- 10
- 1 minute read
सन्मान व संघर्ष करणारे सारे आज ही उद्धव ठाकरेंसोबत, तर सारे गद्दार शिंदेसोबत……!
ऑपरेशन टायगरचे खरे सूत्रधार सचिन अहिरांशी अखेरपर्यंतच्या संपर्कामुळे सुषमा अंधारे संशयाच्या भोवऱ्यात.....??
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सचिन अहिर हेच ऑपरेशन टायगरचे खरे सूत्रधार आहेत, अशी जाहीर कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. मात्र यावर किती विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे ? पण सचिन अहिर यांचा शिंदे सेनेत अचानक झालेला प्रवेश व मिळालेले उपसभापतीपद यामुळे यात तथ्य असण्याची बरीच शक्यता दिसत आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याला पुष्टी करणारी आणखी एक बाजू आहे, ती म्हणजे सुषमा अंधारे यांचा या काळातील फुटीर खासदारांशी असलेला संपर्क. ऑपरेशन टायगरची ज्या दिवसापासून चर्चा सुरु झाली, त्या दिवसांपासून सुषमा अंधारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे या गद्दार खासदारांच्या आणि सचिन अहिर यांच्या ही सतत संपर्कात होत्या. या खासदारांशी बोलण्याची व ऑपरेशन टायगर फेल करण्याची जबाबदारी नक्कीच उबाठाने त्यांच्यावर दिलेली नव्हती. मग त्या संपर्क कशासाठी करीत होत्या. सचिन अहिर यांनी ज्यावेळी गद्दारी केली त्यावेळी ही त्या संपर्कात होत्या. सुषमा अंधारे या सचिन अहिर यांच्याच मुळे उद्धव सेनेत आल्या होत्या. तेच त्यांचे गॉडफादर ही आहेत. आता अहिर यांनी गद्दारी केली असून त्या ही त्याच मार्गावरून जातील. स्थिर राहणे हा त्यांचा स्वभाव ही नाही. मात्र अडचण एक आहे की, शिंदे सेनेत ज्योती वाघमारे अगोदरच गेल्याने सुषमा अंधारे यांना शिंदे सेनेत तसे स्थान नाही.. मात्र सचिन अहिर यांनी काही मार्ग काढला आणि सत्तेतील एखादे पद दिले तर त्या गद्दारी करायला क्षणाचा ही विलंब करणार नाहीत.
ऑपरेशन टायगर सुरू असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अधिकृतपणे या खासदारांच्या संपर्कात असताना सुषमा अंधारेंनी सतत संपर्कात राहण्याची आवश्यकता नव्हती. त्याशिवाय या संदर्भात मिडिया समोर जाहीर भाष्य करण्याची पण गरज नव्हती. पण त्या करीत होत्या. त्यांच्या प्रभावाने हे ऑपरेशन टायगर थंड पडण्याची कसलीच शक्यता ही नव्हती. मग त्या उगीच लुडबुड का करीत होत्या ? हा प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखा नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या विरोधात सतत बोलणाऱ्या व लढणाऱ्या सुषमा अंधारे यांना सचिन अहिर यांनीच सेनेत घेतल्याने त्याचे अत्यंत निकटचे संबंध राहिले आहेत.

सचिन अहिर यांनी शिवसेना उबाठाला अखरेचा जय महाराष्ट्र केला, त्या क्षणापर्यंत ही त्या अहिर यांच्या संपर्कात होत्या, अशी कबुली त्यांनी स्वतःच जाहीरपणे दिली असल्याने त्यांच्या बाबतीत ही संशयाचे वातावरण असून त्या ही गद्दारी करण्यासाठी एखाद्या संधीची वाट पाहत आहेत, अशी स्थिती सध्या आहे.
शिवसेना हा नगरसेवक, आमदार अथवा खासदार अशा लोकप्रतिनिधींचा पक्ष कधीच राहिलेला नाही. गट प्रमुख, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख अशी रचना सेनेची अगदी सुरुवातीच्या काळापासून राहिलेली आहे. शिवसेना नेते आणि आणि उपनेते अशी ही रचना आहे. मात्र ज्या जिल्ह्याची जबाबदारी तेथेच हे नेते ही काम करतात. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही मर्यादा कधीच पाळली नाही. त्यामुळे अनेक जिल्हा प्रमुख ही त्यांच्या कार्य पद्धतीला कंटाळलेले आहेत. मात्र मातोश्रीवर अंधारे यांचे वजन असल्याने ही नाराजी सहसा बाहेर येत नाही. त्याचा गृह जिल्हा असलेल्या बीडमध्ये त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली तेव्हा तेथील जिल्हा प्रमुखांनी त्यांना जाहीरपणे मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. उबाठामधील एका ही महिला नेत्यांशी इतक्या दिवसात त्यांची जवळीक निर्माण झाली नाही. अन् नवीन महिला ही त्यांच्यामुळे सामिल झालेल्या नाहीत. उबाठाचा इतकाच फायदा झालेला आहे की, त्या बोलबच्चन असल्याने सभा गाजवतात. पण सभेतील गाजलेल्या भाषणामुळे मतं मिळत नाहीत. असे असते तर देवेंद्र फडणवीस नव्हे तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.
सुषमा अंधारे यांच्या विषयी उबाठाचे वरिष्ठ नेते आणि मातोश्री कधी गंभीरपणे विचार करेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, सुषमा अंधारे यांच्या प्रवेशामुळे फायदा कमी व नुकसान अधिक झालेले आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अगोदर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटात काम केलेले आहे. मात्र संघटनात्मक बांधणी आणि अजेंड्यावर जनतेत काम करणे हा त्यांचा पिंड राहिलेला नाही. सभांना हजेरी लावणे, भाषणे ठोकणे, बेंबीच्या देठापासून फुले, शाहू, आंबेडकर सांगणे आणि मोबदला घेणे. इतकेच त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान आहे. सुषमा अंधारे हे नाव आंबेडकरी चळवळीने त्यांना व्यासपीठ दिल्यामुळे महाराष्ट्राला माहित झाले आहे. पण सचिन अहिर यांच्याकडून ऑफर येताच क्षणाचा ही विलंब न करता ज्या शिवसेनेवर सतत टीका करून टाळ्या मिळविल्या त्या सेनेत त्यांनी प्रवेश केला. तसाच प्रवेश ते शिंदे सेनेत ही करू शकतात. उद्धव ठाकरे यांना राखी बांधली तशीच राखी त्यांनी एकनाथ शिंदे यांना ही बांधली तर नवल वाटायला नको.
पक्ष सोडायला, बदलायला आता काही कारण लागत नाही. २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा एकनाथ शिंदे यांची नव्हती. भाजप शिवसेनेला सन्मान देत नसल्याची ओरड ते करायचे. पण पुढे काय घडले ते साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, वेळ देत नाहीत ही ओरड असल्यामुळे पक्ष सोडत असल्याचे कारण अनेकांनी दिले आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांनी लायकी नसताना ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांनीच दगा दिलेला आहे. सुभाष देसाई यांच्यासारख्या बड्या नेत्याला दूर करून एकनाथ शिंदे यांना विधिमंडळातील सर्वात मोठा नेता बनविले. त्यांनीच धोका दिला. ज्या खासदारांनी गद्दारी केलेली आहे, त्यांना लायकीपेक्षा अधिक महत्त्व दिलेले आहे. सचिन अहिर यांचे ही तसेच आहे. सुषमा अंधारे या ही त्याच कडीतील असून ही कडी कधी ही तुटू शकते.
सुषमा अंधारेंचा उबाठामधील प्रवेश ही आंबेडकरी चळवळ व समाजाशी एक प्रकारची गद्दारीच……!
आंबेडकरी विचारांच्या पक्षांत काम करीत असताना सुषमा अंधारे यांना संपूर्ण समाजाने अपेक्षे पेक्षा अधिक सन्मान दिलेला आहे. यातून त्यांनी मानधन या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणावर माया ही जमवलेली आहे. असे असताना उबाठामध्ये त्यांनी प्रवेश केला. ही एक प्रकारची गद्दारीच होती. रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीत राहून सत्तेची कुठलीच पद मिळणार नाहीत, हे त्यांना माहित होताच व सचिन अहिर यांच्या माध्यमातून संधी मिळताच त्या आंबेडकरी चळवळीला सोडून गेल्या. आज त्यांना इथे ही सत्तेची पद मिळणार नाहीत. कारण उबाठाची इतकी तोडफोड झाली आहे की, कुणाला काय देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच राहिले नाही. राहिला आहे, तो फक्त संघर्ष. त्यामुळे ज्यांना सत्ता हवी आहे ते शिंदेकडे जात आहेत, तर ज्यांना संघर्ष हवा आहे, ते उबाठामध्ये मजबुतीने उभे आहेत. ठाकरेंकडील संघर्ष हा सन्मान देणारा आहे, तर शिंदेकडील सत्तापद गुलामी. पण दुर्दैव हे आहे की गुलामीच अनेकांना पसंत आहे. सुषमा अंधारे यांना ही सत्ता हवी आहे. त्या संधीची वाट पहात आहेत. मात्र भाजप आणि मित्र पक्षात त्यांना काही स्थान मिळेल असे वाटत नाही. सचिन अहिर हे एकमेव त्यांच्यासाठी आशेचे किरण आहेत.
शिवसेनेचा राजकीय पटलावरील उदय व बस्तान बसण्या अगोदर राज्यातील सत्ता केवळ ७० घराण्याकडे होती. त्याच विरोधात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष केला आणि या ७० घराण्यांचे वर्चस्व मोडीत काढत सत्तेचे चेहरे उभे केले. कोंबडी चोर नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनविले, सरपन विकणाऱ्या राम कदमांना मंत्री आणि विरोधी पक्षनेते बनविले. उद्धव ठाकरे यांनी तोच वारसा चालवित रिक्षा चालविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मंत्री आणि विरोधी पक्ष नेते बनविले. त्यांनीच गद्दारी केली. आज दिल्लीत भाजपचे सरकार आणि मोदी प्रधानमंत्री असले तरी त्याचे सारे श्रेय शिवसेना प्रमुख ठाकरे यांचेच आहे. महाराष्ट्राने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिल्यानेच भाजपासाठी दिल्लीच्या सत्तेची द्वारे उघडलेली आहेत. पण संधी मिळताच त्याच भाजपने ठाकरेंची सेना तोडली आहे. अन् सारे गद्दार त्याच भाजपसोबत व्हाया शिंदे जात आहेत.
मातोश्रीच्या अत्यंत विश्वासातील नेत्यांनाच तोडण्याचे काम भाजप शिंदेच्या माध्यमातून करीत असून उबाठा इतकी तोडफोड झाली आहे की, सत्ता म्हणून काहीच उद्धव सेनेकडे राहिलेले नाही. पण संपलेले काहीच नाही. तोच संघर्ष जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला, तोच खऱ्या व असली शिवसेनेला पुन्हा पूर्वीचे राजकीय वैभव मिळवून देईल. यात काही शंका नाही. मैदानातील ताकद आज ही पूर्वीसारखीच असून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ही खंबीर आहे.
……………………………………………………………….
राहुल गायकवाड,
प्रदेश महासचिव, समाजवादी पार्टी