• 76
  • 3 minutes read

मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

१२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीः संशोधन, उद्योग आणि ऊद्योजकतेचे खुले दालन

प्रवीण बागडे 

नागपूर 

मो.क्र. ९९२३६२०९१९

               बारावी विज्ञान शाखेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा सुरू होते. मात्र, आजच्या बदलत्या काळात या पारंपरिक क्षेत्रांपलीकडेही अनेक आशादायी करिअर संधी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र म्हणजे मत्स्यव्यवसाय. भारत हा जगातील अग्रगण्य मत्स्य उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक असून मत्स्य व्यवसाय हा देशाच्या अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. देशातील लाखो लोकांचा रोजगार मत्स्य क्षेत्राशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेला आहे. केंद्र शासनाच्या ब्लू इकॉनॉमी धोरणामुळे मत्स्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, तंत्रज्ञान विकास आणि रोजगारनिर्मिती होत आहे.

             महाराष्ट्र राज्यालाही सुमारे ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा, मोठच प्रमाणात जलाशय, धरणे, तलाव आणि नद्यांचे जाळे लाभले आहे. सागरी तसेच गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून राज्यात मत्स्यपालन, मत्स्य प्रक्रिया, निर्यात आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित उद्योग वेगाने विकसित होत आहेत. परिणामी प्रशिक्षित मत्स्य पदवीधारकांची मागणी सातत्याने वाढत आहे.

मत्स्यविज्ञान पदवीधारकांसाठी करिअरचे तीन महामार्ग

१. सरकारी सेवेत प्रतिष्ठेची संधी

मत्स्यविज्ञान पदवीधारकांना मत्स्य विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त (मत्स्य), मत्स्य विस्तार अधिकारी, मत्स्य निरीक्षक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी व मत्स्य क्षेत्राशी संबंधित स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

२. संशोधन आणि अध्यापन क्षेत्र

ICAR-CIFRI, ICAR-CMFRI, ICAR-CIFE, ICAR-CIBA यांसारख्या राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच कृषी व मत्स्य विज्ञान विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून उज्ज्वल करिअर घडविता येते. देश-विदेशातील संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळते.

३. उद्योग आणि उद्योजकता

मत्स्य निर्यात उद्योग, मत्स्य खाद्य उत्पादन, हॅचरी व्यवस्थापन, मत्स्य बीज उत्पादन, शोभेच्या मत्स्यपालन व्यवसाय, मत्स्य प्रक्रिया उद्योग, मत्स्य विपणन तसेच आधुनिक स्मार्ट फिश फार्मिंगमध्ये स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात मत्स्य शिक्षणाची मजबूत पायाभरणी

महाराष्ट्रातील मत्स्य शिक्षणाला बळकटी देण्यासाठी नागपूरस्थित महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत राज्यात तीन मत्स्य महाविद्यालये कार्यरत आहेत.

1. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर
2. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर
3. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मोर्शी जि. अमरावती

या तिन्ही महाविद्यालयांमध्ये पदवी स्तरावरील प्रवेशासाठी प्रत्येकी ४० अशा एकूण १२० जागा उपलब्ध आहेत. आधुनिक प्रयोगशाळा, मत्स्यपालन प्रकल्प, संशोधन सुविधा, औद्योगिक प्रशिक्षण, समुद्री व अंतर्देशीय मत्स्य व्यवसायाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यांमुळे ही महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शिक्षण केंद्रे म्हणून ओळखली जातात.

का निवडावे मत्स्यविज्ञान?

✓ सरकारी नोकरीच्या विशेष संधी
✓ संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी विस्तृत क्षेत्र
✓ उद्योजकता व स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय
✓ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती मागणी
✓ अन्नसुरक्षा आणि ब्लू इकॉनॉमीशी थेट संबंध
✓ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन करिअर

२०२६-२७ प्रवेश प्रक्रिया सुरू

मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीप्रवेश प्रक्रिया दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ पासून सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांची www.mafsu.ac.in ही वेबसाईट तपासावी. 

पात्रताः बारावी विज्ञान (PCB) + MHT-CET/ICAR प्रवेश परीक्षा.

उपलब्ध जागाः एकूण १२० (४० प्रति महाविद्यालय)

मर्यादित जागा आणि वाढत्या करिअर संधींमुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मत्स्यविज्ञान हे केवळ एक पदवी शिक्षण नसून विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सरकारी सेवा आणि उद्योजकता यांचे प्रभावी व्यासपीठ आहे. भारताच्या ब्लू इकॉनॉमीच्या वाढत्या वाटचालीत मत्स्यविज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षित तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 

मत्स्यविज्ञानाकडे केवळ पर्यायी करिअर म्हणून पाहण्याची वेळ आता संपली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण, व्यवस्थापन आणि उद्योजकता यांचा संगम असलेले हे क्षेत्र भविष्यातील रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअर पर्यायांपुरते मर्यादित न राहता मत्स्यविज्ञानातील संधींचाही गांभीर्याने विचार करावा. आज घेतलेला हा वेगळा निर्णय उद्याच्या यशस्वी आणि स्वावलंबी करिअरची नवी दिशा ठरू शकतो.
अधिकृत प्रवेश माहितीकरिता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची वेबसाइट वापरणे योग्य राहील.

1Shares

Related post

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…
कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदा आणि सायबर-फॉरेन्सिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख: : लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न मुंबई, २९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *