• 5
  • 1 minute read

तिर्थरुप बाबा!

तिर्थरुप बाबा!

चेबुरच्या नऊ तरुणांनी त्या काळात रिपब्लिकन एकजुटीसाठी आमरण उपोषण केले होते. या आमरण उपोषणामुळे गटातटांच्या नेत्यांची पाचावर धारण झाली होती. कारण संपूर्ण आंबेडकरी जनतेची सहानुभूती या नऊ तरुणांच्या पाठीशी उभी राहिली होती. आणि मग दाती तृण घेऊन हे सर्व गटातटाचे पुढारी या नऊ तरुणांसमोर नतमस्तक झाले. उपोषण संपले आणि शिवाजी पार्कवर रिपब्लिकन नेत्याची ऐतिहासिक सभा आयोजित करण्यात आली. या सभेला एवढी प्रचंड गर्दी झाली होती की, शिवाजी पार्कचे कठडे फोडून गर्दी अगदी दादर स्टेशनपर्यंत पोहोचली होतो. त्या सभेत सगळ्याच नेत्यांनी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगीतले होते की, आम्ही आता कधीच फुटणार नाही. कवाडे सर त्यावेळेस आपल्या भाषणात म्हणाले होते की, आता जो या ऐक्यातून फुटेल त्याला उद्याचा सूर्य दिसणार नाही. फुटेल तो मिटेल.
       मी त्या सभेचा प्रत्यक्षदर्षी होतो. मी स्वभावताच कवी असल्याने या ऐक्यानंतर काय होणार याची कविताही लिहुन मी मोकळा झालो होतो. त्या कवितेत मी प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झालेत. आठवले गृहमंत्री, समाज कल्याण मंत्री कवाडे, अशी मंत्रीमंडळाची यादीच करुन टाकली होती. पण एवढ्या शपथा घेऊनही हे सगळे मान्यवर पुन्हा फुटले. प्रत्येकांनी पूर्वीप्रमाणेच आपआपली वेगवेगळी दुकाने थाटली. मग मी ही माझी ती कविता फाडून फेकून दिली. आणि नविन कविता बाबासाहेबांना उद्देशून लिहली. ही कविता म्हणजे बाबासाहेबांना पत्ररुपी निरोपच होता. ही कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे. पण आजही आम्ही त्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित होणार्‍या रिपब्लिकन्सची आतुरतेने वाट बघत आहोत. तुम्ही वंचित काढा, तुम्ही बहुजन, मुलनिवासी काढा, तुम्ही पँथर किंवा भिम आर्मी काढा वा रिपब्लिकनचे स्वतःच्या नावाने गट काढा. पण एक ना एक दिवस तुम्हाला बाबासाहेबांचे रिपब्लिकन्स म्हणून एकजुटीने उभे रहावेच लागेल. हा दुर्दम्य आशावाद कायम ठेऊन त्या काळात लिहलेली ही कविता मी वामनदादा कर्डक यांना अर्पण करतो. तर कवितेचं नाव आहे.
             तिर्थरुप बाबा!
तिर्थरुप बाबा!
तुझ्या नातवाचा तुला सप्रेम जयभिम विनंती विशेष!
पत्रास कारण की,
त्या दिवशी तुझ्या प्रकाशात निळ्या आकाशात एक अपूर्व घटना घडली.
ताकदीनिशी निळी पताका बिनधास्तपणे आकाशात फडफडली.
अरबी समुद्रासमोर जनसमुद्र ओसंडून वाहत होता,
त्यावेळी घोड्यावरचा शिवबासुध्दा कौतुकाने पाहत होता.
उपास तापास करुन बाबा नेते सारे एक झाले,
केवळ तुझ्या पुण्याईने..
बदनामही नेक झाले.
फुटेल तो मिटेल म्हणून शपथविधी झाला,
पुन्हा त्यांनी फुटिरतेचा विक्रमही केला.
पण बाबा,
काळजी काही करु नकोस,
मनी अढी धरु नकोस.
शासनकर्ती जमात व्हावी म्हणून अट्टाहास केला आहे,
हाॅस्टेलवरचा रामदास नाईलाजाने का होईना पण नामदार झाला आहे.
राखीव जागा भरणार आहेत, 
बौध्दांनाही देणार आहेत, 
प्रकाश मंत्री होणार आहे,
अरुणचाही नंबर लागणार आहे.
अशी भरपूर चंगळ मंगळ,
सगळं मंगल घडणार आहे,
मग चंदर कांबळेच्या मरणाने फरक काय पडणार आहे?
चंदर साला येडझवा,
मरुन, मरुन मेला केंव्हा?
भारत रत्न दिलं तेंव्हा, 
आता याचा विचार करणार केंव्हा?
तेंव्हा, एकमात्र बाबा नक्की ठरलय!
तुझं नाव घ्यायचं,
मिळेल ते खायचं, 
कुठेही घुसायचं,
पण मागे नाही रहायचं!
जमलच तर विद्यापिठा नाव तुझं द्यायचं,
पण नावासाठी आता नाही आंदोलन करायचं.
(ही कविता लिहली तोवर नामांतर झाल नव्हतं)
क्रांतीचं काय काम आहे,
चळवळीला विराम आहे,
आता बाबा, मस्तपैकी पाच वर्ष आराम आहे.
पाच वर्ष सरल्यावर, 
दिवस यांचे भरल्यावर. 
पुन्हा एकदा,
तुझ्या प्रकाशात, 
निळ्या आकाशात एक अपूर्व घटना घडेल, 
ताकदीनिशी निळी पताका पुन्हा फडफडेल, 
त्यावेळी सुध्दा जनसमुद्र ओसंडून वाहणार आहे.
मी पाच वर्षाने बाबा तुला पुन्हा पत्र लिहणार आहे…………,
तिर्थरुप बाबा!
तिर्थरुप बाबा!!
तिर्थरुप बाबा!
 
विवेक मोरे
0Shares

Related post

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप   भारतीय सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत…
पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट पुणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘नो डीजे’चा विधायक…
माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *