- 88
- 6 minutes read
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी
जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील!
दलित-ओबीसींना परकीय राज्यकर्तेच न्याय मिळवून देतात!
तुमचा आक्रोश युरोप-अमेरिकेच्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा!!
लेखकः रविन्द्र सोलनर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी
भारतीय प्राचिन ईतिहासातील सर्वात मोठा युगपुरूष ज्याला मानले जाते तो आहे ‘भगवान श्रीकृष्ण! यालाच द्वापर युगाचा हिरो म्हणजे महानायकही म्हटले जाते. परंतू विषम समाजव्यवस्थेत यशस्वी महापुरूष सरळ मार्गी कधीच नसतात, किंबहुना ते असूच शकत नव्हते कारण त्यांना जे इच्छित घडवून आणावयाचे असते त्यासाठी त्यांना ओठात वेगळे व पोटात वेगळे ठेवूनच काम करावे लागते. पण कौरव गण, पांडव गण व यादव गण या तिनही गण समाजातील म्होरक्यांना या महानायकाच्या ना ओठातलं राजकारण समजलं, ना पोटातलं! परिणाम काय झाला? यादव गण आपसातील यादवीने नष्ट झाला व कौरव-पांडव गण आपसात लढून बरबाद झालेत! कृष्ण एकीकडे अर्जूनाला युद्धाचे कर्तव्य समजावून सांगतो व त्याला युद्धासाठी तयार करतो तर दुसरीकडे तो दुर्योधनाच्या दरबारात जावून सामंजस्याची भाषा करून युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. अर्जूनाला तरी कुठे लगेच समज येते! त्याला समजावता-समजावता कृष्णाला 574 श्र्लोक वदावे लागलेत, तेव्हा कुठे नाईलाजास्तव तो युद्धासाठी तयार होतो. श्रीकृष्णाने आपल्या डोळ्यादेखत तीनही गणसमाज नष्ट होतांना पाहिले आणी त्यांच्या प्रेतांवर त्याने उभा केला अ-ब्राह्मणी संघ-गणसमाज ज्याचे पुढच्या काळातील क्रांतीकारी अपत्य होते महामानव सिद्धार्थ गौतम बुद्द!
महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याचे श्रेय शरद पवार स्वतःकडे घेतात व हे ओठावरचे बोल खरे मानून ओबीसी जनता शरद पवारांना आपला नेता मानायला लागली. सत्य हे आहे की, 16 नोव्हेंबर 1992 रोजी सुप्रिम कोर्टाने जजमेन्ट देतांना व्हि.पी. सिंग सरकारने 13 ऑगस्ट 1990 रोजी काढलेला अध्यादेश वैध ठरविला. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये तत्कालीन प्रधानमंत्र्याने सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याचे आदेश दिलेत. यात आता शरद पवारांचा रोल इतकाच होता की वरून म्हणजे केन्द्राकडून आलेला आदेश अमलात आणणे. परंतू ओबीसी समाजाला फक्त ओठावरचीच भाषा समजते. शरद पवारांच्या पोटात काय आहे, हे समजून घेण्याइतकी सक्षम आकलन शक्ती ओबीसींमध्ये आजही नाही. शरद पवारांच्या ओठावर मंडल आयोग होता आणी पोटात मात्र हैदराबादी गॅझेट होते. जे मराठ्यांना समजले आणी त्यांचे चांगभले झाले.
मुख्यमंत्री फडणवीसांसकट सर्वच ब्राह्मण-मराठा राजकीय नेत्यांच्या ओठावर गेल्या पंधरा वर्षांपासून एकच वाक्य एकायला मिळत आहे- ‘‘ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणे’’ प्रत्यक्षात त्यांच्या पोटात काय होतं- ‘‘सरसकट कुणबीकरण करून आख्खं ओबीसी आरक्षणच मराठ्यांच्या घशात घालणे, हे ब्राह्ण-मराठा नेत्यांच्या पोटात होतं.’’ पण आमचे अति-प्रबुद्ध झालेले दलित नेते व आधीच येडे असलेले ओबीसी नेते, अति-अभ्यासू कम्युनिस्ट कॉम्रेड, गांधीवादी समाजवादी साथी या ओठावरच्या शब्दांना भुलले व धावतच गेलेत जरांगेच्या उपोषण मंडपात मराठा आरक्षणाला पाठींबा द्यायला. आमचा DNA ओबीसींचा आहे, असे फडणवीस गर्वाने सांगत फिरतात. कुणीही पोरगा आपल्या स्वतःच्याच बापाची सेवा करून खूश ठेवतो ना? असा एक तरी मुलगा दाखवा की जो आपल्या स्वतःच्या बापाला वृद्धाश्रमात पाठवून शेजाराच्या बापाला पंचपक्वान्न खाउ घालतो आहे! मग फडणवीस DNA असलेल्या ओबीसींच्या ताटातली भाकरी ओरबाडून ती मराठ्यांच्या घशात का घालत आहेत? म्हणजे फडणवीसांच्या ओठावर ओबीसी आणी पोटात मात्र मराठा आहेत.
फडणवीसांच्या ओठात काय आहे आणी पोटात काय आहे किंवा शरद पवारांच्या ओठावर काय आहे आणी प्रत्यक्षात पोटात काय आहे हे ब्राह्मण मराठा समाजाला ओरडून सांगावे लागत नाही, ते न सांगताच त्यांना समजते म्हणून त्या सत्ताधारी जाती आहेत. ओबीसींना अजून ओठावरचं समजून सांगण्यातच आमची इतकी दमछाक होते, पोटातलं समजणं कोसो दूर! आमच्या ओबीसींना केवळ थिअरी सांगून समजत नसते, प्रॅक्टीकलच दाखवावे लागते. तर हे घ्या प्रॅक्टीकल-
1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूका लढविल्यात. धुळे विधानसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार होते रामराव सिताराम पाटील. आणी त्यांच्या विरोधात तेवढ्याच तोलामोलाचे अपक्ष उमेदवार होते राजवर्धन कदमबांडे! दोघेही मराठा! एक साखर-सम्राट तर दुसरा कोल्हापुर गादीचा जवळचा नातेवाइक! शरद पवारांनी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. रात्री अकरापर्यंतच्या जाहीर सभेत पवारांच्या ओठात नाव होते कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रामराव सिताराम यांचे! रात्री जेवनानंतर हॉटेलमधील निवडक विश्वासू लोकांसोबत झालेल्या बैठकीत पवारांच्या पोटातले नाव होते अपक्ष उमेदवार कदमबांडे यांचे! निवडणूक निकाल लागला आणी पवारांच्या पोटातले अनधिकृत अपक्ष उमेदवार कदमबांडे प्रचंड मतांनी निवडून आलेत व पवारांच्या ओठातले कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. आणी हे घडले कोणत्या मतदारसंघात? कॉंग्रेसचा 1952 पासूनचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यात! मराठा जातीला आपल्या नेत्याच्या पोटात काय आहे, ते ओरडून सांगावे लागत नाही, त्याचा गवगवा करणे तर फारच दूर! पवारांना ओठातलं सांगण्यासाठी जाहीर सभा घ्यावी लागते, परंतू पोटातलं सांगण्यासाठी चार लोकांची रात्रीची मिटींग पुरेशी असते.
ब्राह्मण-मराठा जातीचे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या पोटात काय चालू आहे ते नेमके ओळखतात व त्याप्रमाणे काम करतात, म्हणूनच ब्राह्मण-मराठा जात 1920 पासून राजकीय सत्तेत आहे. आमचे ओबीसी फक्त मुंडके मोजतात व 52 टक्क्के लोकसंख्या असल्याची टिमकी वाजवीत फिरतात. परंतू आपल्या ओबीसी नेत्याच्या पोटात काय चालू आहे ते ओळखण्याची क्षमता नसेल तर तुम्ही सत्तेत येणे फार लांबची गोष्ट, मागच्या चार ओबीसी पिढ्यांनी कष्ट करून मिळवून दिलेले आरक्षणही टिकवता येत नाही.
एक साधा कॉमन सेन्स आहे, गेल्या वर्षी याच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जरांगेने मुंबई ठप्प करून मुख्यमंत्री फडणविसाचे नाक दाबले आणी 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबादी गॅझेटचे निमित्त करून मराठा कुणबीकरणाचा जी.आर. काढायला भाग पाडले. परिणामी ओबीसी आरक्षण खतम झाले. आता हे आरक्षण परत मिळवायचे असेल तर तोच जरांगेचा मार्ग पत्करावा लागेल. ओबीसींनी मुंबईत लाखोंच्या संख्येने येऊन मुंबई ठप्प करणे, मुख्यमंत्री फडणवीसांचे नाक दाबणे आणी 2 सप्टेंबरचा कु-जरांगे जी.आर. रद्द करणारा प्रति जी.आर. काढणे, 1994 सालापासून दिलेलेया सर्व कुणबी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायधिशाच्या अध्यक्षतेखाली सक्षम उच्च अधिकार्यांचा व अभ्यासू तज्ञांचा उच्चस्तरीय निःपक्षपाती सर्वजातीय सदस्यांचा स्वायत्त आयोग नेमणे व खोट्या कुणबी प्रमाणधारकांनी लुबाडलेल्या नोकर्या काढून घेऊन त्या खर्या मूळ ओबीसींना देणे. हे मुख्य काम ओबीसींचे आहे आणी ते मुंबई ठप्प करून दाखवीली तरच शक्य आहे!
आता आपण भुजबळसाहेबांचा विचार करू या! मुंबईत मोर्चा काढण्याची मूळ कल्पना भुजबळसाहेबांचीच आहे. तसे त्यानी दोन वेळा पत्रकारांसमोर बोलूनही दाखवीले आहे. 5-6 टक्के लोकसंख्या असलेले मराठा मुंबईत येउन जागतिक आर्थिक शहर असलेल्या मुंबईला ठप्प करू शकतात तर 52 टक्के ओबीसी मुंबईत घुसल्यानंतर मुंबईचे काय होईल? या कल्पनेनेच फडणवीसांना घामाच्या धारा सुरू झाल्या असतील तर ते स्वाभाविक आहे. मुंबई ठप्प होणे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची अकार्यक्षमता व ना-लायकी जागतिक वेशीवर टांगली जाणे. अशावेळी कोणीही मुख्यमंत्री कोणत्याही स्तरावर जाऊन ते आंदोलन रोखण्याचा अथवा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. जरांगेच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी फडणवीसांना एकही मराठा शोधूनही सापडला नाही. महाराष्ट्रात ओबीसींमध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय नेते म्हणून भुजबळच आहेत. त्यांच्या ओठातून आलेले एक वाक्य हाकेंच्या 1 सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनाची हवा काढून घ्यायला पुरेसे आहे. भुजबळांच्या तेवढ्या एका वाक्याचा धागा पकडून बाकीचे भुजबळ-भक्त आंदोलनात फूट पाडण्याचे कु-कर्म तन-मन-धनाने व ईमाने-इतबारे पार पाडतील याची पुरेपूर खात्री फडणवीसांना आहे कारण ओबीसींना ओठातले-पोटातले काय वेग-वेगळे असते ही भानगडच माहित नाही.
अनुयायी आणी भक्त यांच्यात हाच मोठा फरक आहे. भक्त आपल्या गुरूच्या तोंडाकडे बघून भक्ती करतो, त्याच्यासाठी फार अक्कल लागत नाही. मात्र अनुयायी आपल्या गुरूच्या विचार-कार्याचा अभ्यास करून ठरवतो की आपल्या गुरुला नेमके काय अपेक्षित आहे. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत भुजबळसाहेब डावपेचाचा भाग म्हणून एखादे वाक्य उच्चारत असतील तर त्या वाक्याला भुजबळसाहेबांच्या विचार-कार्याच्या कसोटीवर घासून-पूसून स्विकारले पाहिजे. काय आहेत भुजबळांचे आतापर्यंतचे विचार-कार्य?
भुजबळ हे 1990 पर्यंत आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. शिवसेना ही आक्रमकपणे मंडल आयोगविरोधी पक्ष-संघटना म्हणून ओळखली जात होती. अॅड. जनार्दन पाटील, आजी शिक्षक आमदार कपिल पाटील, अॅड. माधवराव वाघ, प्रा. श्रावण देवरे, जगन्नाथ कोठावदे, बाळकृष्ण नाटुस्कर, हिरालाल पोतदार आणी तरूण युवा नेते कमलाकर दरवडे यांच्यासारख्या असंख्य गल्ली-बोळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राज्यभर दौरे काढून सभा-सम्मेलने, मोर्चे-मेळावे, परिषदा-बैठका घेऊन ओबीसींमध्ये जनजागृती केली. महाराष्ट्र ओबीसी संघटनेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्यात व खेड्यापाड्यात मंडल आयोग व ओबीसी आरक्षण पोहचवले. त्या काळात गाव-खेड्यात आमच्या अनेक बैठका व सभा शिवसैनिकांनी उधळून लावल्या होत्या. नंतरच्या जनता दलाच्या काळात डॉ. बाबा आढाव, निळूभाऊ फुले, भाई वैद्य, कॉ. शरद पाटील, डॉ. गेल ऑम्वेट, नागेश चौधरी, सुशिलाताई मोराळे, प्रा. शाम झाडे यासारखे दिग्गज सामाजिक नेते मंडल आयोगाच्या लढाईत उतरलेत. औरंगाबाद येथील निळूभाऊ फुलेंची सभा उधळण्याचे काम शिवसैनिकांनी केले तेव्हा राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते.
महाराष्ट्राच्या या मंडलमय सामाजिक वातावरणात गरज होती ती ओबीसी जातीतील फक्त एका दिग्गज राजकीय नेत्याची! कारण सामाजिक अजेंडा जोपर्यंत राजकीय अजेंड्यात सामील होत नाही तोपर्यंत चळवळ पुढे सरकत नाही. सर्व सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष हे ब्राह्मण-मराठ्यांचे पक्ष असल्याने ते कट्टर मंडल आयोगविरोधी होते व या पक्षातील ओबीसी जातीत जन्मलेल्या नेत्यांची हिम्मत नव्हती की ते स्वतःला ‘‘ओबीसी नेता’’ म्हणवून घेतील. आम्ही महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या मंडल-परिषदांना कॉंग्रेसचा, शिवसेनेचा वा भाजपाचा एकही नेता उपस्थित राहण्याची हिम्मत करू शकत नव्हता. परंतू अशाही कठीण काळात ओबीसी चळवळीची राजकीय गरज भागविण्याचे महान कार्य केले भुजबळ साहेबांनी! बाळ ठाकरे यांची उघड दहशत कॉंग्रेस-भाजपमधील मराठा-ब्राह्मण नेत्यांची अप्रत्यक्ष छुपी दहशत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम करीत होती. अशा परिस्थितीत भुजबळ साहेबांनी जीवावर उदार होऊन मंडल आयोगाचे जाहीर समर्थन केले व बाळ ठाकरे यांचा रोष ओढवून घेतला. त्याच्या दुष्परिणामाचे फळ भुजबळसाहेबांना लगेच भोगावे लागलेत. 1991 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट विधान सभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर भुजबळांचा अधिकार होता. मात्र ठाकरेंनी भुजबळांना डावलून मनोहर जोशी नावाच्या नवख्या बामनाला विरोधी पक्षनेता बनविले आणी भुजबळसाहेबांच्या आक्रमक विद्रोही ज्वालांनी पुरता महाराष्ट्र हादरला. शिवसेनेला लाथ मारुन भुजबळ कॉंग्रेसमध्ये आलेत राज्यमंत्रीमंडळात नंबर दोनचे मानाचे स्थान मिळविले. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक जे भटके-विमुक्त म्हणजे ओबीसीच होते व त्यावेळपर्यंत ते शरद पवार विरोधी झाले होते. शरद पवार मुख्यमंत्री असते तर त्यांनी भुजबळांच्या विद्रोही ज्वाला विझविण्याचेच काम केले असते.
आता मला सांगा की ज्या भुजबळसाहेबांचे उत्तर आयुष्यातील विद्रोही आचार-विचार मंडल आयोग व ओबीसी चळवळीची पार्श्वभूमी घेउन पुढे आले आहेत, ते भुजबळसाहेब आज ओबीसी आरक्षण खतम होत असतांना ओबीसींमध्ये फुट पाडतील काय? त्यांच्या ओठावर एखादे वाक्य फडणवीसांच्या दबावाखाली आलेले असेलही पण तेवढ्या एका वाक्याचा धागा पकडून अनुयायांनी ओबीसी चळवळीत फूट पाडून घ्यायची का? लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे भरत निचिते, रविन्द्र टोंगे यासारख्या होतकरू नवतरूण नेतृत्वाला तुम्ही नाऊमेद करण्याचे पाप कराल?
भुजबळ साहेबांच्या ओठावर काहीही असले तरी त्यांच्या पोटात हेच आहे की, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली येत्या एक सप्टेंबरला लाखो नव्हे करोडो ओबीसींनी मुंबईत घुसावे व जागतिक आर्थिक शहर ठप्प करुन सोडावे. दलित-ओबीसींचे तारणहार भारतातील राज्यकर्ते नाहीत, तर ते युरोप-अमेरिकेतील व ईराण-इराकमधून आलेले राज्यकर्ते होते, ज्यांनी मध्ययुगीन इतिहास काळात दलित-ओबीसींना ब्राह्मण-क्षत्रियांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तात्यासाहेब महात्मा फुले इंग्रज राज्यकर्त्यांना मायबाप सरकार का म्हणत होते व महंमद पैगंबर साहेबांचा ‘जहांमर्द’ म्हणून का गौरव करीत होते? जरा समजून घ्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चवदार तळ्याच्या संगराची बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली म्हणून इंग्रजांनी डॉ. बाबासाहेबांना गोलमेज परिषदेत महात्मा गांधीच्या समोर बसवून गांधींना जाब विचारण्याची संधी दिली. बाबासाहेबांनी या संधीचे सोने केले व अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळविलेत. परंतू भारतातील गांधीसारख्या क्रूर राजकारण्याने ईमोशनली ब्लॅकमेल करून ते काढूनही घेतलेत.
ओबीसींनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जोपर्यंत भारतात ब्राह्मण-क्षत्रियांचे राजकीय पक्ष सत्तेत राहतील तोपर्यंत ना ओबीसीतील घुसखोरी थांबणार, ना ओबीसी जनगणना होणार, ना ओबीसींचे खड्यात जाणे थांबणार! ओबीसींनी आपले दुःख भारतीय राज्यकर्त्यांसमोर मांडून काहीही उपयोग नाही कारण ब्राह्मण व क्षत्रिय राज्यकर्ते हे क्रूर, रानटी व मानवतेचे शत्रू आहेत व ते क्रूर-रानटीपणाला धर्म-कार्य व पुण्यकर्म समजतात. तुमच्या दुःखाचा आक्रोश युरोप-अमेरिकेतील राज्यकर्त्यांपर्यंत गेला पाहिजे. जागतिक आर्थिक शहर असलेले मुंबई ठप्प झाले कि त्याचे पडसाद युरोप-अमेरिकेतील उद्योगावर पडतील व तेथून दबाव आल्यावरच भारतातील राज्यकर्ते ओबीसींचे जीवन-मरणाचे प्रश्न सोडवतील.
भुजबळसाहेबांच्या ओठावर आज हे विचार येऊ शकत नाहीत, कारण आज त्यांचा हात दगडाखाली आहे. परंतू 2010 साली रामलीला मैदान भरविन्याची घोषणा भुजबळसाहेबांनी करताच तत्कालीन गृहमंत्री असलेल्या प्रणव मुखर्जींना संसदेत उभे राहून ओबीसी जनगणना करणार असल्याची घोषणा करावी लागली होती. कारण दिल्लीत-मुंबईत सुई जरी पडली तरी तीचा आवाज युरोप-अमेरिकेपर्यंत जाउन पोहोचतो, हे मनमोहनसिंगसारख्या अर्थतज्ञाला व प्रणव मूखर्जींसारख्या मुरब्बी नेत्याला चांगलेच माहित होते. म्हणून त्यांनी ओबीसी जनगननेची घोषणा केली व भुजबळसाहेबांना नाईलाजास्तव तलवार म्यान करावी लागली.
भुजबळसाहेबांच्या पोटात हेच आहे की, 1 सप्टेंबरला मुंबइत लाखो ओबीसींनी यावे, मुंबई ठप्प व्हावी व अमेरिकेकडून ट्रम्पचा दणका बसताच मोदी ओबीसी जातनिहाय जनगणना करतील व फडनवीसही 2 सप्टेंबरचा काळा कु-जरांगे जी.आर. रद्द करतील. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या! माझा हा लेख प्रकाशित झाल्यानंतर भुजबळसाहेबांवरचा दबाव वाढेल व ते समता परिषदेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना फोन करतील. फोनवर जेव्हा त्यांचे ओठ सांगतील की, ‘‘1 सप्टेंबरच्या मुंबई मोर्च्याला जाउ नका’, तेव्हा त्यांच्या पोटातून निश्चित आवाज येईल की, ‘‘समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून तूम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून किमान 500 गाड्या भरून 1सप्टेंबरच्या मुंबई मोर्च्यात सामिल व्हायचे आहे, तरच तुमच्या उद्याच्या पोरां-बाळांचे आरक्षण वाचेल. जर तूम्ही हे काम केले नाही तर तुमचीच पोरं-पोरी उद्या तुम्हाला शिव्या घातल्याशिवाय राहणार नाहीत.’’ जर तुम्ही सच्चे भुजबळ-अनुयायी असाल व तात्यासाहेब महात्मा फुलेंची अवलाद असाल तर भुजबळसाहेबांच्या पोटातील हा क्रांतीकारी संदेश तुम्हाला फोनवर निश्चित ऐकू येईल.
जे काम करायची इच्छा भुजबळांचीच होती परंतु त्यांच्यासमोर खूप काही अडचणी उभ्या आहेत, हे त्यांचे दुःख आपण कार्यकर्त्यांनीच जाणून घेतले पाहिजे. गेल्या 1 वर्षांपासून 2 सप्टेंबरच्या GR चा फायदा उचलून लाखो मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम जोरात सुरू ठेवलेले आहे. आतापर्यंत एक वर्षात फक्त 4 खोटी ओबीसी प्रमाणपत्र तुम्ही रद्द करू शकलेले आहेत. लाखो दरवडेखोर घरात घुसलेले असतांना एकेकाला पकडून तुम्ही ओबीसी आरक्षण वाचवू शकत नाही.. मुंबईत घुसून मुंबई ठप्प केली तरच 2 सप्टेंबरचा GR रद्द होईल व सर्व दरवडेखोर एका मिनिटात आपल्या घरातून पळ काढून फरार होतील. हेच काम भुजबळ साहेबांनी बोलून दाखवले होते.. पण जर हे काम करणे त्यांना आजतरी शक्य नाही.. जर हेच काम हाकेसारखा एक तरूण करत असेल तर भुजबळ अनुयायी म्हणून हाकेला पाठिंबा देणे व 1 सप्टेंबर ला मुंबईत लाखोंच्या संख्येने जाणे, हे आपले आद्य कर्तव्य ठरते.
भुजबळसाहेबांचा ‘‘आतला’’ आवाज ऐका आणी 1 सप्टेंबरचे मुंबईचे आंदोलन यशस्वी करा. अभीमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा!
धन्यवाद!
आता भेटू या मुंबईत…..! तो पर्यंत जयजोती, जयभीम, जय पेरियार, सत्य की जय हो!
लेखकः
रविन्द्र सोलनकर महासचिव, धोंडू मानकर, कोषाध्यक्ष
सचिनदादा माळी संघटक
ओबीसी राजकीय आघाडी
Contact- सचिनदादा माळी 89990 87643
ईमेलः obcparty@gmail.com
महत्वाची सूचनाः या लेखाची pdf फाईल पुढील लिंकवर मिळेल-
या लेखाचे दोन्ही भाग एकत्रित वाचायचे असल्यास
पुढील लिंक्सवर क्लिक करा
1)https://drive.google.com/file/d/18wwPbSdGMkj9K09poRb2lKsG4EOwUQxg/view?usp=drive_link
2) https://shrawandeore.com/?p=443
3) https://drive.google.com/file/d/1d8uhvLxxW7oRPWRYhaJK-y9-35_TZz4G/view?usp=drive_link