्र द्रविड अस्मितेवर उभारलेलं आणि या कारणास्तवच गेली सत्तर वर्षे तमिळनाडूतील राजकीय सत्ता ही द्रमुक आणि अण्णाद्रमुक याच राजकीय पक्षांच्या हातात राहिलेली आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूमध्ये जागा मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नांचा भाग तिसरी शक्ती त्या ठिकाणी उदयास आणण्यातून झाला. अभिनेते विजय थलपती यांच्या विजयाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. अभिनेते विजय थालपती यांचा विजय म्हणजे द्रविड संस्कृतीचा संकोच किंवा इथून द्रविड संस्कृतीचा प्रभाव तमिळनाडूतून किमान राजकीय परिघावर तरी आता कमी होताना दिसेल! कारण कोणी कितीही नाकारलं तरी विजय थलपती यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाचा अदृश्य हात आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्याइतपत विजय थलपती यांना पहिल्याच निवडणुकीत मिळालेले यश हे राजकीय सत्ता समीकरणांचं निदर्शक आहे. तमिळनाडू विधानसभा एकूण २३४ जागांची आहे आणि कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचे समर्थन आवश्यक असते. सध्याच्या कलांनुसार विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेपासून थोड्याच जागा दूर आहे. याचा अर्थ बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी काही जागांची गरज आहे. अशा वेळी काँग्रेसला साद घातली आहे. 
आसाममध्ये भारतीय जनता पक्ष यांनी आपल्या हातात पुन्हा एकदा सत्ता मिळवली. केरळमध्ये डाव्यांचा पराभव होऊन काँग्रेस त्या ठिकाणी थेट सत्तेवर आली. या सगळ्या प्रकारांमध्ये आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला थेट व सरळ सत्ता मिळाली; तरी, तामिळनाडूमध्येही ती विजय थलपती यांच्या रूपाने अप्रत्यक्ष सत्ता असल्याचे निदर्शक आहे. काँग्रेसला केरळ हे राज्य मिळाल्यामुळे या एकूणच निवडणुकांच्या विश्लेषणावर जो ईव्हीएमचा पगडा सांगितला जातो; त्याची चर्चा तार्किकदृष्ट्या कमी व्हावी, म्हणून अशा प्रकारचे समीकरण साधलं गेलं आहे का? अशीही चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये होऊ घातलेली आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून जो निकाल समोर आला आहे, त्यातून जे पक्ष सत्ता स्थापन करणार आहेत, त्यांच्या मागे असणारी शक्ती केरळ वगळता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपची आहे.
 
0Shares

Related post

द्वेषपूर्ण राजकारण वाढवण्याचे एक नवीन साधन: ‘पाळीव प्राणी म्हणून डुकरे’

द्वेषपूर्ण राजकारण वाढवण्याचे एक नवीन साधन: ‘पाळीव प्राणी म्हणून डुकरे’ दिल्लीच्या त्रि नगरमध्ये, काही हिंदू कुटुंबांनी…
वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो !

वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो !

वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो ! आजही असे लोक असतील ज्यांना तो काळ आठवत…

हवाना बैठकीत डेटाच्या भांडवलशाही हेराफेरीला पराभूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

हवाना बैठकीत डेटाच्या भांडवलशाही हेराफेरीला पराभूत करण्याचे आवाहन करण्यात आले. १५-१७ ऑक्टोबर, २०२५ रोजी क्युबातील हवाना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *