क्षत्रियांची उत्पत्ती कशी झाली?

क्षत्रियांची उत्पत्ती कशी झाली?

क्षत्रियांची उत्पत्ती कशी झाली?

आपल्या देशात काही जाती स्वतःला क्षत्रिय समजतात. त्यात राजपूत, जाट, ठाकूर, यादव, मराठे (कुणबी), रेड्डी या शेतकरी जातींचा समावेश आहे. आता तर बऱ्याच ओबीसी आणि SC – ST जातीही स्वतःच स्वतःला क्षत्रियत्वाचे सर्टिफिकेट देऊन स्वतःचीच पाठ थोपटतांना दिसत आहेत. ब्राम्हणधर्मानुसार समाजाची ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी चार वर्णांत विभागणी केली आहे. ऋग्वेदापासून, उपनिषदापर्यंत आणि रामायण, महाभारत, भगवदगीतेपासून पुराणांपर्यंत या चार वर्णांचे आणि त्यांच्या कामाचे वर्णन केलेले दिसते.
 
मुळात ज्या जाती स्वतःला क्षत्रिय समजत आहेत, त्यांनी ही बाब घ्यानात घेतली पाहिजे की, ज्याअर्थी तुम्ही स्वतःला क्षत्रिय समजत आहात, त्याअर्थी ब्राम्हण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे तुम्ही मान्य करत आहात. अर्थात या जातींना ब्राम्हण त्यांच्या डोक्यावर उभा आहे याचे काही वाईट वाटत नाही, कारण वैश्य आणि शूद्र जाती त्यांच्या पायदळी आहेत याचा आनंद त्यांना वाटत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ’जातीप्रथेचे विध्वंसन’ या ग्रंथात जातींच्या या मानसिक स्थितीचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. जातीव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने तो ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे. कॉ. शरद पाटलांसारखे विद्वान या ग्रंथाला बाबासाहेबांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ मानतात यातच या ग्रंथाचे महानत्व आपण लक्षात घ्यावे.
 
महाराष्ट्रात मराठा (कुणबी) जात स्वतःला क्षत्रिय समजते, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना The Great Maratha म्हटले जाते, त्यांच्या राज्याभिषेकालाच ब्राम्हणांनी विरोध केला होता..! काय कारण होते याचे..? ब्राम्हणांच्या मतानुसार ’शिवाजी हा शूद्र होता..!’ विचार करा मित्रांनो, हे ब्राम्हण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महामानवाला शूद्र संबोधतात, तिथे इतर मराठ्यांची काय कथा? 
 
ब्राम्हणांच्या मान्यतेनुसार आज ज्या क्षत्रिय जाती अस्तित्वात आहेत, त्यांची उत्पत्ती नेमकी कशी झाली तो वृत्तांत बघितल्यास स्वतःला क्षत्रिय मानणाऱ्या जातींची धुंदी खाडकन् उतरल्याशिवाय राहणार नाही..! यासंदर्भातील कथा ब्राम्हण ज्याला अत्यंत पवित्र ग्रंथ मानतात त्या महाभारतातील आदीपर्वातील अंशवतरणपर्व या उपविभागात आली आहे. सदरील कथा श्लोकरूपाने पुढीलप्रमाणे आहे.
 
त्रिःसप्तकृत्वः पृथिवीं कृत्वा निःक्षत्रियां पुरा । 
जामदग्न्यस्तपस्तेपे महेन्द्रे पर्वतोत्तमे ।। ४ ।। 
तदा निःक्षत्रिये लोके भार्गवेण कृते सति । 
ब्राह्मणान् क्षत्रिया राजन् सुतार्थिन्योऽभिचक्रमुः ।। ५ ।।
(अर्थ : पूर्वकालमें जमदग्निनन्दन परशुरामने इक्कीस बार पृथ्वीको क्षत्रियरहित करके उत्तम पर्वत महेन्द्रपर तपस्या की थी। उस समय जब भृगुनन्दनने इस लोकको क्षत्रियशून्य कर दिया था, क्षत्रिय-नारियोंने पुत्रकी अभिलाषासे ब्राह्मणोंकी शरण ग्रहण की थी।)
 
ताभिः सह समापेतुर्बाह्मणाः संशितव्रताः ।
ऋतावृतौ नरव्याघ्र न कामान्नानृतौ तथा ।। ६ ।।
(अर्थ : वे कठोर व्रतधारी ब्राह्मण केवल ऋतुकालमें ही उनसे संभोग करते थे; न तो कामवश और न बिना ऋतुकालके ही।)
 
तेभ्यश्च लेभिरे गर्भ क्षत्रियास्ताः सहस्रशः । 
ततः सुषुविरे राजन् क्षत्रियान् वीर्यवत्तरान् ।। ७ ।। 
कुमारांश्च कुमारीश्च पुनः क्षत्राभिवृद्धये । 
एवं तद् ब्राह्मणैः क्षत्रं क्षत्रियासु तपस्विभिः ।। ८ ।। 
जातं वृद्धं च धर्मेण सुदीर्घणायुषान्वितम् ।
चत्वारोऽपि ततो वर्णा बभूवुर्ब्रह्मणोत्तराः ।। ९ ।।
(अर्थ : राजन् ! उन सहस्रों क्षत्राणियोंने ब्राह्मणोंसे गर्भ धारण किया और पुनः क्षत्रियकुलकी वृद्धिके लिये अत्यन्त बलशाली क्षत्रियकुमारों तथा कुमारियोंको जन्म दिया। इस प्रकार तपस्वी ब्राह्मणोंद्वारा क्षत्राणियोंके गर्भसे धर्मपूर्वक क्षत्रिय संतानकी उत्पत्ति और वृद्धि हुई। वे सब संतानें दीर्घायु होती थीं। तदनन्तर जगत्‌में पुनः ब्राह्मणप्रधान चारों वर्ण प्रतिष्ठित हुए।)
(महाभारत, अंशवतरणपर्व, श्लोक ०४ ते ०९)
 
या कथेनुसार आज ज्या क्षत्रिय जाती आहेत त्या ब्राम्हणांनी क्षत्राणी अर्थात क्षत्रियांच्या बायकांचा उपभोग घेतल्याने जन्माला आले आहेत. याचा अर्थ आज जे कोणी स्वतःला क्षत्रिय समजत असतील, त्यांच्या वंशाची सुरुवात निश्चितच एखाद्या ब्रम्हणापासून सुरू झालेली आहे असे या महाभारतातील कथेनुसार स्पष्ट होते; त्यामुळे ज्यांना आपला पूर्वज ब्राम्हण आहे आणि आपल्या पूर्वज असलेल्या स्त्रियांवर ब्राम्हणांनी अतिप्रसंग केला हे मान्य असेल, त्यांनी आनंदाने स्वतःला क्षत्रिय मानावे.
 
राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वाचा, तर शिवाजी महाराजांनी त्याकाळात स्वतःला शिसोदिया या राजपूत वंशाशी जोडून आपण क्षत्रीय असल्याचे सांगितले आणि राज्याभिषेक करून घेतला होता, पण वस्तुतः शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि राजस्थानातील शिसोदिया राजघराण्याचा दुरान्वयानेही संबंध नव्हता आणि शिवरायांना हे चांगले माहित होते. शिवरायांचे घराणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ गावातील पाटीलकी असलेले सामान्य कुणबी घराणे होते आणि तेथून स्वकर्तृत्वाने हे घराणे छत्रपती पदापर्यंत पोहचले होते. त्याकाळात अभिषिक्त राजा होण्यासाठी ब्राह्मणांच्या मान्यतेची आवश्यकता असल्याने ब्राम्हणधर्मानुसार गरजेचे असलेले क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी शिवरायांचा चिटणीस बाळाजी आवजी याने शिवरायांच्या घराण्याच्या खोट्या वंशावळी तयार करून त्या काशीच्या गागाभट्टाला दाखवल्या होत्या हे अनेक इतिहास संशोधकांनी सिद्ध केले आहे. अर्थात पुढे चारच महिन्यांनी शिवरायांनी हे वैदिक क्षत्रियत्व लाथाडले आणि बौद्ध धम्माच्या वज्रयान परंपरेतील शाक्त राज्याभिषेक केला हा इतिहास आहे.
 
वस्तुतः महाभारतात क्षत्रियांच्या उत्पत्तीसंदर्भात आलेली उपरोक्त कथा हे काही ऐतिहासिक वास्तव नाही, तर ही ब्राह्मणांच्या पोचट पुराणातील भटी भाकडकथा आहे. ब्राम्हणांनी आपल्या धार्मिक साहित्यात ब्राम्हणेतर वर्ण व जाती यांबद्दल किती विकृत, अश्लील, बीभत्स आणि पराकोटीचे द्वेषपूर्ण लिखाण केले आहे हे सप्रमाण दाखवण्याचा या लिखाणामागे माझा उद्देश आहे. ब्राम्हणांनी त्यांच्या विकृत साहित्यात बौद्ध, जैन आणि त्यांना श्रेष्ठ समजणाऱ्या क्षत्रिय – वैश्य – शूद्र – अतिशूद्र (बहुजन समाज) यांच्याबद्दलच असे अत्यंत खालच्या थराचे लिखाण केले आहे, पण आज ज्या मुसलमान व ख्रिश्चनांबाबत ते येता – जाता बोटं मोडत असतात, त्यांच्याबद्दल त्यांच्या लेखणीने एक अवाक्षरही वाईट लिहिलेले नाही. विशेष म्हणजे ज्या मुघल आणि इंग्रज यांच्याबाबत आजचे तथाकथित ब्राम्हणी What’s App गुरू आभाळ हेपलतात, त्याच मुघल आणि इंग्रजांच्या दरबारात बसूनच हे विकृत साहित्य ब्राम्हण लिहत होते हा इतिहास आहे..!
 
मतितार्थ इतकाच की, आज तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षित झाला असाल, तर पवित्र मानल्या जाणाऱ्या ब्राम्हणी ग्रंथांचे वाचन करा, त्यातील विकृती समजून घ्या आणि त्यांची जाहीर होळी करा; तसेच कोणीही स्वतःला क्षत्रिय वा तत्सम उच्चवर्णीय – उच्चजातीय समजण्यापेक्षा माणूस समजा. आज आपल्या देशात संविधानाचे राज्य आहे. संविधानाला अभिप्रेत समता – बंधुता – एकात्मता यावर आधारित एकमय भारतीय समाज खऱ्या अर्थाने अस्तित्वात येण्यासाठी ते खूप आवश्यक आहे.
 
 
 बाळासाहेब गरुड 
 
0Shares

Related post

मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मत्स्य व्यवसायाला मिळालेल्या कृषी समकक्ष दर्जाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा मुंबई ( प्रतिनिधी ) : मत्स्यव्यवसाय…
“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत” तरुणांसाठी: एखाद्या छोट्या आकडेवारीमधून देखील बरेच अन्वयार्थ काढता येतील…
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन! भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *