• 15
  • 1 minute read

Gen z – अभिमान आहे आम्हाला तुमचा…

Gen z – अभिमान आहे आम्हाला तुमचा…

Gen z - अभिमान आहे आम्हाला तुमचा...

             बोस्टनमध्ये पीएचडी करीत असलेला,फुले, शाहू,आंबेडकरी विचारसरणी असलेला अभिजित दिपके हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थेने पिचलेल्या तरुणांना एकत्र आणून सीजीपीची निर्मिती करतो आणि याही पुढे जाऊन आपल्या हक्क- अधिकारासाठी चलो जंतर मंतरचा नारा देऊन वैचारिक संघर्षाची,परिवर्तनाची सुरुवात करतो खरंच हे विचारांच्याही पलीकडचं आहे आणि या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे ही विशेष बाब लक्षात घेण्यासारखी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की,कोणत्याही चळवळीचं यशापयश मोजायचं असेल तर त्या चळवळीत महिला किती प्रमाणात सहभागी झाल्या आहेत यावर ते अवलंबून असतं.ही बाब लक्षात घेतली तर या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण मुली सहभागी झालेल्या आहेत.म्हणूनच हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे.तरुणी केवळ सहभागी झालेल्या नाहीत तर स्त्री काहीही करू शकते हे त्यांनी दाखवून दिलंय.या तरुणींमध्ये एवढं साहस कुठून आलंय असा विचार केला असता लक्षात आलं की या देशाला शूर आणि क्रांतिकारी विरांगणांचा इतिहास लाभलेला आहे.म्हणूनच या तरुणींमध्ये मला जिजाऊ,अहिल्याराणी, सावित्रीमाई,ताराराणी,मुक्ता साळवे,फातिमा शेख दिसतेय.
ज्यांना समतावादी, मानवतावादी महामानवांचा इतिहास समजलेला आहे ते नक्कीच या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि सहभागी होत आहेत.या आंदोलनाच्या निमित्ताने जात,धर्म,पंथ आणि लैंगिक भेद विसरून सारे एकत्र आले आहेत. कारण मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव,रोजगाराचा प्रश्न,आरोग्यसेवेची झालेली वाताहत या समस्या सर्वांच्या सारख्याच आहेत.कोणत्याही गोष्टीची सहन करण्याची क्षमता असते.त्या पलीकडे गेलं की उद्रेक होणारच.तरुणांना सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणारे, बिनकामाचे झुरळे आहेत असं म्हणणं महाग पडलं.तसंही तरुणांना झुरळं म्हणणं हे एक निमित्त मात्र ठरलं.तरुणांच्या मनात अनेक वर्षांपासून इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविषयी जो असंतोष होता त्यास हे फक्त निमित्त झालं. पेपरफुटीचे अनेक प्रकार या देशात झाले आणि होत आहेत. त्यामुळे अनेकांचं भविष्य अंधकारमय होऊन जातं.काही तर यातून बाहेर पडतच नाहीत. मग ते हे जग सोडून जाताना आमच्यासमोर प्रश्न उपस्थित करून जातात यात आमचा काय दोष?
            या अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांच्या बॅनरवर झळकलेले उपहासात्मक व्यंग,ते देत असलेल्या घोषणा यादेखील खूपच आगळ्यावेगळ्या आहेत.या तरुणाईच्या सर्जनशीलतेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.आजच्या तरुणाईला सामाजिक भान नाही असं नाही.त्यांचं सामाजिक भान कृतीत येऊ नये म्हणून इथल्या व्यवस्थेने आज पर्यंत पुरेपूर काळजी घेतलेली आहे.मात्र हे मनुवादी षडयंत्र तरुणांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आज त्यांच्या कृतीतून जे सामाजिक भान दाखवलंय त्याला खरंच तोड नाही.आपण नेहमीच पुरुषाला स्त्रियांचं रक्षण करणाऱ्याच्या भूमिकेत पाहतो. मात्र आंदोलन स्थळी जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा कित्येक तरुणांवर पोलिसांच्या काठ्या पडू नये म्हणून मुली पोलिसांच्या समोर पाय घट्ट रोवून उभ्या ठाकल्या तर मुलं देखील मुलींच्या रक्षणासाठी आम्हाला मारा म्हणत पोलिसांच्या सामोरं गेलीत. एवढंच नाही तर पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यासमवेत जेएनयूची पीएचडीची विद्यार्थिनी नेहा देखील आपल्या जीवाची पर्वा न करता अन्नत्याग उपोषणाला बसली.म्हणूनच तुमचा अभिमान वाटतोय आम्हाला.सारे जण स्वयंप्रेरणेने जे जे करता येईल ते ते जंतरमंतरवर करीत आहेत.कुणी स्वच्छता राखण्याचं, हातातील पंख्यानं इतरांना हवा घालण्याचं,कुणी अन्न वाटपाचं तर कुणी आजाऱ्यांची काळजी घेण्याचं काम करीत आहे.
             क्रांती ही अशीच होत नसते,तर ती व्यवस्था परिवर्तनासाठी एकाच विचारांनी भारावलेल्या लोकांच्या संघर्षातून होत असते.आजची तरुणाई संविधानिक मार्गाने लढा देत आहे.भारतीय संविधानानं आपल्याला किती अमूल्य हक्क अधिकार दिलेत हे त्यांच्या लक्षात आलंय.इथली मनुवादी व्यवस्था हक्क- अधिकारांची जाणीव होऊ नये म्हणून जनतेला कायम धर्मभेद, जातीभेद आणि मंदिर- मशीद वाद यातच गुंतवून ठेवते.जे त्यांच्यासाठी पूरक असतं.मात्र आज या तरुणाईला फुले,शाहू, आंबेडकरी विचारांचं भान आलंय आणि हा देश कुणा एका वर्गाची जहागिरी नसून इथल्या शोषित, पीडित आणि वंचित समूहाच्या संघर्षातून निर्माण झालेला लोकशाही प्रधान देश आहे हे ही समजलंय.म्हणून आज ते इथल्या व्यवस्थेला जाब विचारीत आहेत.”देर आये मगर दुरुस्त आये” हे ही तितकंच महत्वाचं.नीट परीक्षा पेपरफुटीच्या निमित्तानं जे आंदोलन इथं सुरू झालंय ते प्रायोजित आहे किंवा नाही तसंच ते कोणत्यातरी पक्षाच्या विरोधात आहे की समर्थनात हा मुद्दा गौण असून ते फक्त विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्क- अधिकारांच्या न्याय मागणीसाठी आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.म्हणूनच या आंदोलनात सारेच उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.कारण एका पक्षाची सत्ता जाते आणि दुसऱ्या पक्षाची सत्ता येते.भ्रष्ट व्यवस्था मात्र कायम राहते.म्हणून ही व्यवस्था उखडून फेकायची असेल तर जागृतीचा अग्नी सतत पेटता ठेवावा लागेल.समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा हा मुद्दा सुद्धा सीजीपीच्या अजेंड्यावर यायला हवा.कारण दहावी-बारावी बोर्डचा अभ्यासक्रम वेगवेगळा असताना सर्वांसाठी समान परीक्षा हा आग्रहच मुळी चुकीचा आहे.भविष्यामध्ये जनतेच्या मूलभूत हक्क-अधिकारांचं उल्लंघन होणार नाही असा दबाव इथल्या व्यवस्थेवर या तरुणांच्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झाला पाहिजे.त्याचबरोबर कोणत्याही आमिषाला बळी न पडता संविधानानं दिलेला अमूल्य असा मताचा अधिकार वापरुन संविधानाची प्रामणिकपणे अंमलबजावणी करणारी समतावादी, मानवतावादी विचारसरणी असणारी माणसं आपण संसदेत पाठविली पाहिजेत हे महत्वाचं आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने मला हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी आठवतात कारण संघर्ष करणारेच इतिहास घडवित असतात…

लहरो से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती…
असफलता एक चुनौती है स्वीकार करो
क्या कमी रह गयी,देखो और सुधार करो…
जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम…
कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती
कोशिश करने वालो की हार नहीं होती…

प्रणाली मराठे.
प्राथमिक शिक्षिका, धुळे

0Shares

Related post

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…
संघ आणि मोदींच्या अहंकार व दडपशाहीला ही झुकवून तरुणाईने मिळविला राजीनामा…..!

संघ आणि मोदींच्या अहंकार व दडपशाहीला ही झुकवून तरुणाईने मिळविला राजीनामा…..!

दडपशाहीच्या विरोधात ZEN – G चा संघर्ष अब सडक से संसद तक….!        …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *