• 280
  • 1 minute read

संविधान, संवैधानिक संस्था, परंपरा, सार्वजनिक उद्योग, आरक्षणं या सर्व गोष्टी वाचल्या तरच देश वाचेल !

संविधान, संवैधानिक संस्था, परंपरा, सार्वजनिक उद्योग, आरक्षणं या सर्व गोष्टी वाचल्या तरच देश वाचेल !

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सारा महाराष्ट्र कोमात !

समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाने आश्वासक चित्र उभे !

 महाराष्ट्रद्रोही भाजप, लिस्टेड व राज्यमान्यता असलेले भ्रष्ट्राचारी अजित पवार अन गद्दार व खोकेबाज म्हणून ज्याच्यावर कायमस्वरूपी शिक्का बसला ते एकनाथ शिंदे यांच्याच हाती पुन्हा 5 वर्षांसाठी राज्याच्या सत्तेची सूत्र जाणार असल्याने चिंताग्रस्त असलेल्या महाराष्ट्रावरील शोककळा जावून एक आश्वासक चित्र निर्माण करण्याचे काम ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाने तयार केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सारा महाराष्ट्र कोमात गेला आहे. इतका हा निकाल अनपेक्षित व राज्यातील जनतेच्या जिव्हारी लागला आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांकडे नव्हता, अशा वेळी बाबा आढाव यांच्या नेतृत्वाने आश्वासक चित्र उभे केले असून भयग्रस्त अवस्थेची कोंडी फोडण्याचे काम या आंदोलनाने केले आहे. आता निदान ही फुटलेली कोंडी तरी कायम ठेवण्याचे काम या काँग्रेस नेत्यांनी , शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी करावे, ही अपेक्षा आहे. बाकी डावे, समाजवादी व आंबेडकरवादी तर संघ, भाजपसारख्या फॅसिस्ट शक्तीशी लढण्यास सदैव तयार असतात अन आहेतच.
        देश विकून, लुटून पैसा कमविता येवू शकतो. त्याचा वापर करून निवडणुका जिंकता येतात. हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर करून निवडणूक आयोगाला गुलाम बनविता येवू शकते , मिडिया खरेदी करता येवू शकतो पण हे सर्व करून ही विजयाचा आनंद साजरा करता येवू शकत नाही. जिंकल्याचे समाधान मिळत नाही. ही अवस्था पराभूत अवस्थेपेक्षा भयानक आहे व आज ती संघ, भाजपची आहे. अशा भयानक अवस्थेतून आज या फॅसिस्ट शक्तींची वाटचाल सुरु आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आकड्यांची गरज असते. तो कसा मिळविला याला नैतिकता नसेल तर तसा काही अर्थ नाही.गेल्या दशकभरात भाजपने कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यात अनैतिक व घटनाबाह्य मार्गाने, जनमताच अनादर करून सत्ता स्थापन केलेली आहे.  तर राजस्थान, झारखंड आदी राज्यांमध्ये तसा अयशस्वी प्रयत्न केला आहे.  देश लुटायचा आहे. कंगाल करायचा आहे. काहीही करून सत्ता हवी आहे,त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी फॅसिस्ट शक्ती करीत असून ते उघडपणे दिसते आहे.
 
        तसे पाहिले तर देशाची संपत्ती विकणे, लुटतंत्र व संवैधानिक संस्थांची पायमल्ली हे सारे काही भाजपने या देशाला दिलेली देणगी नाही. फरक इतकाच आहे की, काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात याचा वेग कमी होता. हे करताना लोकमतला घाबरले जायचे. लाज, शरम बाळगून हेच सारे होत होते. आता लोकमताचा आदर नाही. अन महत्वाचे म्हणजे कसलीच लाज, शरम बाळगली जात नाही. त्यामुळेच या देशातील डावे, समाजवादी व आंबेडकरवादी ” सडक से संसद तक ” काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या विरोधात संघर्ष करीत होते. समाजवादी व आंबेडकरवादी पक्षांच्या विचारधारेचा मूळ आधारच अगदी अलिकडच्या काळापर्यंत गैर काँग्रेसवाद राहिलेला आहे.
     समाजवादी व आंबेडकरी विचारांच्या पक्षांची संसदीय राजकारणात किती ताकद राहिली हे कधीच महत्वाचे राहिले नाही. या विचारधारेच्या पक्षांनी सत्तेवर अंकुश ठेवून संसदीय व्यवस्था व परंपरेला वाचविण्याचे काम केले आहे. आज संघ, भाजपच्या विरोधात लढणारे हे पक्ष गेल्या दशकभरापूर्वी इतक्याच शक्तिनिशी काँग्रेसशी लढत होते. संविधान, संवैधानिक संस्था, परंपरा, सार्वजनिक उद्योग, लोकशाही आरक्षणं वाचविण्यासाठी  समाजवादी व आंबेडकरवादी सतत लढत आलेले आहेत. या सर्व गोष्टी वाचल्या तरच देश वाचेल. याच गोष्टी म्हणजे देश आहे, यावर दृढ विश्वास या विचारधारेच्या पक्षांचा आहे. त्यामुळेच आपल्या आयुष्याच्या शंभरीकडे वाटचाल करणारे बाबा आढाव मैदानात उतरले आहेत. लोकशाही संस्था, संविधान वाचविण्यासाठी आपण निर्णायक आंदोलनासाठी मैदानात उतरलो आहोत. यात मरण आले तरी मागे हटणार नाही, अशी ठाम भुमिका त्यांनी घेतल्याने साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या आंदोलनाने वेधून घेतले. 
      पाशवी बहुमतानंतर मुख्यमंत्री कोण होणार  ?  यासंदर्भातील चर्चा अख्या महाराष्ट्र व देशात सुरु आहे. मुंबईत अन दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडीसाठी वांझोट्या बैठकांची गुऱ्हाळे सुरु आहेत. अमित शहाच्या पोढडीतून कुणाचे नाव बाहेर येणार? शिंदेचे काय होणार? महायुतील कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदी मिळणार? कोण -कोण मंत्री होणार? मी पुन्हा येणार म्हणणारे फडणवीस खरच पुन्हा येणार का, की त्यांचा पुन्हा विचका होणार ? या साऱ्या प्रश्नांची चर्चा  राज्यभर सुरु असताना अचानकपणे चर्चेचा केंद्र बिंदू सरकून तो पुण्यातील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाकडे गेला. ही फार मोठी गोष्ट असून याचा फायदा राज्यातील मवि आचे नेते घेवू शकले नाहीत, तर ते येणाऱ्या काळात भाजप पुढे कसलेच आव्हान उभे करू शकणार नाहीत. हे तितकेच खरे आहे.
          सर्वच शासकीय, प्रशासकीय यंत्रणा व निवडणूक आयोगाचा गैरवापर करून हरयाणानंतर महाराष्ट्रात ही भाजपने पाशवी बहुमत मिळविले आहे. हे सर्व करताना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला कलंकित केले आहे. गेल्या अडीज वर्षांपूर्वी लोकमताचा अनादर करीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची तोडफोड करीत राज्यात घटनाबाह्य सरकार बनविले. महापुरुषांचा अवमान व अपमान केला. पण या विरोधात टोकाचा संघर्ष करताना राज्यातील महाविकास आघाडी दिसली नाही. राज्यात EVM ला मॅनेज करून जे पाशवी बहुमत महायुतीने मिळविले आहे. त्यावर काँग्रेस, शरद पवार अथवा उद्धव ठाकरे जुजबी बोलण्या पलिकडे काहीच करीत नसल्याने बाबा आढाव यांना आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. आता या आंदोलनाला निर्णायक वळणावर घेवून जाण्याचे काम तरी मविआने केले पाहिजे. पण तेवढी ही ऊर्जा अथवा इच्छा शक्ती त्यांच्याकडे नाही. हे ही दिसत आहे.त्यामुळे या आत्मक्लेश आंदोलनाला पुढे रेटण्याचे काम ही राज्यातील समाजवादी व आंबेडकरी चळवळीलाच करावे लागेल.
   
          काँग्रेस व शरद पवारांचा भाजपला विरोध म्हणजे उंटावरून शेळ्या राखणारा…...
 
      अगदी स्पष्ट अन उघडपणे भाजपचा संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, बहुजन वर्गाला भागीदारी देणारे आरक्षण, या देशाचे महापुरुष, गौरव, प्रतिकं, प्रतिमा व शान असलेल्या सर्वच गोष्टींना विरोध आहे. या विरोधासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली असून हाच संघ आज भाजपच्या माध्यमातून देशाच्या सत्तेवर विराजमान झालेला आहे. अन एक -एक पायरी चढत तो ब्राह्मणी व्यवस्था पुन्हा स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या संविधान व लोकशाही व्यवस्थेला तो संपवित आहे. संघाची ही कृति आजची नाही. वाजपेयी पंतप्रधान झाल्यापासूनची आहे. पण त्या विरोधात त्या- त्या वेळी प्रमुख विरोधी पक्ष राहिलेल्या काँग्रेस व शरद पवारांची भुमिका उंटावरून शेळ्या राखण्यासारखीच राहिली आहे.
       संघाचा संविधानाला असलेला विरोध लपून छपून नाही. उघड उघड आहे. त्यामुळेच भाजपच्या नेतृत्वाखालील वाजपेयी यांचे सरकारकेंद्रात आल्यावर पहिल्यांदाच संविधानाची समिक्षा करण्यासाठी समिती नेमण्यात आली. अन विशेष म्हणजे शरद पवारांचे कट्टर समर्थक संगमा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. याचा सरळ अर्थ असा आहे की, शरद पवारांचा संविधान समिक्षेला पाठींबाच होता. बाबरी मशिद शहीद झाली तेव्हा ही देशात काँग्रेसीची सत्ता होती व विशेष म्हणजे पवार देशाचे संरक्षण मंत्री होते. असे असताना भाजप इतके मोठे कांड करू शकते. अन त्यात कुणाला ही शिक्षा होत नाही. याचा अर्थ काय ?  अन अर्थ काहीही असला तरी या गोष्टी शरद पवारांच्या पुरोगामीत्वावर शंका घेण्यास पुरेशा आहेत.
   
          काँग्रेसच्या सत्ताकाळातच संघाचे हिंदू – मुस्लिम राजकारणाला खतपाणी…...
      
     काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळातच संघाने हिंदू – मुस्लिम राजकारणाची पाळेमुळे घट्ट करून घेतली. राजीव गांधी यांना हाताशी धरून बाबरी मशिदीचा टाळा खोलून रामलल्ला पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. याचा फायदा पुढील काळात संघ, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या पद्धतीने घेतला ते सर्वाना माहित आहेच. बाबरी मशिद शहीद अन त्यानंतर झालेले बॉम्बस्फ़ोट, दंगली यात देश होरपळून निघाला आहे. त्याशिवाय संघ, भाजपने हिंदू  – मुस्लिम राजकारणाच्या प्रयोगशाळा अनेक राज्यात सुरु केल्या. सत्तेच्या मदतीने मोदींने गुजरातमध्ये घडवून आणलेल्या दंगली, मुस्लिम धार्मियाच्या कत्तली, त्यांच्या संपत्तीचे जाळपोळ, मुस्मिल महिलांवरील बलात्कार या घटना म्हणजे मानवी समाजावरील कलंक ठरल्या. या सर्व गोष्टी संघ, भाजपने घडवून आणल्या असल्या तरी काँग्रेसचा त्यास मूक पाठींबाच होता. या बाबरी मशिद शहीद करण्याचा घटना म्हणजे या देशाच्या संविधान व लोकशाहीवरील हल्लाच होता. अन तो केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना झाला. देशाचे संरक्षण मंत्री शरद पवार असताना झाला. हे विशेष.
         काँग्रेसच्या सत्ताकाळात विशेष करून पी. व्ही.नरसिंह राव पंतप्रधान असताना या फॅसिस्ट शक्तींना हिंदत्वाचा अजेंडा घेऊन देशात उन्मात माजविण्याची मोकळीक मिळाली. त्यामुळे या शक्तींनी अनेक राज्यात हिंदुत्वाच्या प्रयोगशाळा सुरु करून हिंदू – मुस्लिम राजकारणाची पाळेमुळे धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या या देशात पुन्हा घट्ट रोवली. त्याचीच परिनीती आहे की, हेच राजकारण करीत भाजप देशाच्या सत्तास्थानी विराजमान आहे व संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संवैधानिक संस्था, न्याय व्यवस्था सर्वच धोक्यात आहेत.  हे सारे धोके संघ, भाजपने निर्माण केले असले तरी काँग्रेस ही त्यास तितकीच जबाबदार आहे.
 
                  निवडणुका केवळ फार्स आहे….
 
निवडणुका आता केवळ फार्स ठरल्या आहेत. एक औपचारिकता म्हणून निवडणुका जाहीर होतात, पार पडतात. मतदार मते देतात, अन ती मतं EVM भाजप व मित्र पक्षांना देते. सरकारे आज लोकमतांनी बनत नाहीत, तर निवडणूक आयोग व EVM मशीन सरकारे बनवित आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. अशा वेळी EVM विरोधात जनांदोलनाची गरज आहे. राजकीय पक्षांनी, लोकशाही व संविधानावर निष्ठा असणाऱ्या संघटना व व्यक्तींनी या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात उभे राहणे हेच आज देशाचे आहे. आपली जबाबदारी ओळखून देश वाचविण्यासाठी उभे राहण्याची गरज आहे. समाजवादी नेते बाबा आढाव यांनी एकदम योग्य वेळी आत्मक्लेश आंदोलन करून आंदोलनाची दिशा दाखविली आहे. ते आंदोलन पुढे घेवून जाणे आता आपली जबाबदारी आहे.
 
…………………
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)       जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे…
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !        महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक…
अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !       डोनाल्ड ट्रम्प 47 वे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *