• 3
  • 1 minute read

इस्रायल/ अमेरिका आणि इराण युद्धात, दोन पैकी कोण जिंकेल? : कदाचित तिसरेच राष्ट्र !

इस्रायल/ अमेरिका आणि इराण युद्धात, दोन पैकी कोण जिंकेल? : कदाचित तिसरेच राष्ट्र !

इस्रायल/ अमेरिका आणि इराण युद्धात, दोन पैकी कोण जिंकेल? : कदाचित तिसरेच राष्ट्र !

“क्ष” आणि “य” दोन देशातील युध्दात, कॉमन सेन्सिकल प्रश्न विचारला जातो: कोणता देश जिंकला क्ष का य ? जो प्रश्न इराण आणि अमेरिका/ इस्रायल युद्धात देखील विचारला जाऊ लागला आहे. 
 
पण उत्तर कदाचित बायनरी मध्ये नसू शकते. या युद्धाचा जगावर झालेला परिणाम याचे सिंहावलोकन नजीकच्या भविष्य काळात घेतले जाईल त्यावेळी त्याचे उत्तर असेल : चीन जिंकला!
 
युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर, युद्ध ज्या देशांमध्ये होत असते त्या दोन देशांचे प्रतिनिधी शस्त्रसंधी किंवा तहाच्या इतर अटींवर चर्चा करण्यासाठी टेबलवर समोरासमोर येतात. अनेक वेळा तिसरा देश जो त्या शत्रू राष्ट्रांमध्ये मध्यस्थाची भूमिका निभावत असतो, त्याचे प्रतिनिधी देखील टेबलावर असतात..
 
त्याप्रमाणे “इस्लामाबाद टॉक्स” वाटाघाटीमध्ये अमेरिका, इराण आणि मध्यस्थ पाकिस्तान अशी तीन शिष्टमंडळ एकत्र बसली होती 
 
पण त्यावेळी आणि त्याआधी देखील चौथा देश फिजिकली नाही पण व्हर्च्युअली सतत सर्वत्र, उघडपणे इराणचा पाठीराखा म्हणून उपस्थित होता: चीन 
 
इराण जेवढे तेल निर्यात करतो त्यापैकी जवळपास ८० टक्के तेल चीन खरेदी करतो. सारे व्यवहार युआन मध्ये. “तेलाच्या बदल्यात पायाभूत सुविधा” असे चीन इराणचे व्यापारी संबंध आहेत. वीजनिर्मिती, रेल्वे असे अनेक पायाभूत प्रकल्प चीन इराणमध्ये राबवत आला आहे.
 
हॉर्मुझ बंद झाल्यानंतर सर्वात विपरीत परिणाम चीनच्या ऊर्जा सुरक्षेवर झाला असता. पण चीनने नेहमीच चार महिने पुरेल एवढे तेल साठे केले आहेत, गेल्या दीड महिन्यात त्याने रशियाकडून तेल खरेदी केले आणि रिपोर्ट्स असे आहेत की गेल्या सहा आठवड्यात ट्रॅक न करू शकणाऱ्या, वेगळ्याच देशांचे झेंडे लावलेल्या तेल टँकर जहाजातून चीनची इराणकडून तेल आयात सुरूच होती. इराण बनवत असणारे ड्रोन, मिसाईल साठी स्पेयर पार्ट चीनने पुरवले आहेत. 
 
इराण बरोबर महत्त्वाकांक्षी व्यापार करार, बेल्ट अँड रोड प्रकल्पात इराणचे स्थान, शांघाय कोऑपरेशन आणि ब्रिक्स मध्ये इराणला घेणे…. सर्व एकत्र बघितले की चीन आणि इराणचे ऑरगॅनिक संबंध लक्षात येतील. 
 
चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक स्त्रोतांमुळे इराण गेले सहा आठवडे जिवंत राहू शकला आहे. इराणच्या गेल्या
सहा आठवड्यातील सर्व महत्वाच्या निर्णयात चीन पडद्याआडून इराणला बरेच मेसेज देत आला आहे. 
 
इस्रायल, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा चीनने जाहीरपणे निषेध केलाच. पण युध्दात आपला कोणताच प्रत्यक्ष सहभाग नसेल याची देखील काळजी घेतली आहे. 
 
अमेरिका आणि चीन मधील फरक ठळक आहे. 
 
ट्रम्प यांच्या अमेरिकेने अनेक दशकांच्या आपल्या नाटो मधील दोस्त राष्ट्रांना दुखावले, कॅनडा सारख्या शेजाऱ्याला भडकावले, इटलीची राष्ट्राध्यक्ष मिलोनी ज्या ट्रम्प यांच्या खूप जवळच्या मानल्या जात होत्या त्या देखील आज इस्रायल/ अमेरिकेवर धारदार टीका करत आहेत.
 
दुसऱ्या बाजूला चीनमध्ये जाऊन जिनपिंग आणि इतर नेत्यांबरोबर सबंध प्रस्थापित करण्यासाठी जगभरातून अनेक देशांचे प्रमुख रांगा लावत आहेत. त्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री, इटलीचे परराष्ट्रमंत्री, स्पेनचे अध्यक्ष, अबुधाबीचे शेख पासून तैवानच्या विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे.
 
जगाची अनेक दशकांची अमेरिका केंद्री घडी मुळापासून बदलत आहे, नवीन घडी बसवावी लागेल हे उत्तर, दक्षिण गोलार्धातील विकसित, अविकसित देशांना उमजू लागले आहे. या कामात चीन कळीची भूमिका निभावू शकतो, नव्हे त्याने ती निभवावी यासाठी अनेक देश सक्रिय झाले आहेत.
 
उभरत्या चीनच्या स्थानाचा संबंध चीनच्या राजनैतिक कौशल्याशी कमी, त्याने गेल्या ४५ वर्षात कमावलेल्या आर्थिक, व्यापारी, लष्करी, तंत्रज्ञानाच्या तगड्या स्नायूंशी जास्त आहे. 
 
जागतिक व्यापारी, भूराजनैतिक पटावर चीन लंबे रेस का घोडा आहे. त्याला स्वतःला सिद्ध करायची, विश्वगुरू म्हणवून घ्यायची कसलीच घाई नाही असे दिसते. 
 
ट्रम्प यांनी जाहीर केलेला शस्त्रसंधी उद्या मंगळवारी संपणार आहे. ट्रम्प नाविक नाकाबंदी उठवायला तयार नाहीत. परिणामी हॉर्मुझ उघडतो असे म्हणणाऱ्या इराणने हॉर्मुझ पुन्हा बंद केले आहे. पाकिस्तानात वाटाघाटींची दुसरी फेरी होईल की नाही याबदल साशंकता आहे. 
 
जागतिक नवीन घडी बसवण्यासाठी रिसेट बटण प्रेस व्हावे लागेल हे चीनला माहित आहे. ते बटण इराण युद्धाच्या निमित्ताने चीनच्या हातात आधीच आलेले असू शकते. 
 
हे सारे वाचताना भारताविषयीचे, नेत्यांविषयीचे विचार वाचकांच्या मनात आलेच तर ते झटकून टाकावेत ही विनंती 
 
संजीव चांदोरकर
 
 
 
0Shares

Related post

कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.

कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.

कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं. तुम्ही म्हणजे देश नाही.…
भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली…

भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली…

भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली… पुणे: चंदननगर भागात बौद्ध महिला पुनम मूण (वय 35…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *