• 15
  • 1 minute read

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना - राज असरोंडकर

तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या काळात उपोषणाचा मार्ग टाळत आलेले उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी अखेर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानातून बाहेर काढण्यासाठी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. राज्याच्या गृहसचिव मनिषा म्हैसकर यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात असरोंडकर यांनी १ एप्रिलपासून आपल्या राहत्या घरी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. असरोंडकर यांची आजवरची उपोषण करण्याची हट्टी पद्धत पाहता, स्मशानातील पुतळ्याचा विषय चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
उल्हासनगरात कॅम्प ३ येथील शांतीनगर स्मशानभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आलाय. चबुतऱ्यावर उल्हासनगर महानगर पालिकेचं नाव आहे. पण महानगर पालिका म्हणते, आम्ही पुतळा उभारलेला नाही. चबुतऱ्यावर सौजन्य म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. पण ते उघडपणे पुतळ्याची जबाबदारी घेत नाहीयेत. या पुतळा उभारणीला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही. शासनाने २ मे २०१७ रोजी जारी केलेल्या पुतळा धोरणातील कुठल्याही अटीशर्तींचं पालन पुतळा उभारताना झालेलं नाही. सबब, सदरचा पुतळा बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे पुतळा तातडीने सुरक्षितपणे हलवून, तो उभारणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मागणी कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी केली आहे.
 
गेल्या ६ महिन्यांपासून राज असरोंडकर स्मशानातील पुतळ्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत आहेत. वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्यानंतरही जिल्हाधिकारी, ठाणे, पोलिस आयुक्त, ठाणे आणि मनपा आयुक्त, उल्हासनगर यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. फक्त निवेदन एकमेकांकडे ढकलण्याचं काम सुरू आहे. पुतळा धोरणातील तरतूदींचं उल्लंघन होत असताना मूकदर्शक होऊन कर्तव्याशी बेइमानी करण्याचं धोरण जबाबदार पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी असरोंडकर यांनी गृहसचिवांकडे केली आहे.
 
गेल्या ६ महिन्यांतला नियमकायद्यांबाबतच्या बेफिकीरीचा सरकारचा अनुभव पाहता बुलढाण्यातील चिखला काकड घटनेतून सरकारने काहीच धडा घेतला नसल्याचं असरोंडकर यांनी म्हटलं आहे. उल्हासनगरात स्मशानात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यामागे खासदार श्रीकांत शिंदे असून प्रशासनाला चूक उमगलीय, पण खासदारांच्या व शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक अहंकारामुळे बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात खितपत पडला असल्याचा उघड आरोप राज असरोंडकर यांनी केलाय. 
 
शिवसेना प्रवक्ता किरण सोनवणे यांनी खासदारांच्या हस्तक्षेपाचा इन्कार केला आहे. आपण स्वतः हा विषय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातला असून लोकभावना लक्षात घेऊन सन्मानपूर्वक पुतळा स्थानांतरित करायला त्यांचा कुठलाही विरोध नाही व या संदर्भात मनपा आयुक्तांशीही खासदारांचं बोलणं झालेलं असून पुतळा स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असं किरण सोनवणे यांनी सांगितलं.
 
या पुतळा उभारणीमागे उल्हासनगर महानगर पालिकेने राजकीय दबावातून शवदाहिनीची थातुरमातुर कथा रचली असून आपण तिच्याशी सहमत नसल्याचं असरोंडकर यांनी सांगितलं. मनपाच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीररित्या पुतळा उभारला जात असताना प्रशासन झोपा काढत होतं का, हा असरोंडकर यांचा सवाल आहे. 
 
लोकवर्गणीतून स्थानिकांनी पुतळा उभारला असल्याचं लेखी उत्तर मनपा आयुक्तांनी दिलंय.‌ या लोकवर्गणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी व जमाखर्चाचा हिशोब संबंधितांकडून घ्यावा , अशी असरोंडकर यांची मागणी आहे. 
 
जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना होत असून विद्वेषी सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात आपण बाबासाहेबांना स्मशानाबाहेर काढू शकत नसल्याचं शल्य आणि अपराधी भावना माझ्या मनात असल्याची प्रतिक्रिया राज असरोंडकर यांनी दिलीय. 
 
     सत्ता मुजोर असते तेव्हा आत्मक्लेश करून घेण्यावाचून तुमच्याकडे काहीच पर्याय राहत नाही, त्यामुळे तब्येत साथ देत नसतानाही बेमुदत उपोषणाचा निर्णय घ्यावा लागलाय, असं त्यांनी सांगितलं.
 
     जर सरकारने घेतलेल्या निर्णयांचं, आदेशांचं, धोरणांचं पालन अधिकारी स्वतःहून करणार नसतील किंवा कोणी लक्षात आणून दिल्यानंतरही उदासीनतेवर अडून असतील तर आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही.
 
सबब,
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उल्हासनगरातील स्मशानातून तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवावा.
२. पुतळा धोरणातील प्रक्रियेचं पालन केल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुतळा यथायोग्य ठिकाणी पुनर्स्थापित करावा.
३. बेकायदेशीररित्या पुतळा उभारणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. 
४. वारंवार तक्रारी केल्यानंतरही ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पोलिस आयुक्त आणि उल्हासनगर मनपा आयुक्तांनी हयगय का केली, याबाबत चौकशी होऊन त्यांच्याविरोधात आवश्यकता भासल्यास कारवाई व्हावी.
 
या मागण्यांसाठी बुधवार, १ एप्रिल २०२६ चा दिवस उजाडल्यापासून सरकारकडून ठोस कृती होईपर्यंत मी माझ्या राहत्या घरी बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचं निवेदन राज असरोंडकर यांनी गृहसचिवांना पाठवलं आहे.
 
    गृहसचिवांना पाठवलेला ईमेल निम्नस्तरापर्यंत आलेला असला तर पुतळा हटवण्याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नसल्याचं केविलवाणं चित्र असल्याचं व त्यामुळे बेमुदत उपोषण अटळ असल्याचं राज असरोंडकर यांचं म्हणणं आहे.
0Shares

Related post

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…
महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान! महाड येथे केलेल्या चवदार तळ्याचा मुक्तीसंग्राम, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मसंगर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *