माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

शीर्षकाला समजून घ्यायला पुस्तकातल्या आशयाची जाण असावी लागते !

प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनकार यांनी “दगलबाज शिवाजी” नावाचे अजरामर पुस्तक लिहिलेलं आहे. त्या शीर्षकाला समजून घ्यायला पुस्तकातल्या आशयाची जाण असावी लागते. पण वाचन शत्रू असणाऱ्या व्यक्तीला ते समजू शकणार नाही.
       तसंच काहीसे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाबाबत वाचन शत्रू असलेले अधूनमधून आपल्या समाजात दिसत असतात. पुस्तकाचे शीर्षक प्रश्नवाचक आहे. या प्रश्नातूनच शिवबाचा आपुलकीचा शोध वाचक घेतो आणि शिवबा आपला कोण? याचा प्रत्येक जिज्ञासू वाचकाला बोध होतो. शिवबा दरबारींचा नाही तर रयतेचा आहे. हे पूर्णतः उमगते.
       बरं हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ते कोल्हापूरचे, राहणारे कोल्हापुरात. त्याच कोल्हापुरात जिथं शिवबाचे घराण्याचे वारसदार राहतात, गादीचे वारसदार राहतात. धाकटे शिवपुत्र छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज यांचं ते कोल्हापूर. त्यांना या पुस्तकाचं शीर्षक का बरं खटकलं नसेल आणि ते आजवर का बरं यावर नाराजी व्यक्त करत बोलले नसतील. त्यांना या पुस्तकाला कंटेंट आणि इंटेंट कळला. त्यामुळं कोल्हापुरात हे पुस्तक खूप वाचलं गेलं.
      बाबासाहेब आंबेडकर यांना देखील सामान्य माणूस ‘माझ्या भीमानं…. माझ्या भीमानं माय…’ हे शब्द महामहीम असा वर्ख असणारे नक्कीच नाहीत. मात्र या शब्दात सामान्य माणूस त्यांच्या दातृत्वशील कर्तृत्वाचं गुणगान गात असतो. अगदी बेंबीच्या देठापासून. ते मायेच्या आदराने. संसदेत अगदी आजच्या संसदीय भाषेत असे नमोच्चारण नाही होत. म्हणून काही सामान्य जन माझा भीम म्हणून महापुरुषांचा अवमान करत नाहीत तर आपल्या उरात त्यांचं महात्म्य साठवून घेत असतात.
        काळजात असणाऱ्या आणि काळजातल्या सिंहासनावर बसवलेल्या प्रत्येक दैवताला कधीही अहो काहो म्हणत संबोधन केले जात नाही. अगदी आपल्या घरातही. 
       आई या दैवताला सर्वाधिक अगं का ग, अरे तुरे हे काळजातून ओठावर येतं. धाक असलेल्या बापाला, नवऱ्याला अहो काहो येतं. यात एक अंतर असतं. आई सोबत हे अंतर कमी असतं. 
      मराठी माणसाला तर वारकरी परंपरेने ‘विठ्ठला तू माय बाप’. विठू माझा लेकुरवाळा, माझा पांडुरंग, माझा विठोबा, विठोबा माऊली, माझी विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकोबा. माझ्या हृदयात माझा राम. माझा किसना. या उच्चारणात अंतरीचा आणि आपुलकीचा अगदी खासगीतला भाव असतो. माया असते. त्यात जिवापाड जीव जडलेला असतो. 
       तर सिंहासनावर, मखमली आसनावर बसलेल्या पुढे जेव्हा जाण्याची हिम्मत नसते किंवा सोय नसते किंवा समोरून वावरणे शक्य नसते तिथे भीती असते. बडेजाव ची बडदास्त असते.तिथं खुशमास्कार्यांचीही गर्दी असते. त्या ठिकाणी दरबारी भीतीही असते. त्या भीतीत आदर असेलच असे नाही. 
      पण माझं राजं. माझा शिवबा. शिवराय. शिवाजी. या एका एका शब्दात काळजातल्या निर्मळ आपुलकीची झालर असते. आपलेपणाचा मखमली वर्ख असतो. अंतरीचा ओलावा असतो. 
         अगदीच व्यावहारिक उदाहरण द्यायचं तर आपण जेंव्हा काही काळाने भेटलेल्या मित्रासोबत बोलतो. तेंव्हा जर संभाषणात अहो काहो आले तर लागलीच मध्येच टोकत… अरे यार हे काय अहो काहो लावलय. आपण जवळचे मित्र आहोत. तेंव्हा सर्रास अरे कारे म्हणायचं. औपचारिक अहो काहो मैत्र नात्याला दूरचे वाटायला लागते. हे व्यवहार सत्य हेच सांगते की अंतरीची ओढ अशीच मायेची आणि खासगी असते. 
          महापुरुषांची लेगसी आणि संस्कार वारसा पुढे घेऊन चालण्यासाठी रक्ताने कोणी कोणाचा खरा वारस ठरत नसतो आणि जाती व ज्ञातीच्या नात्यानेदेखील कोणी कोणाचा वारस नसतो. हा, हे मात्र खरं आहे की रक्ताने माणूस मालमत्तेचा वारस नक्की होतो. पण विचार वारस होईलच याची कोणतीही शाश्वती नसते
       या बद्दल कोणाचे तरी प्रसिद्ध वाक्य आहे. ते याप्रसंगी प्रकर्षाने आठवते. ते वाक्य असे… ” मेरा वारीस, मेरा वारीस नहीं होगा. मेरे विचारों का वारीस मेरा वारीस होगा” 
       भाषा प्रादेशिक अर्थाने उच्चारणात आणि तिची हेल यात फरक असू शकतो. पण आपण जे बोलतो त्यात कंटेंट आणि इंटेंट हा मात्र आपण स्वतःवर करून घेतलेल्या आणि आपल्यावर झालेल्या आपल्या संस्कारातून येतो. म्हणूनच म्हणतात, “शब्दांचा वापर जपून करावा. कारण शब्द आपल्यावर झालेल्या संस्काराचे प्रमाणपत्र प्रस्तुत करत असतात.
       आम्ही शिवबाच्या शिकवणीचे वारस. मावळ्यांना शिवाजी आणि शिवबा हेच नाव जवळचे आहे. कावळ्यांना असेलच हे मात्र सांगता येत नाही.
     शिवबांच्यावर लिहिलेल्या या पुस्तकाने चर्चा घडवून आणलीच आहे तर एकदा हे पुस्तक वाचून घेतलंच पाहिजे. निदान आपल्याला स्वतःला कळण्यासाठी. नसता टीव्ही वरल्या टीआरपीला हातभार लावण्यापुरता आपला साधन म्हणून वापर होईल.
 
~~आर एस खानके
0Shares

Related post

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे – लोकशाहीचा आत्मा धोक्यात? देशाचा राजकीय नकाशा बदलतोय.पण…
“मराठी अस्मिता vs स्थलांतराचा प्रश्न”

“मराठी अस्मिता vs स्थलांतराचा प्रश्न”

“मराठी अस्मिता vs स्थलांतराचा प्रश्न” अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकहो.. खरं तर यापुढे बांधवांनो आणि भगिनींनो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *